वयस्कर साधिकेची सेवा मनापासून स्वीकारून आणि भाव ठेवून करू लागल्यावर तिच्यातून आनंद मिळणे

सौ. मीना खळतकर

१. वयस्कर साधिकेची सेवा करतांना सेवा मनापासून न स्वीकारल्यामुळे सेवा करतांना ताण येणे 

‘एकदा मी एका वयस्कर साधिकेची सेवा करत होते. त्या वेळी मला त्यांच्या वागण्यामुळे काही वेळा प्रतिक्रिया येत असत आणि मला त्यांच्याकडून अपेक्षा होत असत. मी काही दिवस त्यांची सेवा करत असे आणि नंतर ‘मला जमत नाही’, असे सांगून सेवा बंद करत असे. ही सेवा करतांना माझ्या मनावर ताण असायचा. काही दिवसांनी मला परत तीच सेवा सांगितली जात असे.असे २ – ३ वेळा झाले.

२. चुकीसाठी क्षमायाचना केल्यावर सेवा मनापासून स्वीकारली जाणे आणि आनंद मिळणे

एकदा माझ्या बोलण्यातून त्या आजींचे मन दुखावले गेले. तेव्हा मला खंत वाटली. मी आजी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची क्षमा मागितली. मी प्रार्थना केली, ‘मला पुन्हा एकदा सेवेची संधी द्या.’ त्यानंतर लगेचच मला त्या आजींची सेवा मिळाली आणि मी ती मनापासून स्वीकारली. तेव्हा मला ताण न येता सेवेतून आनंद मिळू लागला.

३. सेवा करतांना ठेवलेला भाव 

अ. आजींसाठी महाप्रसाद बनवतांना ‘मी मोक्षगुरूंसाठी नैवेद्य बनवत आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा भाजी बनवतांना एखादा घटक घालायचा राहिला, तर अन्नपूर्णादेवी मला स्मरण करून देते. त्या वेळी ती भाजी आजींना आवडते.

आ. आजींसाठी महाप्रसादाचा डबा त्यांच्या खोलीत घेऊन जातांना किंवा अन्य सेवेसाठी जातांना ‘गुरुमाऊली मला रथ किंवा पुष्कर विमान यांमध्ये बसवून वैकुंठ लोकात घेऊन जात आहे, तसेच आजींच्या माध्यमातून मला श्रीविष्णूचे दर्शन होणार आहे’, असा भाव मी ठेवते.

४. मला या आधी गुडघेदुखीचा त्रास होता; मात्र ही सेवा करू लागल्यापासून तो त्रास न्यून झाल्याचे माझ्या लक्षात आले.

यावरून ‘मनापासून आणि भावपूर्ण सेवा केल्यावर सेवेतून आनंद मिळतो’, हे मला शिकायला मिळाले.’

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक