बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

  • विवाहासाठी हिंदु तरुणीवर धर्मांध तरुणाकडून धर्मांतरासाठी दबाव

  • तरुणीच्या कुटुंबियांना ठार मारण्याचीही धमकी

बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथे एका मुसलमान तरुणाच्या विरोधात हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तरुणाला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना येथील देवरनिया गावातील आहे.

तरुणीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, शिक्षणाच्या वेळी त्यांच्या मुलीचे उवैस अहमद याच्याशी मैत्री झाली होती. त्यानंतर त्याने धर्मांतर करून विवाहासाठी दबाव टाकण्यास चालू केले. याविषयी अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने ऐकले नाही आणि मला अन् माझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिली.