सगळे उघडले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – सगळे उघडले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका, अनावश्यक घराबाहेर पडू नका, कोरोनाची लक्षण दिसली तर लगेचच चाचणी करा, आपण सर्व सण संयमाने साजरे केले आता कार्तिकी यात्रेला गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने काही ठरवले की करून दाखवल्याशिवाय रहात नाही. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती कोरोनाच्या लढ्यात करून दाखवायची आहे. पाडव्याला सर्व धर्मांची प्रार्थना स्थळी उघडली आहेत. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला कोरोनाचा आकडा खाली आला होता. देहलीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. त्यामुळे दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल, अशी भीती वाटत असल्याची खंत व्यक्त केली. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे.

परदेशात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही वाढणार आहे. २४ ते २५ कोटी जनतेला लसीकरण करायची आवश्यकता आहे. लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे सध्या ‘मास्क’ घाला, हात धुवा, अंतर राखा हेच आपल्या हातात आहेत.

जनतेचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणार्‍यांवर नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा दळणवळण बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत.