६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आणि सूक्ष्मातील ज्ञान मिळणार्‍या विदेशातील साधिकेचे माहिती मिळण्याचे विविध स्रोत

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने भारतात आलेल्या एका विदेशी साधिकेला सूक्ष्म जगताचे ज्ञान मिळते. तिला हिंदु धर्मातील गोष्टी जाणून घेतांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

 १. साधकांकडून शंकानिरसन करून घेणे

‘जेव्हा मला हिंदु धर्मातील काही गोष्टींविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते किंवा देवतांची सूक्ष्म-चित्रे काढतांना काही प्रश्न असतात, तेव्हा मी समवेतच्या साधिकांना विचारते.

२. देवता आणि संत यांचे चित्रपट पहाणे 

अ. मी साधनेला आरंभ केला, तेव्हा काही भारतीय साधकांनी मला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, तसेच श्री रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावर आधारित जुने कृष्णधवल मराठी चित्रपट पहाण्यास सुचवले होते. या चित्रपटांतून मला संतांची भगवंताप्रती असलेली उत्कट भक्ती शिकायला मिळाली. संतांसारखा आध्यात्मिक भाव आणि श्रद्धा माझ्यात नसल्याने चित्रपट पाहिल्याने मला साधनेचे प्रयत्न वाढवण्याची प्रेरणा मिळाली.

आ. काही मासांपूर्वी मी ‘रामायण’ हा चित्रपट पाहिला. त्यातून मला श्रीरामाची माहिती मिळाली.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या लेखांचे वाचन करणे

सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना ईश्वराने दिलेले विविध विषयांवरील ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करण्यात येते. मराठीतील हे लेख मी ‘गूगल ट्रान्सलेट’च्या साहाय्याने इंग्रजीत भाषांतरित करून वाचत असे. हे लेख अतिशय अभ्यासपूर्ण असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांच्या लेखांतील वैशिष्ट्यपूर्ण शब्द, उदा. ‘आत्मलिंग’ किंवा ‘सप्तर्षि’ असे शब्द मी माझ्या लेखांतही वापरू लागले.

‘जिज्ञासा आणि सतत शिकण्याची वृत्ती’ हे दैवी गुण असलेल्या साधिकेच्या अभ्यासाचा लाभ समाजाला नक्कीच होईल !

‘साधिकेसमवेत सेवा करतांना लक्षात आले की, तिची सेवेची आणि शिकण्याची तळमळ पुष्कळ आहे. तिने एखादा नवीन विषय पाहिल्यास किंवा ऐकल्यास ती त्वरित त्याविषयी जाणून घेते. तिने वेगळे काही पाहिले, तर ती त्यांच्या स्पंदनांचा अभ्यास करते, उदा. केसांची रचना, साधिकांची वेगळी वेशभूषा, विविध प्रकारचे कुर्ते-पायजमे, कुर्त्यांची नक्षी, त्यांच्या बाह्या इत्यादी गोष्टींचे ती निरीक्षण करते. तिने केलेला स्पंदनांचा अभ्यास योग्य असतो. आचारधर्माविषयी तिला काहीही ठाऊक नाही, तरीही ‘एखादी वस्तू चांगली-वाईट अथवा सात्त्विक-असात्विक आहे’, हे ती त्या वस्तूच्या स्पंदनांवरून ओळखते. ‘जिज्ञासा आणि सतत शिकण्याची वृत्ती’ हे दैवी गुण देवानेच तिला प्रदान केले आहेत’, असे मला वाटते.

एका संतांच्या सूक्ष्म-चित्रांचा लाभ जसा समाजाला होतो, तसाच भविष्यात साधिकेच्या या अभ्यासाचा लाभही समाजाला नक्कीच होईल ! यासाठी मी भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४२ वर्षे), फोंडा, गोवा. (एप्रिल २०२४)

४. इंग्रजी भाषेतील भावसत्संग आणि मराठी भक्तीसत्संग ऐकणे 

अ. इंग्रजी भाषेतील भावसत्संगात सांगण्यात येणार्‍या देवतांच्या कथांमधून मला त्यांच्याविषयी माहिती मिळाली, उदा. श्रीरामाप्रती भरताचा भाव कसा होता ? 

आ. मराठी भाषेतील काही भक्तीसत्संग मी ऐकले आहेत. त्यांतील अनेक शब्द मला ठाऊक नव्हते आणि जे पुष्कळ सुंदर होते, उदा. मनोहारी, असे शब्द मी लिहून ठेवत असे. भक्तीसत्संग संपल्यानंतर मी त्या शब्दांचा अर्थ माझ्या साधक मैत्रिणीला विचारत असे. हे सर्व शब्द आध्यात्मिक असत. अशा प्रकारे आध्यात्मिक शब्दांचे शब्दभांडार वाढण्यास मला साहाय्य झाले.

५. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होणार्‍या यज्ञविधींच्या वेळी देण्यात येणारी माहिती 

अ. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार विविध यज्ञ होतात. यज्ञाच्या वेळी श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण हिंदी भाषेत कथन करतात. त्या वेळी मधे मधे त्यांच्या बोलण्यात संस्कृत श्लोकांचाही उल्लेख असतो. त्या वेळी मला नवीन शब्द आणि नवीन संकल्पना शिकायला मिळतात.

आ. यज्ञाच्या वेळी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यज्ञाशी संबंधित माहिती सांगतात. त्या वेळी नव्या आध्यात्मिक संकल्पना समजतात. मी त्या देवनागरी लिपीत लिहून ठेवते. मला त्याचा अर्थ समजला नाही, तर मी मराठी भाषिक साधकाकडून त्याची निश्चिती करून घेते. मी देवनागरी लिपी मुख्यत्वे ‘लॉकडाऊन’च्या काळात शिकले. पुणे येथील एका व्यक्तीने संकेतस्थळ बनवले आहे, जे विनामूल्य ‘ऑनलाईन’ मराठी शिकवते. आरंभी मी देवतांची नावे आणि नामजप लिहिण्यास शिकले. नंतर मी सोपे सोपे मराठी शब्द, दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे मथळे, तसेच संतांची सुवचने लिहून काढू लागले. मराठीचे शिक्षण  देणार्‍या त्या संकेतस्थळावर एक सारणी आहे, त्यात अक्षरांशी जुळणारे ध्वनी दिले आहेत. त्यांचाही मी संदर्भ घेत होते. मी मराठीत काही वाक्ये लिहित असे आणि सहसाधकांकडून ती तपासून घेत असे.

६. माहितीजालावरील (इंटरनेटवरील) माहिती वाचणे 

अ. ज्ञानाची उगमस्थाने असलेल्या वेद, पुराणे, उपनिषदे इत्यादी धर्मग्रंथांची माहिती देणार्‍या संकेतस्थळांवरील लेख मी वाचण्याचा प्रयत्न करते आणि जाणकार साधकांकडून त्याचा योग्य अर्थ समजून घेते.

आ. मी सनातन संस्थेच्या balsanskar.org या संकेतस्थळावरील हिंदु देवता आणि संत यांच्याविषयीच्या छोट्या कथा वाचते. त्यांतून मला माझी व्यष्टी साधना आणि सत्सेवा यांसाठी उपयुक्त ज्ञान मिळते.

७. संस्कृत गाणी शिकणे

मला संस्कृत गीते पुष्कळ आवडत असल्याने मी ती शिकून घेतली आहेत. संस्कृत गाणी शिकतांना मी त्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचे, ज्यामुळे अध्यात्मातील काही संज्ञा मला अधिक सहजतेने समजू लागल्या आणि गाणीही सहजतेने शिकता आली.

– विदेशातील एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २६ वर्षे), ४.३.२०२४

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.