गुढीपाडवा धर्मशास्त्रानुसार साजरा केल्याने होणारे लाभ ! 

‘हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा, हा सण आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा करतो; कारण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तेव्हा सूर्योदयाच्या वेळी हीच तिथी होती. या वर्षी ३०.३.२०२५ या दिवशी गुढीपाडवा आहे. या दिवशी ‘धर्मशास्त्रानुसार काय केले जाते ? आणि ते केल्याने त्याचे काय लाभ होतात ?’, हे आपण पाहूया.

१. गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नान करून सर्वांनी नवी वस्त्रे आणि अलंकार परिधान करावेत.

२. सूर्योदयाच्या वेळी धर्मध्वजाचे, म्हणजेच गुढीचे पूजन करावे. यामुळे सर्व सुखे प्राप्त होतात.

३. देव, गुरु आणि ब्राह्मण यांचे पूजन करावे.

श्री. अमर जोशी

४. ज्योतिषींचा सत्कार करून वर्षफल (संवत्सरफल) श्रवण केल्याने वर्ष लाभप्रद जाते. (टीप : संवत्सरफल – नवीन वर्ष कसे जाईल ?, याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन श्रवण करावे.)

५. या दिवशी निंबपत्र (कडुनिंबाची पाने) भक्षण करावे. यांमुळे सर्व व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य आणि संपत्ती प्राप्त होते.

६. याच दिवशी चैत्र नवरात्रास आरंभ होतो. शरद ऋतूमध्ये जसे नवरात्रीचे व्रत करतात, त्याप्रमाणे चैत्र प्रतिपदेला प्रारंभ करून नवदिनात्मक नवरात्र केले जाते.

७. या तिथीला ‘कल्पादि’ असे म्हटले जाते. या दिवशी श्राद्धादी कर्म केल्यास कल्पापर्यंत (४.३२ अब्ज वर्षांपर्यंत) पितरांची तृप्ती होते.

८. या दिवशी पाणपोई (प्रपादान) चालू करून पुढील ४ मास सर्वांना यथेच्छ पाणी द्यावे. ज्यांना पाणपोई चालू करणे शक्य नसेल, त्यांनी नियमित कुणाही एका व्यक्तीला यथेच्छ पाणी द्यावे. यांमुळे पितरांची तृप्ती होते.

नववर्षाच्या निमित्ताने वरील सर्व धार्मिक कृती करण्यास शास्त्रकारांनी सांगितले आहे. आपापल्या क्षमतेनुसार यांपैकी अधिकाधिक कृती आचरणात आणून सर्वांनी धर्मपालन करूया.’

(धर्मसिंधु आणि निर्णयसिंधु यांमधील माहितीचा आधार घेऊन लेख लिहिला आहे. वेगवेगळ्या धर्मग्रंथांनुसार या सूत्रांमध्ये प्रांतीय किंवा शास्त्रीय भेद असू शकतात.)’

(२०.३.२०२५)

– पुरोहित अमर जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, गोवा.