पुणे येथे फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ !

पुणे – दळणवळण बंदीमुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आली होती; पण अनलॉकनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. कोरोनामुळे दिवाळीला फटाके फोडण्यावर बंधने घालण्यात आली होती; परंतु नागरिकांनी उत्साहामध्ये फटाके फोडल्याने हवेची पातळी धोकादायक बनली. परिणामी शहरातील पार्टीक्युलेट मॅटर (पी.एम्.-२.५) म्हणजेच सूक्ष्म धूलिकणची पातळी २०० च्या वर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे.

कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती फुप्फुसविकारतज्ञ आणि चेस्ट रिसर्च फांऊडेशनचे प्रमुख डॉ. संदीप साळवी यांनी केली होती. याविषयीचा व्हिडिओसुद्धा त्यांनी सिद्ध करून प्रसारित केला होता. ज्यांना फुप्फुस आणि हृदयाचा आजार आहे, दमा, रक्तदाब आहे, त्यांना फटाक्यांच्या धुराने अधिक त्रास होऊ शकतो.

शहरात कार्बन डायऑक्साइड, धूलिकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्‍वासाद्वारे शरिरात घेत असतो. जे आपल्या शरिराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुप्फुसांना जंतूसंसर्ग, दमा, फुप्फुसाचा कर्करोग, स्ट्रोक, अल्मायझर, असे आजार होऊ शकतात.