लालूप्रसाद यादव कारागृहातून बिहार सरकार पाडण्याचा कट रचत आहेत ! – भाजपचा आरोप

सुशीलकुमार मोदी यांच्याकडून दूरभाषचे संभाषण उघड

बिहार सरकारने या आरोपाची चौकशी करावी आणि जर हे सत्य असेल, तर लालूप्रसाद यादव यांना कारागृहात भ्रमणभाष संच कसा उपलब्ध झाला, याचाही शोध घेऊन संबंधितांना आजन्म कारागृहात डांबावे !

डावीकडून श्री. लालूप्रसाद यादव आणि श्री. सुशीलकुमार मोदी

पाटलीपुत्र (बिहार) – लालूप्रसाद यादव हे कारागृहातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सरकार पाडण्याचा कट रचत आहेत, असा आरोप भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांच्या आघाडीला बहुमत मिळाल्याने हे सरकार ८ दिवसांपूर्वीच स्थापन करण्यात आले असतांना ते पाडण्याचा प्रयत्न होत आहे.

सुशीलकुमार मोदी यांनी एक ट्वीट करत सांगितले की, लालूप्रसाद यादव रांचीतील कारागृहात बसून आघाडीतील आमदारांना दूरभाष करून मंत्रीपदाचे आश्‍वासन देत आहेत. मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांनी आमदारांना केलेल्या दूरभाषवरील संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही ट्वीट केले आहे. यात लालूप्रसाद यादव सभापती निवडणुकीत आघाडीच्या आमदारांना पाठिंबा देण्याचे सांगत आहेत. ‘कोरोना झाल्याचे सांगून अनुपस्थित रहावे’, असा सल्ला देत आहेत.