विनामास्क फिरणार्‍यांवर मालवण नगरपरिषदेची कारवाई

मालवण – मालवण नगर परिषदेकडून  शहरात कोरोनाविषयक नियमांची काटेकोर कार्यवाही करतांना गेले काही मास विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत मागील  १० दिवसांत १० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक दंडवसुली विनामास्क फिरणार्‍या पर्यटकांकडून करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांना पालिका प्रशासनाने सूचनापत्र जारी केले आहे.

‘कोरोनाविषयक दक्षता घेण्याविषयीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर या नियमांचे पालन व्हावे, तसेच मास्कच्या सक्तीविषयी पर्यटकांमध्ये प्रबोधन करावे’, अशा सूचना पालिका प्रशासनाने हॉटेल आणि लॉज व्यावसायिक यांना दिल्या आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. शहरात येणार्‍या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ‘रॉक गार्डन’ आहे. या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला असून विनामास्क असलेल्या कोणत्याही पर्यटकाला ‘रॉक गार्डन’ येथे प्रवेश दिला जाणार नाही.