सौ. अवंतिका दिघे यांच्याकडून एका साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

‘सौ. अवंतिका दिघे नागेशी येथील स्वयंपाकघराचे दायित्व सांभाळत आहेत. त्या करत असलेली ही सेवा त्या अतिशय भावपूर्ण करतात. त्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे मी गुरुचरणी अर्पण करत आहे.

सौ. अवंतिका दिघे

१. प्रेमभाव

सौ. अवंतिकाताईंमध्ये मुळातच प्रेमभाव आहे. त्या आश्रमात सणाच्या दिवशी गोड पदार्थ बनवतात. तसेच अन्य वेळीही त्या साधकांसाठी काही विशिष्ट पदार्थ बनवतात. अशा वेळी ताई जे साधक दुपारी घरून जेवून आश्रमात येतात आणि ज्या साधकांची प्रतिदिन महाप्रसादाची नोंद आश्रमात नाही, त्या सर्व साधकांसाठी तो पदार्थ वेगळा काढून ठेवतात अन् ते साधक आल्यावर त्यांना तो आवर्जून देतात.

सौ. देवी कापडिया

२. नीटनेटकेपणा

स्वयंपाकघरातील सर्व वस्तू व्यवस्थित अणि त्या-त्या ठिकाणी आहेत ना ?, याविषयी ताईंचे सतत लक्ष असते. स्वच्छतेच्या संदर्भात ताई अतिशय सतर्क असतात. त्या स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात.

३. सेवेची तळमळ

काही मासांपूर्वी सौ. ताईंच्या पायाचा अस्थीभंग झाला होता. त्या वेळी त्या सेवेसाठी स्वयंपाकघरात येऊ शकत नव्हत्या; परंतु त्या खोलीत बसून महाप्रसादाचे सर्व नियोजन पहात होत्या. त्यांची विचारपूस केल्यावर त्या प्रत्येक वेळी ‘मी गुरुकृपेने ठीक आहे’, असे म्हणत असत.

४. परिपूर्ण सेवा

सौ. ताईंचा प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याकडे कल असतो. प्रत्येक सेवेच्या आधी भावपूर्ण प्रार्थना करणे आणि सेवा लक्षपूर्वक परिपूर्ण करणे, असा त्यांचा प्रयत्न असतो.

५. तत्त्वनिष्ठ राहून चुका सांगून साधनेत साहाय्य करणे

कुणाकडून स्वयंपाकघराशी संबंधित चूक झाल्यास ताई त्या साधकाला तत्त्वनिष्ठ राहून आणि मोकळेपणाने सांगून साधनेत साहाय्य करतात.

‘हे श्रीकृष्णा, ‘मला अवंतिकाताईंसारखी मैत्रीण दिलीस, त्यांच्याकडून मला वरील सर्व गुण शिकता आले’, त्याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. देवी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७२ वर्षे), फोंडा, गोवा. (१८.२.२०२५)