मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. भैय्याजी जोशी यांनी मराठीविषयी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यशासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यावर मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी उठलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना महायुतीच्या आमदारांनी रोखले. मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आमदार योगेश सागर, महेश बालदी, अमित साटम यांच्यासह अन्य आमदार आसनावरून उठले. त्यानंतर ठाकरे पक्षाचे आमदारही आसनावरून उठले. निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघामध्ये गुजराती भाषेत लावलेल्या फलकांचे सूत्र महायुतीच्या आमदारांनी सभागृहात उपस्थित केले. या वेळी दोन्ही बाजूच्या आमदारांनी हातवारे करत सभागृहात हुज्जत घातली. सभागृहातील गदारोळ पाहून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केले.