प्रत्येक व्यक्तीच्या मनात तिच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्यामुळे काही अयोग्य विचार येत असतात. त्या विचारांचा परिणाम होऊन त्याच्याकडून काही अयोग्य कृतीही घडतात. त्याचे जीवनावर बरे-वाईट परिणामही होतात. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत प्रत्येक १ घंट्याने मनाचा आढावा घेण्यास सांगण्यात येतो. त्यात ‘१ घंट्यात मनात कोणते अयोग्य विचार आले ? कोणत्या स्वभावदोषांमुळे आले ? त्यांचा परिणाम काय झाला ?’, याचा आढावा घेऊन सारणीत त्यांची नोंद केली जाते. त्यावर उपाययोजना लिहिण्यात येते. ही प्रक्रिया करतांना प्रारंभी व्यक्तीला नकोशी वाटते; परंतु ‘तिचे महत्त्व लक्षात येऊन कृती करू लागल्यावर साधनेतील आनंद कसा मिळतो ? मनाला लाभ कसा होतो ?’, हे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) मनीषा शिंदे यांच्या अनुभवातून सर्वांना शिकता येईल. ‘त्याचा सर्वांना लाभ होऊन साधक गुरुचरणी समर्पित व्हावेत’, ही गुरुचरणी प्रार्थना ! – संकलक

१. प्रत्येकी १ घंट्याने मनाचा आढावा घेतल्यावर झालेले लाभ
‘माझ्या दोन स्वभावदोषांच्या तीव्रतेमुळे मला मनाचा आढावा घेतांना साधनेतील आनंद घेता येत नसे; परंतु मी त्या स्वभावदोषांमुळे येणार्या प्रत्येक विचाराचा १ घंट्याने आढावा घेऊ लागले. त्यामुळे मला झालेले लाभ येथे दिले आहेत.
अ. मनाचा आढावा घेऊन तो लिहिल्यामुळे माझी सतर्कता वाढली.
आ. गुणवृद्धी आणि भाववृद्धी यांचे ध्येय ठेवून प्रयत्न केल्याने मन स्थिर होऊन आनंदात वाढ झाली.
इ. ‘मनाचा आढावा घेणे, हे प्रभावी शस्त्र आहे’, हे माझ्या लक्षात आले.
ई. १ घंट्यातील प्रसंग आणि अहंचे विचार लिहिल्यामुळे सतर्कता वाढली.
उ. माझ्या मनाची एकाग्रता आणि ऊर्जा वाढली.
ऊ. माझ्या मनातील वैचारिक गोंधळ न्यून झाला.
ए. ‘आपले मन आपल्याला फसवत आहे’, हे आता माझ्या चटकन लक्षात येते.
ऐ. मनाला वारंवार सूचना दिल्यामुळे, आता ‘मी बहिर्मुख आहे का ? मी कुठे उणी पडते ?’, हा भाग माझ्या लक्षात येऊन माझा आनंद वाढतो.
ओ. प्रत्येक क्षणी मनावर आलेली जळमटे त्वरित नष्ट होण्यास साहाय्य होते.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. स्वभावदोष आणि अहं यांचे विचार, मनरूपी चंचलता आणि मनाच्या फसवेगिरीपासून स्वतःला वाचवून ईश्वरी अनुसंधानात रहाण्यास मला साहाय्य मिळते. मला ईश्वराचे अस्तित्व अनुभवता येते.
आ. आपले मन आपल्याला कुठेही अडकवू शकते; पण सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या संकल्पशक्तीमुळे प्रत्येक घंट्याला मनाचा आढावा घेतल्यामुळे मनाची एकाग्रता वाढून स्वतःला अंतर्मुखतेकडे नेता येऊन वाया जाणारा वेळ वाचतो. आपली शिकण्याची वृत्ती वाढते. भावाच्या स्तरावर प्रयत्नांची गती वाढते.
स्वभावदोष आणि अहं रूपी राक्षस मनाचे खच्चीकरण करतात; परंतु ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी दिलेले मनाचा आढावा घेण्याचे शस्त्र किती प्रभावी आहे ?’, हे मला शिकायला मिळाले. त्यांनीच मला ‘आढावा कसा घ्यायचा ?’ हे शिकवले. आढावासेवकांच्या रूपातून त्यांनी माझ्या मनावर ते बिंबवले. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सुश्री (कु.) मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(१७.९.२०२४)