प.पू. काणे महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आज नारायणगाव येथे अभिषेकाचे आयोजन !

प.पू. काणे महाराज

नारायणगाव (पुणे) – प.पू. काणे महाराज यांची कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच १७ नोव्हेंबर या दिवशी तृतीय पुण्यतिथी आहे. यानिमित्त नारायणगाव येथे मनोहर बागेत सकाळी ८ ते १० या वेळेत प.पू. काणे महाराजांच्या चरण पादुकांवर रूद्राभिषेक आणि पवमान अभिषेक होईल. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचे सर्व भक्तांकडून वैखरीत नामस्मरण करण्यात येणार आहे. त्यानंतर प.पू. काणे महाराज यांच्या संदर्भातील अनुभूती, आठवणी किंवा प्रसंग इत्यादींचे कथन होईल. दुपारी १ वाजता भोजनप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

​या वेळी लेखक रामचंद्र कृष्ण कामत-चंदगडकर, श्री दुर्गादत्त मंदिर, माशेल (गोवे)  यांच्या ‘नामजपाचे महत्त्व’ या छोट्या; पण अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचे वितरण होईल.

प.पू. काणे महाराज यांच्याकडून अध्यात्मातील विषयांसंबंधीचे तात्त्विक विवेचन जाणून घेतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष १९९२)

ज्ञानयोगी आणि शिष्याला अखंड शिकवणारे प.पू. काणे महाराज यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘माझ्या जीवनात अनेक संत आले.प.पू. काणे महाराज हे त्यांतील ज्ञानमार्ग शिकवणारे एकमेवाद्वितीय होते. ते मुंबईला आल्यावर अनेक वेळा आमच्या घरी राहिले आहेत. ते प्रत्येक वेळी आमच्या घरी आल्यापासून ते घरून निघून जाईपर्यंत त्यांचे प्रत्येक मिनिट मी त्यांना प्रश्‍न विचारत असे.  ज्ञानमार्गाची भाषा कठीण असली, तरी ते विषय सोपा करून शिकवत. जीवनातील विविध प्रसंगांत कसे रहायचे, हेही ते शिकवायचे.

​तन-मन-धनाचा त्याग कसा करतात, खडतर तपश्‍चर्या कशी असते इत्यादी अनेक विषय मला त्यांच्याकडून शिकता आले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच.

​त्यांनी त्यांचे शिष्य श्री. शशिकांत ठुसे यांनाही त्यांच्याप्रमाणे घडवले आहे आणि साधनेत पुढे नेले आहे.

​‘प.पू. काणे महाराज यांची कृपा माझ्यावर आणि सर्व साधकांवर अखंड राहो’, ही त्यांच्याचरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. काणे महाराज यांच्या काही हृद्य आठवणी आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे

प.पू. काणे महाराज

​‘२२.१०.२०१७ या दिवशी नारायणगाव येथील प.पू. काणे महाराज यांनी देहत्याग केल्याचे कळले. वर्ष १९९२ ते वर्ष २००१ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला त्यांचा सत्संग लाभला. त्या कालावधीत त्यांनी मला अध्यात्मशास्त्र, अहं-निर्मूलन, साधना यांविषयी तसेच सेवा, ‘गीताप्रेस’च्या ग्रंथाद्वारे अध्यात्मप्रसार, हिंदुत्व, राष्ट्राभिमान इत्यादींविषयी कृतीशील ज्ञान दिले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला अनेक संतांचा सत्संग देऊन कसे शिकवले ?’, याविषयी जुन्या आठवणी आणि मला आलेल्या आध्यात्मिक अनुभूती त्यांच्या कृपाशीर्वादामुळे लिहू शकलो. त्या त्यांच्या आणि प.पू. काणे महाराज यांच्या चरणी अर्पण करत आहे.

पू. शिवाजी वटकर

१. प.पू. काणे महाराज यांची प्रथम भेट !

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. काणे महाराज यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या दादर येथे होणार्‍या अभ्यासवर्गाच्या ठिकाणी घेऊन येण्याची सेवा सांगणे : ‘२६.१.१९९२ या दिवशी दादर (मुंंबई) येथील बालमोहन शाळेत होणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गाला नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभणार होती. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला प.पू. काणे महाराज यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या निवासस्थानाहून अभ्यासवर्गाच्या ठिकाणी घेऊन येण्याची सेवा दिली होती. मी माझ्या चारचाकीने प.पू. काणे महाराज यांना अभ्यासवर्गाच्या ठिकाणी घेऊन आलो.

