दळणवळण बंदीच्या कालावधीत अनुभवलेली सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रीती आणि कृपा !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘दळणवळण बंदीच्या कालावधीत ७ मास (मार्च ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत) मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांचा अखंड सत्संग, सहवास आणि मार्गदर्शन लाभले. आता गेले काही दिवस मी कोची आश्रमात आलो आहे. ८.११.२०२० या दिवशी सकाळी काही सेवेनिमित्त सद्गुरु पिंगळेकाकांशी बोलणे झाले. तेव्हा मी सद्गुरु काकांना सांगितले, ‘‘दिवसभरात कोणतीही कृती करत असतांना अथवा मनात काहीही विचारप्रक्रिया चालू झाली की, आपोआप आपण दिलेले दृष्टीकोन, सांगितलेली उदाहरणे यांचे स्मरण होत आहे आणि मन साधनामार्गावर (ट्रॅकवर) येते. त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.’’ त्या वेळी सद्गुरु काका म्हणाले, ‘‘जेव्हा अंतर्मनावर साधनेचा संस्कार होतो, तेव्हा असे होते. हे लिहून दे.’’ अंतर्मनावर साधनेचे संस्कार करण्यासाठी माझ्यापेक्षा सद्गुरु काकांनीच अधिक कष्ट घेतले आहेत आणि ते आजही अखंड साहाय्य (कृपावर्षाव) करतच आहेत. त्यांतील काही प्रसंग कृतज्ञतारूपाने श्री गुरुचरणी अर्पण करतो . . .

श्री. श्रीराम लुकतुके

१. साधकांच्या चुकांच्या संदर्भात

१ अ. तत्त्वनिष्ठपणे साधकांच्या चुका सांगणे : जेव्हा आम्हा साधकांच्या चुका लक्षात येत, तेव्हा सद्गुरु काका तत्त्वनिष्ठपणे त्या सांगून आम्हाला दिशा देत असत. त्या वेळी सद्गुरु काका स्पष्ट शब्दांत सांगत, ‘‘मला तुमची चुकांमुळे होणारी हानी दिसते आणि ती मी नुसती पाहू शकत नाही. माझ्याकडे भावनेला शून्य किंमत आहे.’’

१ आ. चूक न स्वीकारणार्‍या साधकास कठोर शब्दांत जाणीव करून देऊन त्याच्यात चुकीविषयी खंत निर्माण करणे : ज्या साधकाला जसे आवश्यक आहे, तशा प्रकारे ते चूक लक्षात आणून देत. जेव्हा एखादा साधक चूक न स्वीकारता स्पष्टीकरण देत असे, तेव्हा ते त्याला तिथेच थांबवून आवश्यकतेप्रमाणे कठोर शब्दांत जाणीव करून देत आणि साधकामध्ये अंतर्मुखता अन् चुकीविषयी खंत निर्माण करत.

१ इ. चूक झाल्यास समष्टीसमोर स्वतःचे कान धरून क्षमायाचना करण्यास सांगणे : माझ्याकडून एक महत्त्वाचे सूत्र काही घंटे उशिरा सांगितले गेले. तेव्हा त्यांनी मला ७ दिवस प्रतिदिन ती चूक समष्टीसमोर सांगून क्षमायाचना करायला सांगितली. त्यामुळे ‘सूत्रे तत्परतेने सांगायला हवीत (त्यांचे रिपोर्टिंग करायला हवे)’, याची जाणीव वाढली. काही साधकांकडून व्यष्टी साधनेच्या संदर्भात चुका झाल्या. तेव्हा सद्गुरु काकांनी त्यांना एक सप्ताह दिवसातून ३ वेळा समष्टीसमोर स्वतःचे कान धरून चूक सांगून क्षमायाचना करायला सांगितली.

१ ई. देवाने त्याचे तारक-मारक रूप सद्गुरु काकांच्या माध्यमातून अनुभवायला देऊन शिकवणे : जेव्हा एखादी चूक होते, तेव्हा सद्गुरु काकांचा एक कटाक्षही काही न बोलताही बरेच सांगतो आणि शिकवतो, तसेच जेव्हा सद्गुरु काका साधकाचा एखादा छोटासा प्रयत्न किंवा अनुभूती ऐकत असतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा आनंदही पुष्कळ अनुपम असतो. जणू देवाचे तारक-मारक रूप सद्गुरु काकांच्या माध्यमातून देव आम्हाला अनुभवायला देऊन शिकवत असतो.

२. व्यष्टी साधनेच्या संदर्भात – व्यष्टी साधनेत सातत्य येण्यासाठी प्रायश्‍चित्त घेण्यास सांगणे

आम्हा साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत होते. जेव्हा सांगूनही त्यात सुधारणा झाली नाही, तेव्हा त्यांनी प्रायश्‍चित्त (अधिक सेवा करणे आदी) घेण्यास सांगितले आणि त्यामुळेच आज आमच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य येत आहे.

३. गुणवृद्धीच्या संदर्भात

जसे आमच्या चुकांची जाणीव करवून देऊन त्यांनी आम्हाला साहाय्य केले, तसेच ‘गुणवृद्धीसाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे सांगून त्यांनी आमच्याकडून तसे प्रयत्न करवून घेतले.

३ अ. विविध सेवांचे दायित्व घेण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांतील चुकांची जाणीव करून देणे : माझी कोणतीही क्षमता आणि पात्रता नसतांना सद्गुरु काका विविध सेवांचे दायित्व घ्यायला मला प्रोत्साहन देत, साहाय्य करत आणि आवश्यकतेप्रमाणे भरभरून कौतुकही करत. एकदा सेवेतील एक निर्णय मी मनाने घेतला. तेव्हा सद्गुरु काकांनी मला जाणीव करून दिली, ‘‘सेवेचे दायित्व मिळाले, म्हणजे सर्व अधिकार मिळाले, असे नसते. सतत शिकण्याच्या स्थितीत राहून विचारायला हवे. त्यात साधना आहे.’’

३ आ. ‘चिंतन आणि व्याप्ती काढणे’ या सूत्रांसाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न करवून घेणे : पूर्वीच्या काही चुकांमुळे आणि शिकण्याची वृत्ती अल्प असल्याने चिंतन अन् व्याप्ती या दोन्ही सूत्रांपासून पळ काढण्याचा विचार माझ्या मनात येत असे. ‘ते माझ्या क्षमतेबाहेरचे आहे’, असे मला वाटत असे आणि मी तसा संदेश पाठवत असे; पण सद्गुरु काकांनी हात धरून मला एक एक टप्पा शिकवला आणि म्हणाले, ‘‘जमले ना तुला !’’ प्रत्यक्षात तेव्हा माझी स्वभावदोषावर मात करण्याची इच्छाशक्तीही अल्प पडत असे; पण सद्गुरु काकांची प्रीती आणि तळमळ यांमुळे मला शिकायची संधी मिळत आहे.

३ इ. साधकांच्या मनातील विचार सद्गुरु काकांनी बोलून दाखवणे आणि त्यातून मनमोकळेपणाने बोलण्याचा संस्कार अप्रत्यक्षपणे करणे : अनेकदा असा अनुभव आला की, ज्या क्षणाला माझ्या अथवा साधकांच्या मनात काही विचार येत असे, त्या क्षणाला सद्गुरु काका तो विचार बोलून दाखवत. देवाने अशा अनुभूती देऊन ‘देवापासून आपण काहीच लपवू शकत नाही आणि मन निर्मळ करण्यासाठी मनमोकळेपणे बोलले पाहिजे’, हा संस्कार अप्रत्यक्षपणे केला.

४. दळणवळण बंदीच्या कालावधीत चालू झालेला ‘ऑनलाईन’ धर्मसंवाद आणि परिसंवाद यांच्या निमित्ताने मिळालेला सद्गुरु काकांचा सहवास म्हणजे दिवाळीच असणे

दळणवळण बंदीच्या कालावधीत चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ धर्मसंवाद सत्संगाचे ध्वनी-चित्रीकरण अथवा ‘चर्चा हिंदू राष्ट्र की’ या परिसंवादाच्या निमित्तानेही मला सद्गुरु काकांचा अधिक सहवास मिळाला. त्या वेळी सद्गुरु काकांचे एक वेगळेच दिव्य रूप मला अनुभवायला मिळाले. सेवेच्या कालावधीत त्यांच्या सत्संगातील प्रत्येक क्षण आम्हाला घडवण्यासाठी असे. ते एवढे सहज असे की, आरंभीचे काही आठवडे त्याची जाणीवही होत नसे. सद्गुरु काका सहजतेने त्यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे साधनेतील अनुभव, आरंभीच्या काळातील मनाची प्रक्रिया आम्हाला सांगत. तेव्हा ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा समष्टीपेक्षा अधिक माझ्यासाठी आहे’, असे वाटत असे. ध्वनीचित्रीकरणाच्या वेळी मिळालेला सद्गुरु काकांचा सहवास, म्हणजे माझ्यासाठी खरी दिवाळी होती. सद्गुरु काकांनी सांगितलेले विविध दृष्टीकोन आणि उदाहरणे यांचे आज वेळोवेळी स्मरण होऊन मी त्यांचे अखंड अस्तित्व अनुभवू शकत आहे.

५. सद्गुरु काकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

५ अ. तांत्रिक क्षेत्रातील अनुभव नसतांनाही सद्गुरु काकांनी त्यावर उपाय सांगणे : कोणताही विशेष पूर्वानुभव नसतांना सेवेत कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यावर सद्गुरु काका एवढ्या सहजपणे त्यावरील उपाय सांगत की, ‘मला एखाद्या क्षेत्रातील अनुभव आहे. मी ही सेवा चांगली करतो’, हा अनुभव किती व्यर्थ आहे ?’, याची देव क्षणात जाणीव करवून देत असे. सद्गुरु काका या सर्वांचे श्रेय नेहमी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देत. ते म्हणत, ‘‘तेच कर्ते-करविते आहेत. मला काही येत नाही.’’ अशी कोणतीच सेवा नाही की, जी सद्गुरु काका करू शकत नाहीत.

