अन्नसेवन आणि यज्ञकर्म

नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते. तेलकट आणि तिखट असे तामसिक अन्न खाण्यापेक्षा सात्त्विक अन्न घेतल्याने मनुष्याचे आध्यात्मिक बळ वाढून त्याला ईश्‍वरी अनुसंधानात रहाणे शक्य होते.

१. अन्नसेवनाला शास्त्राने यज्ञाचे स्थान दिल्यामागील कारण आणि ‘अग्नी’ अन् ‘वन्ही’ यांचा अर्थ

‘अन्नातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-वायूमुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होऊन आपल्या कार्याला बळ, म्हणजेच तेजतत्त्वात्मक ऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेलाच स्थूल आणि सूक्ष्म रूपांमध्ये अनुक्रमे ‘अग्नी’ अन् ‘वन्ही’ असे म्हणतात.

अ. ‘अग्नी’ हे तेजाचे स्थूल-रूप आहे, तर ‘वन्ही’ हे तेजाचे सूक्ष्म-रूप आहे.

आ. स्थूल कार्यासाठी आवश्यक ऊर्जा ‘अग्नी’ पुरवतो, तर शरिरातील रज-तमात्मक बिजांचे विघटन घडवण्यासाठी लागणारी सूक्ष्म-ऊर्जा ‘वन्ही’ पुरवतो. पंचप्राणांच्या गतीतून उत्पन्न होणारी ऊर्जा ही सूक्ष्म, म्हणजे वन्हीरूपात असल्याने तिच्यामुळे सूक्ष्मदेहांचीही शुद्धी होते. म्हणून शास्त्रात नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ही ‘अग्नी’ची आणि ‘वन्ही’ची एक उपासनाच आहे. म्हणूनच तेलकट आणि तिखट असे तामसिक अन्न खाण्यापेक्षा सात्त्विक अन्न खाण्याने मनुष्याचे आध्यात्मिक बळ वाढून त्याला ईश्‍वरी अनुसंधानात रहाणे शक्य होते.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.१.२००५)

२. वैश्‍वानर अग्नीचे स्मरण करण्याची आवश्यकता

अहं वैश्‍वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥

– श्रीमद्भगवद्गीता, १५.१४

अर्थ : सर्व प्राणीमात्रांच्या देहांमधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण आणि अपान वायूंशी संयोग साधतो. अशा या वैश्‍वानर अग्नीचे स्मरण करून अन्नाचे सेवन केल्यास अन्नाचे पचन सहज होते.

– (परात्पर गुरु) पांडे महाराज


‘ईश्‍वरी प्रसाद’ म्हणून ग्रहण केलेले अन्न शरिराला पुष्टी आणि तुष्टी देते !

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥

हा समर्थ रामदासस्वामींचा श्‍लोक सर्वांनाच ठाऊक आहे. अन्नसेवन करतांना नामजप केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि असे सात्त्विक अन्न प्राणशक्ती देते. अन्नालाच ‘पूर्णब्रह्म’ म्हटलेले आहे. अन्न ग्रहण करणे, हे नुसते ‘उदरभरण’ नसून ‘यज्ञकर्म’ आहे. ‘ईश्‍वरी प्रसाद’ म्हणून सेवन केलेले अन्न हे ब्रह्मस्वरूप असून ते शरिराला पुष्टी आणि तुष्टी देते.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज


‘अन्नसेवनाच्या वेळी मनातील रज-तमात्मक विचारांचा परिणाम रक्ताभिसरणावर होतो. त्यामुळे अन्नसेवनाच्या वेळी त्याकडेच लक्ष द्यावे.’ (संदर्भ : मनुस्मृतीवरील स्वामी वरदानंद भारती यांचे भाष्य, पृष्ठ क्र. ६९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.