१ आ. काही वेळ अभ्यासवर्गाला थांबून प.पू. काणे महाराज परत जायला निघणे, त्यांनी ‘साधकाचा अभ्यासवर्ग चुकू नये’, यासाठी स्वतःला बस थांब्यावर सोडण्यास सांगणे आणि तेव्हा ‘तुम्हाला परत निवासस्थानी सोडणे’, हाच माझा अभ्यासवर्ग अन् सत्संग आहे’, असे साधकाने त्यांना सांगणे : तेथे ते अभ्यासवर्गाला थोडा वेळ थांबल्यावर परत जाण्यास निघाले. त्या वेळी माझे प.पू. काणे महाराज यांच्याशी पुढील संभाषण झाले.

मी (प.पू. काणे महाराज यांना उद्देशून) : मी तुम्हाला जेथून आणले तेथे सोडतो.

प.पू. काणे महाराज : मला बस थांब्यावर सोड. तेथून मी पुढे जातो.

मी : परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मी तुम्हाला त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोचवायला येतो.

प.पू. काणे महाराज : त्यामुळे तुला सत्संग आणि अभ्यासवर्ग यांचा लाभ होणार नाही. त्याचे काय ?

मी : ‘तुम्हाला तिकडे सोडणे’, हाच माझा अभ्यासवर्ग आणि सत्संग आहे.

​त्यानंतर मी त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या घराजवळ सोडले.

१ इ. प.पू. काणे महाराज यांनी साधकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या घरी नेऊन खाऊ अन् चहा देणे, त्या वेळी ‘ते घर स्वतःचेच आहे’, असा त्यांचा सहजभाव असणे आणि नंतर साधकानेही ‘ते घर त्याचेच आहे’, या भावानेच त्या घरात सहजतेने वावरणे : मी बर्‍याच वेळा परात्पर गुरु डॉक्टरांच्या संमोहन उपचार रुग्णालयातील खोलीत चालू केलेल्या सेवाकेंद्रात जात असे; मात्र मी त्यांच्या त्याच माळ्यावर असलेल्या घरी कधी गेलो नव्हतो. त्या दिवशी प.पू. काणे महाराज मला प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांच्या घरी घेऊन गेलेे. तेथे त्यांनी मला खाऊ आणि चहा दिला. त्या वेळी त्यांनी माझी साधनेविषयी विचारपूस केली. त्या वेळी मला ‘ते घर परात्पर गुरु डॉक्टरांपेक्षा प.पू. काणे महाराज यांचेच आहे’, असे त्यांच्या वागण्यावरून वाटले. त्या वेळी मला या गोष्टीचे आश्‍चर्यही वाटले; मात्र पुढे मीही सतत २० वर्षे परात्पर गुरु डॉक्टरांच्या घरात ‘ते घर स्वतःचे घर आहे’, या भावानेच वावरलो.

२. प.पू. काणे महाराज मुंबईला आल्यावर अनेक वेळा साधकाकडे निवासासाठी जात असणे आणि त्या वेळी ते सांगत असलेली साधना, राष्ट्र अन् धर्म यांविषयीची सूत्रे लिहून घेऊन ती परात्पर गुरु डॉक्टरांकडे पाठवणे

प.पू. काणे महाराज मुंबईला आल्यावर मला बोलावून घ्यायचे आणि मला त्यांच्या समवेत मुंबई, ठाणे अन् रायगड येथे घेऊन जायचे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प.पू. काणे महाराज आमच्या घरी अनेक वेळा रहायचे. तेव्हा ते मला अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी अनेक सूत्रे सांगायचे. मी ती सूत्रे लिहून घेत असे आणि नंतर ते लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांकडे पाठवत असे.’

३. व्यष्टी साधना करण्यास सांगितल्यावर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी प.पू. काणे महाराज यांच्याकडे जाणे अन् त्यांनी साधना, अहं-निर्मूलन, सत्सेवा, हिंदुत्व, तसेच राष्ट्राभिमान इत्यादी विषयांवर ज्ञान देऊन कृतीप्रवण करणे

‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होतो; पण माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत असल्याने मला वर्ष २००० – २००१ मध्ये व्यष्टी साधना करायला सांगितली होती. तेव्हा दीड वर्ष घरी असतांना मी आणि माझे साधक-मित्र श्री. तुकाराम लोंढे प्रत्येक शनिवारी अन् रविवारी नारायणगाव येथे प.पू. काणे महाराज यांच्या सत्संगाचा लाभ घेण्यासाठी मुंबईहून जात होतो. त्या वेळी प.पू. काणे महाराज यांनी आम्हाला प्रेमाने जवळ केले आणि ‘आध्यात्मिक जीवन कसे जगावे ?’, याविषयी सांगितले. त्या काळात त्यांनी मला अध्यात्मशास्त्र, साधना, अहं-निर्मूलन, सत्सेवा, हिंदुत्व, राष्ट्राभिमान इत्यादी विषयांवर कृतीला प्रवृत्त करणारे ज्ञान दिले. अशा प्रकारे मला वर्ष १९९२ ते वर्ष २००१ या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला प.पू. काणे महाराज यांचा सत्संग लाभला.

४. प.पू. काणे महाराज यांनी चहा, स्वयंपाक या गोष्टी अल्प वेळेत आणि अल्प व्ययात करायला शिकवणे प.पू. काणे महाराज ४ – ५ वेळा आमच्या घरीही निवासाला आले होते. घरी आल्यानंतर ते ८ – १० दिवस रहायचे. तेव्हा त्यांनी मला स्वयंपाकघरातील काही कृती शिकवल्या.

अ. ‘योग्य पद्धतीने चहा कसा करायचा ?’ हे शिकवले. त्यांनी सांगितले, ‘‘चहासाठी ठेवलेल्या पाण्यात साखर घालावी. ते पाणी उकळल्यावर गॅस बंद करून त्यामध्ये चहाची पूड घालून त्यावर झाकण ठेवावे. त्यानंतर त्यात दूध घालून चहा गाळून घ्यावा.’’

आ. त्यांनी आम्हाला ‘आमटी आणि भाजी हे पदार्थही कसे करायचे ?’, हे शिकवले. ते कूकरमध्ये डाळ, बटाटे आणि भात एकाच वेळेस शिजायला लावायचे. ते भाजी आणि आमटी एकत्र ‘टू-इन-वन’, म्हणजे ‘आमटी अन् भाजी’ असा एकच पदार्थ करायचे.

इ. ‘जेवणासाठी कसे बसावे ?’, ‘पाणी कधी प्यावे ?’ इत्यादी बारकावे त्यांनी आम्हाला शिकवले.

​ते म्हणायचे, ‘‘स्वयंपाक करण्यास अल्प वेळ लागला पाहिजे. व्ययही न्यून झाला पाहिजे आणि अधिकाधिक वेळ नामस्मरण अन् साधना यांसाठी दिला पाहिजे.’’

५. प.पू. काणे महाराज यांनी साधकाकडून साधना करवून घेणे

५ अ. अध्यात्म शिकवणे : ते आमच्या घरी आल्यावर पुष्कळ वेळ आम्हाला (मी, पत्नी आणि मुलगा यांना) अध्यात्म शिकवायचे. आम्ही ते लिहून घ्यायचो. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते. त्यांना शुद्ध मराठी लिहिलेले आवडायचे.

​मी अंघोळ करून बाहेर आल्यावर त्याच स्थितीत मला अडवून ते २० – २० मिनिटे उभे राहून अध्यात्म शिकवायचे. एवढी त्यांची अध्यात्म शिकवण्याची तळमळ असायची आणि मीही त्यांचे बोलणे आवडीने ऐकायचो.

५ आ. साधना चांगली होण्यासाठी आवडती वस्तू सोडण्यास सांगणे : आम्ही (मी आणि साधक-मित्र श्री. तुकाराम लोंढे) नारायणगाव येथे गेल्यावर श्री. ठुसे यांच्या घरातील पहिल्या माळ्यावरील एका खोलीत रहायचो. आम्ही पहाटे उठून नामस्मरण करायचो. तेव्हा ते आमच्यासाठी पहाटे, सकाळी आणि सायंकाळी असे ४ – ५ वेळा चहा करून तेथे घेऊन यायचे. एकदा त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘आपली साधना चांगली होण्यासाठी आपली आवडती वस्तू सोडली पाहिजे !’’ तेव्हा त्यांची आम्हाला चहा देण्यासाठी होणारी धावपळ पाहून मी त्यांना म्हणालो, ‘‘माझी साधना चांगली होण्यासाठी मी माझी आवडती वस्तू, म्हणजे चहा सोडतो.’’ त्यानुसार त्यांनीच माझ्याकडून ते आतापर्यंत करवून घेतले आहे. ‘तेच विचार देतात आणि त्यांच्या चैतन्यमय वाणीमुळे ती कृती करवून घेतात’, हे मला शिकायला मिळाले.