५ आ. ‘सद्गुरु काकांची खोली पुष्कळ विशाल झाली आहे’, असे जाणवणे : एकदा सद्गुरु काका आम्हा ४ – ५ साधकांना घेऊन येणार्‍या ३ मासांतील सेवांचे करावयाचे नियोजन शिकवत होते. तेव्हा आम्ही सर्व जण त्यांच्या खोलीत बसलो होतो. त्या वेळी ‘सद्गुरु काकांची खोली पुष्कळ विशाल झाली आहे’, असे जाणवत होते. (प्रत्यक्षात सद्गुरु काकांची खोली आश्रमात सर्वांत लहान खोली आहे.) ‘देव ब्रह्मांडाचा कारभार एका ठिकाणी राहून कसा चालवतो ?’, याची झलक जणू देव आम्हाला दाखवत होता.

५ इ. आध्यात्मिक त्रासामुळे सद्गुरु काकांना टाळण्याचा विचार मनात येणे, सद्गुरु काकांनी सेवेनिमित्त स्वतःच्या खोलीत बसवून घेणे आणि खोलीतून बाहेर पडल्यावर मनाच्या स्थितीत आमूलाग्र पालट झाल्याचे जाणवणे : आध्यात्मिक त्रास आणि ‘प्रतिमा जपणे’ हा स्वभावदोष यांमुळे माझ्या मनात सद्गुरु काकांना टाळण्याचा विचार येत असे. तेव्हा सद्गुरु काका मला काही सेवेनिमित्त बोलवत आणि मला सांगत, ‘‘आसंदी घेऊन इथे बसूनच सेवा कर.’’ जेव्हा ती सेवा करून मी सद्गुरु काकांच्या खोलीतून बाहेर येत असे, तेव्हा मनाच्या स्थितीत आमूलाग्र पालट झालेला जाणवत असे. तेव्हा ‘सेवा केवळ निमित्त असे आणि माझे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, मला चैतन्य मिळून नामजपादी उपाय व्हावेत; म्हणूनच ही देवाची लीला आहे’, असे मला जाणवत असे.

६. सद्गुरु काकांनी माता, पिता, बंधू, सखा आणि सर्वस्व बनून अखंड कृपा केल्याने त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच असणे

काही वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचा अखंड ९ दिवस सत्संग मिळाला आणि ते दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील खरे अन् पहिले नवरात्र होते. त्या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विश्रांतीचे ३ – ४ घंटे सोडले, तर आमच्यासाठी अखंड उपलब्ध होत्या आणि त्यांनी माझ्यावर विविध प्रकारे अखंड कृपा केली. आता दळणवळण बंदीच्या कालावधीत सद्गुरु पिंगळेकाकांचा ७ मास सत्संग मिळाला. जन्मदात्या आईने ९ मास मला वाढवण्यासाठी कष्ट सहन केले आणि सद्गुरु काकांनी ७ मास माझ्यासाठी माता, पिता, बंधू, सखा आणि सर्वस्व बनून माझ्यावर अखंड कृपा केली अन् माझे अनेक जन्मांचे प्रारब्ध आणि त्रास दूर केले. सद्गुरु काकांनी आमच्यासाठी शब्दशः दिवसाचे २४ घंटे दिले आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले आहे, ‘‘काही अडचण असेल, साहाय्य हवे असेल, तर तुम्ही केव्हाही येऊ शकता. मी विश्रांती घेत असेन, तर मला उठवू शकता.’’ अगदी अपरात्री दोन-अडीच वाजेपर्यंत जागूनही सद्गुरु काकांनी आम्हाला सेवेत साहाय्य केले आहे. सद्गुरु काकांविषयी किती लिहू, तेवढे अल्प आहे. त्यांची कृपा समजणे माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला अशक्य आहे, तरीही म्हणतात ना, भगवंत दयाळू, कृपाळू आहे. त्यामुळेच काही अंशी तरी शब्दरूपात श्री गुरुचरणी कृतज्ञता अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न !

‘हे परात्पर गुरुमाऊली, ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून आपण करत असलेला कृपावर्षाव समजण्यास, तिचा लाभ करवून घेण्यास मी अल्प पडलो. यासाठी आपल्या चरणी क्षमायाचना करतो. सद्गुरु काका सांगत असल्याप्रमाणे माझ्याकडून प्रयत्न होऊ दे आणि माझ्यामध्ये शिकण्याची वृत्ती, शरणागती अन् आपल्याला अपेक्षित अशी भावभक्ती निर्माण होऊ दे’, अशी याचना करतो.’

गुरुचरणी,

– श्री. श्रीराम लुकतुके, कोची, केरळ. (११.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक