कराड – तक्रारदार यांच्याकडे बांधकामास अनुमती देण्यासाठी १० लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. यापैकी ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना कराड नगरपालिकेचे साहाय्यक नगररचनाकार यांच्यासह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी कराडचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे कराड शहरात ५ मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. वर्ष २०१७ मध्ये तक्रारदार यांनी कराड नगरपालिकेमध्ये अर्ज केला होता. सुधारित बांधकाम अनुमती मिळण्यासाठी वर्ष २०१९ मध्ये पुन्हा अर्ज करण्यात आला होता. स्थानांतर झालेले तत्कालीन कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, साहाय्यक नगररचनाकार स्वानंद शरगुप्पे, पालिका कर्मचारी तौफिक शेख आणि खासगी व्यक्ती अजिंक्य देव यांनी संगनमत करून तक्रारदार यांच्याकडे बांधकाम अनुमतीसाठी १० लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याविषयी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घटनेची माहिती घेऊन अन्वेषण केले असता यामध्ये तथ्य आढळून आले. यानंतर २४ मार्च या दिवशी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साहाय्यक नगररचनाकार शिरगुप्पे पालिका कर्मचारी तौफिक शेख आणि खाजगी व्यक्ती अजिंक्य देव यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.
कराड नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्याविषयी काही दिवसांपूर्वीच गंभीर तक्रारी केल्या होत्या, तसेच त्यांच्या स्थानांतराचीही मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांच्या कार्यपद्धतीविषयी माजी नगरसेवकांमध्ये तीव्र संताप होता. मुख्याधिकारी खंदारे तथाकथित शिस्तीचा बुरका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे फाटला आहे. |