|
नवी देहली – गुन्हा करण्याची सिद्धता आणि वास्तवात गुन्हा करणे यांत पुष्कळ अंतर आहे. पीडितेच्या स्तनांना स्पर्श करणे, तिच्या पायजम्याची नाडी सोडणे आणि पीडितेला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यासाठी पुरेशा नाहीत, असे अलाहाबद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी एका खटल्यावर निर्णय देतांना म्हटले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देत म्हटले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हा निकाल पूर्णपणे असंवेदनशील आणि अमानवी दृष्टीकोन दर्शवतो.
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर स्वतःहून हस्तक्षेप करत यावर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्हाला याप्रकरणी निकाल देतांना आणि उच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा असल्याचे सांगतांना खेद वाटतो की, त्याच्या काही टिप्पण्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसत आहे. उच्च न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक होता.
काय होते प्रकरण ?उत्तरप्रदेशाच्या कासगंज येथे वर्ष २०११ मध्ये हा गुन्हा घडला होता. दोन आरोपींनी एका ११ वर्षीय मुलीला गाडीतून सोडण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पादचार्यांनी या दोघांना हटकल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला होता. |