‘श्रद्धा’ या दैवी गायीविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘आमच्या संकेश्वर येथील घरी तपोधाम येथून एक गाय दिली होती. त्या गायीविषयी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

‘श्रद्धा’ नावाची गाय

१. गायीच्या माध्यमातून गुरुदेवांनी चैतन्य देणे

तपोधाम येथून ‘श्रद्धा’ नावाची एक गाय १२ वर्षांपूर्वी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) संकेश्वर येथील आमच्या घरी पाठवली. या गायीच्या माध्यमातून आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि प्रसाद लाभला. गायीच्या माध्यमातून गुरुदेवांनी आम्हाला भरभरून चैतन्य दिले.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले उपाय केल्यावर श्रद्धा शांत होणे

श्रद्धा आमच्याकडे आली असतांना ती पुष्कळ रागीट होती. तिचा चेहरा वेगळाच दिसत असे. तिचे दूध काढायला गेल्यावर त्या दुधातून रक्त येत असे. आम्ही याविषयी प.पू. डॉक्टरांना सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना उपाय विचारून घ्या.’’ आम्ही श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना गायीविषयी सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तिला पूर्वजांचा त्रास होत आहे. गोठ्यातील तिच्या जागेसमोर दत्तगुरूंचे चित्र लावा आणि गोठ्यात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत लावून ठेवा.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर श्रद्धा थोडी शांत झाली. तिच्या चेहर्‍यामध्येही पालट झाला.

३. माझा भाऊ (आताचे कै. विजय जाधव, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) गायीची सेवा भावपूर्ण आणि आनंदाने करत असे. माझा भाऊ ‘ती गाय दैवी आहे’, या भावाने तिची सेवा करत असे.

सुश्री (कु.) सविता जाधव

४. श्रद्धा गायीच्या संदर्भात भावाला आलेली अनुभूती

माझ्या भावाला कितीही ताण असला आणि तो गायीच्या गोठ्यात गेला की, ‘त्याला शांत वाटत असे.’

५. भावाचे निधन झाल्याच्या दिवशी पूर्ण दिवस श्रद्धाने काही खाल्ले नाही आणि ती पाणीही प्यायली नाही.

६. श्रद्धाला अन्य साधकांकडे पाठवत असतांना ती तिकडे जाण्यास सिद्ध नसणे

नंतर आम्ही ‘श्रद्धाला तासगाव येथील साधक श्री. पुरण मलमे यांच्याकडे पाठवूया’, असे ठरवले. श्रद्धा त्यांच्या घरी जायला सिद्ध नव्हती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. आम्ही सर्वांनी साश्रू नयनांनी श्रद्धाला निरोप दिला.

 ७. ‘गुरुमाऊलींनी श्रद्धासारखी गाय आम्हाला सांभाळायला देऊन आमचा या जन्मातील तिच्याशी असलेला देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करून घेतला’, असे मला वाटते. आम्ही श्रद्धाला कधीच विसरू शकत नाही. 

८. पुरणदादांनीही श्रद्धाची सेवा पुष्कळ भावपूर्ण केली. त्यांना तिचा पुष्कळ लळा लागला होता.

९. श्रद्धा रुग्णाईत झाल्यावर पुरणदादांनी तिच्यावर सर्व औषधोपचार केले; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. १५.१०.२०२४ या दिवशी श्रद्धाने देह सोडला.

गुरुमाऊलींनी माझ्या भावाकडून गायीची मनोभावे सेवा करून घेतली. गुरुमाऊलींनी त्याच्याकडून भावजागृतीचे प्रयत्न करून घेतले आणि त्याची आध्यात्मिक प्रगती करून त्याची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटकाही केली. त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) सविता गणपति जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक