पणजी, २० मे (वार्ता.) – मडगाव येथील ‘कोविड’ रुग्णालयाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ‘कोविड’ रुग्णालयात आता १७० खाटा असणार, तसेच आवश्यकता भासल्यास एका घंट्याच्या आता अतिरिक्त ३० खाटा वाढवता येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. ‘कोविड’ रुग्णालयाची पूर्वीची क्षमता ६० खाटांची होती.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ‘कोविड’ रुग्णालयाची क्षमता वाढवल्याविषयी डॉ. इरा, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. डिसा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. बांदेकर, आरोग्य खात्याच्या सचिव श्रीमती नीला मोहनन आदींचे आभार मानले आहेत. आरोग्यमंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘रुग्णालयाचा पहिला मजला केवळ ‘बालरोग’ विभागासाठी आरक्षित ठेवला आहे. यामध्ये बालरोग अतीदक्षता विभागाचाही समावेश आहे. या विभागात कोरोनाबाधित असल्याचे निदान झालेला एक ४ मासांचा बालक, १ वर्षाचा १ मुलगा आणि अनुक्रमे ३, ६ आणि ११ वर्षे वय असलेले ३ भाऊ गत आठवड्यात भरती करण्यात आले आहेत.’’