५ इ. ते आमची साधना होण्यासाठी सर्वकाही करायचे. ते आमची परीक्षाही घ्यायचे आणि वेगवेगळे पदार्थ स्वतः करून आम्हाला खाऊही घालायचे. ते आमच्यावर आई-वडिलांपेक्षा अधिक प्रेमही करायचे.

५ ई. त्यांनी ‘आमची आवड-नावड आणि वासना नष्ट होते ना ? आमची साधना होते का ?’, यांकडे अधिक लक्ष दिले.

५ उ. गोपीभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न सांगणे : ते आम्हाला गोपीभावाविषयी नेहमी सांगायचे. तशी साधना होण्यासाठी ते आम्हाला नामस्मरण आणि भाव निर्माण होण्यासाठी उपाय सांगायचे. ते आम्हाला सांगायचे, ‘‘सर्वकाही श्रीकृष्णच करत आहे. त्याच्याविना दुसरे काहीच नाही. जे काही करावयाचे, ते श्रीकृष्णासाठीच करावयाचे. अगदी लग्न करावेसे वाटले, तर त्याच्याशीच लग्न करायचे !’’

५ ऊ. साधकांच्या आणि सर्वसाधारण व्यक्तीच्या आकलनक्षमतेनुसार ते अध्यात्म शिकवायचे. ते नामस्मरण आणि अध्यात्म यांचे महत्त्व सांगून साधना करवून घ्यायचे.

६. अनाकलनीय वागणे

६ अ. शिरा बनवून त्याच्या वड्या करणे आणि फिरायला जातांना त्या वड्या कुत्र्याला खायला घालणे : एकदा ते मला म्हणाले, ‘‘मी तुम्हाला ‘शिरा कसा करायचा ?’, ते शिकवतो.’’ त्यांनी आमच्यासमोर साजूक तुपावर खमंग रवा भाजून त्याचा शिरा केला. त्याच्या सुंदर वड्या केल्या. आम्हाला वाटले, ‘आपल्याला थोडे खायला मिळेल’; पण त्या सर्व वड्या महाराजांनी डब्यात भरल्या आणि ४ वाजता फिरायला गेल्यावर कुत्र्यांना खायला घातल्या ! असे त्यांचे अनाकलनीय वागणे असायचे.

६ आ. साधकाने आणलेले पेढे मांजरांना खाऊ घालणे : मी बर्‍याच वर्षांनंतर प.पू. काणे महाराज यांना भेटण्यास चाललो होतो; म्हणून मी जातांना समवेत चांगले पेढे घेऊन गेलो. त्यांच्याकडे पेढे दिल्यावर ते म्हणाले, ‘‘कशाला व्यय केलास ? आणलेस, तर असू दे. पेढे चांगले दिसतात.’’ सर्वसाधारणपणे आपण औपचारिकता म्हणून संतांकडे किंवा मंदिरात गेल्यावर नारळ, पेढे, हार-तुरे घेऊन जातो. त्यांतील थोडेसे आपल्याला प्रसाद म्हणून खायला मिळते; मात्र प.पू. काणे महाराज यांनी ते पेढे तसेच ठेवले आणि दुपारी ४ वाजता फिरायला गेल्यावर त्यांनी ते सर्व पेढे आमच्यासमोर मांजरांना खाऊ घातले ! या प्रसंगावरून ‘त्यांना औपचारिकता आवडत नसे’, हे लक्षात आले. ‘संत केवळ औपचारिक कृतीला नव्हे, तर भावाला महत्त्व देतात’, हे यातून मला शिकायला मिळाले.

७. संतांचे ग्रंथलिखाण म्हणजे त्यांचे एक प्रकारचे मृत्यूपत्र​

एकदा प.पू. काणे महाराज मला म्हणाले, ‘‘संतांनी केलेले ग्रंथलिखाण हे त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे असते. ज्याप्रमाणे पुढे ‘मुले चांगली वागणार नाहीत किंवा भावांमध्ये भांडणे होऊ नयेत’, यासाठी वडील मृत्यूपत्र करतात, त्याप्रमाणे संतांनाही समाजाविषयी वाटते; म्हणून ते ग्रंथ लिहितात.’’

८. सनातन संस्थेच्या ग्रंथसंपदेच्या पायाभरणीमध्ये प.पू. काणे महाराज यांनी दिलेल्या ज्ञानाचा मोलाचा वाटा आहे.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक