१७ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली आणि प.पू. फडकेआजी यांनी जतन केलेली शेवंतीची २ फुले म्हणजे गुरुचरणांवर अर्पिलेले साधकजीवच !

वैशाख कृष्ण पक्ष पंचमी (११.५.२०२०) या दिवशी प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

११ डिसेंबर २००२ या दिवशी कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांनी श्रीमती फडकेआजी (आताच्या प.पू. फडकेआजी) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली २ फुले दिली. तेव्हापासून आजींनी भावपूर्णरित्या त्या फुलांचे एका डबीत जतन केले. वर्ष २०१५ मध्ये, म्हणजे १३ वर्षांनी ती ताजी टवटवीत दिसतात. त्यानिमित्ताने या फूलरूपी साधक जिवांच्या विषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

प.पू. (श्रीमती ) विमल फडकेआजी

१. एका संतांनी सद्गुरु फडकेआजींनी जपून ठेवलेल्या फुलांविषयी लेख लिहायला सांगितल्याचा निरोप मिळाल्यावर कृतज्ञता वाटणे आणि फुलेच आत्मनिवेदन व्यक्त करत असल्याचे जाणवणे

वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली शेवंतीची फुले (वर्ष २०१५)

रामनाथी आश्रमातील साधिका कु. तृप्ती कुलकर्णी हिने मला निरोप दिला की, एका संतांनी तुला सद्गुरु फडकेआजींनी जपून ठेवलेल्या फुलांविषयी लेख लिहायला सांगितला आहे. हा निरोप ऐकूनच २ पुष्परूपी साधकांविषयी लेख लिहायची संधी मिळाली; म्हणून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी ‘ती फुलेच जणू त्यांचे आत्मनिवेदन व्यक्त करत आहेत’, असे मला जाणवले. फुलांनी व्यक्त केलेले त्यांचे मनोगत पुढे देत आहे.

सौ. नम्रता दिवेकर

१ अ. आध्यात्मिक प्रवासाची वाटचाल फुलांनी त्यांच्या शब्दांत सांगणे : आमचा जन्म झाला ११ डिसेंबर २००२ या दिवशी ! हा दिवस आमच्यासाठी खर्‍या अर्थाने भाग्याचा ठरला; कारण त्या दिवशी साक्षात् भगवंतस्वरूप असणार्‍या परात्पर गुरुमाऊलींच्या चरणांवर अर्पण होण्याची आम्हाला संधी मिळाली. आम्ही कृतकृत्य झालो. गुरुदेवांच्या चरणांचे त्या वेळी छायाचित्रही काढण्यात आले. हा क्षण कायमसाठी संग्रहित होणार असल्याने आम्हालाही पुष्कळ आनंद झाला. ‘गुरुदेवांच्या चरणांवर अर्पित झालो, आता आणखी काय हवे ?’ अशा विचारात असतांना कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी आम्हाला एका समष्टी सेवेची संधी दिली. सर्व फुलांमधून आम्हा दोन फुलांना त्यांनी श्रीमती फडकेआजी (आताच्या प.पू. फडकेआजी) यांच्या हाती सोपवले. साक्षात् देवाच्या चरणी अर्पण झालेली फुले मिळाल्याने आजींनाही पुष्कळ आनंद झाला होता. देवाचा चरणस्पर्श लाभल्याने आम्हीही आनंदित झालो होतो. त्याच दिवसापासून आमच्या आध्यात्मिक प्रवासाला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला.

१ आ. पू. फडकेआजींच्या सहवासातील अनमोल क्षणांचे साक्षीदार झाल्याचे फुलांनी कृतज्ञताभावाने सांगणे : आजींच्या घरी एका डबीत असूनही त्यांच्या सहवासातील अनेक अमूल्य, अनमोल आणि भावस्पर्शी क्षणांचे आम्ही जणू साक्षीदारच ठरलो. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. आजी यांची अनेकदा झालेली भावभेट या पुष्परूपी नेत्रांत आम्ही साठवून ठेवली आहे. पू. आजींवर झालेली अनिष्ट शक्तींची आक्रमणेही आम्ही जवळून पाहिली. त्यांच्या अखंड चालू असणार्‍या नामानुसंधानात आम्ही प्रतिदिन चिंब भिजत होतो. ‘त्यांच्या अत्युच्च भावामुळेच आमचा टवटवीतपणा टिकून राहिला’, असेच आम्हाला वाटते. त्यांचा देहत्यागही आम्हाला पहाता आला. त्यानंतरही अनेक सद्गुरु आणि संत यांनी पू. आजींच्या घरी भेट दिल्यावर आम्हाला हातात घेतले. त्यांच्या चैतन्यामुळे ‘आम्ही प्रतिदिन पावन होत आहोत’, असेच आम्हाला वाटत होते. दिवस गेले, अनेक वर्षेही गेली. आम्हाला येणारा तारक सुगंध हळूहळू मारक होऊ लागला.

१ इ. एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. योया वाले यांनी केलेल्या सूक्ष्म परीक्षणातून गुरुदेवांच्या कृपेमुळेच टिकून असल्याचे लक्षात येणे आणि १३ वर्षे फुले तशीच रहाणे, ही विज्ञानवाद्यांसाठी चपराक असणे : एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. योया वाले यांनी आमचे सूक्ष्म परीक्षण केले. त्या वेळी आमच्यातून शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रसारित होत असल्याचे त्यांनी सूक्ष्म चित्राद्वारे दाखवून दिले. त्या चित्रात त्यांनी आमच्याभोवती ‘फुलांचे रक्षण करणारी आनंदमय शक्ती’ असेही रेखाटले होते. ती शक्ती केवळ आणि केवळ गुरुदेवांचीच होती अन् अजूनही आहे. त्यांच्या कृपेनेच आम्ही अजूनही आहोत. तेच आमचे अनेकदा कौतुक करतात. खरेतर कौतुक त्यांचेच आहे, सर्व श्रेयही त्यांचेच आहे; कारण १३ वर्षे होऊनही आम्ही आहोत, ही केवळ त्यांचीच कृपा आहे. कुठलेही फूल इतकी वर्षे कधीच राहिले नसेल; पण आम्ही (गुरुदेवांमुळे) राहिलो, ही विज्ञानवाद्यांसाठी चपराकच म्हणावी लागेल.

१ ई. शेवटच्या क्षणापर्यंत अखंड सेवा करवून घेण्याविषयी फुलांनी केलेली भावपूर्ण प्रार्थना ! : भगवंताने आम्हाला त्याच्या चरणांवर घेऊन आमचा उद्धार केला आहे. आमचे निर्माल्य होऊ न देता देवाने आतापर्यंत आमच्याकडून अखंड सेवाच करवून घेतलेली आहे. आमच्यातील ताजेपणा आणि टवटवीतपणा तसाच रहाणे, ही गुरुमाऊलींची कृपाच आहे. ‘आमच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत अशीच अखंड सेवा करवून घ्यावी’, अशी आम्हा पुष्परूपी जिवांची त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.

फुलांनी अतिशय भावपूर्ण आणि कृतज्ञतापूर्वक शब्दांत व्यक्त केलेले मनोगत ऐकून माझी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. फुलांच्या माध्यमातून गुरु-शिष्य यांच्या भेटीतील अनुभवलेले अद्वितीय क्षण

प.पू. फडकेआजी यांना भेटायला परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या घरी यायचे, तेव्हा ते डबीत ठेवलेली फुले पहायचे. एकदा ते म्हणाले, ‘‘आजी, तुमच्यामुळे ही इतकी चांगली राहिली आहेत.’’ तेव्हा पू. आजी त्यांना (त्यांच्याकडे बोट दर्शवून) म्हणाल्या, ‘‘तुमच्या कृपेमुळेच ती चांगली राहिली आहेत.’’ यावर पुन्हा ते म्हणाले, ‘‘पण आजी, तुमचा तेवढा भाव आहे ना !’’ मग आजी पुन्हा म्हणाल्या, ‘‘माझा कुठला भाव ! तुमच्यामुळेच ती चांगली राहिली.’’ यावर परात्पर गुरुदेव हसले. त्यांचे हे बोलणे चालू असतांना मीही तेथे होते. तेव्हा त्या दोघांचे बोलणे ऐकून आणि फुले ताजी राहिल्याचे श्रेय स्वतःकडे न घेणे यांतून गुरु-शिष्याच्या नात्यातील अद्वितीयता अन् अनन्य भक्ती अनुभवता आली.

३. फुलांना पाहिल्यावर साधकांच्या भावानुसार त्यांच्याकडून उमटणारा प्रतिसाद

सद्गुरु आजींची खोली पहायला अनेक साधक येतात. इतकी वर्षे होऊनही फुले तशीच राहिल्याचे पाहून प्रत्येकाच्या तोंडवळ्यावरील भाव वेगवेगळा जाणवतो. कुणाला आश्‍चर्य वाटते, तर कुणाला अगाध लीला करणार्‍या परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटते. काहींना ती फुले भावावस्थेत असल्याचे वाटते, तर काही साधकांना ती फुले नामजप करत असल्याची अनुभूती येते.

साधकांना फुलांविषयी माहिती सांगत असतांना फुलांमध्येही पुष्कळ जिवंतपणा असल्याचे जाणवते.

४. शेवंतीच्या दोन्ही फुलांचा प्रवास

झाडांवर येणार्‍या अनेक फुलांचे आयुष्य किंवा त्यांचा प्रवास वेगवेगळा असतो. काही फुले कुणाच्या केसांत माळली जातात, तर काही फुले हार-तोरण यांसाठी वापरली जातात. काही फुले झाडावरच राहून कोमेजून जातात. काही मोजकीच फुले इतकी भाग्यवान असतात की, ती मंदिरातील देवाच्या चरणी किंवा एखाद्या उच्च कोटीच्या संतांच्या चरणी अर्पण होतात आणि त्यांचे आयुष्य खर्‍या अर्थाने सार्थकी लागते. हेच महद्भाग्य या शेवंतीच्या २ फुलांना लाभले ! सनातनच्या संतांच्या घरी राहून आपले आध्यात्मिक जीवन त्यांना गुरुचरणी समर्पित करता आले. दोन्ही फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे एका वेळी एकाचा रंग पालटू लागला किंवा एकाचा सुगंध न्यून झाला, असे कधीच झाले नाही. दोन्ही फुलांची वाटचाल समप्र्रमाणातच होत आहे. त्यामुळे ‘ही फुले नसून जणू गुरुचरणांवर अर्पिलेले साधकजीवच आहेत’, असेच वाटते.

५. कृतज्ञता

१७ वर्षांपूर्वी गुरुचरणांवर अर्पिलेल्या लहानशा २ फुलांची आध्यात्मिक स्तरावर वाटचाल करून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे महान गुरु आम्हाला लाभले, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘हे गुरुदेवा, या फुलांनी ज्याप्रमाणे गेली १७ वर्र्षे अथकपणे गुरुचरणी आपले आयुष्य समर्पित करून प्रत्येक क्षण घालवला, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणी तुम्हाला अपेक्षित अशी साधना होण्यासाठी आमच्याकडून तळमळीने प्रयत्न होऊ देत’, हीच आपल्या चरणी आर्त प्रार्थना !’

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (प.पू. फडकेआजी यांची नात) (६.५.२०२०)

परात्पर गुरु डॉक्टर प.पू. फडकेआजींशी बोलत असल्याचे पाहून साधिकेला त्यांचे कौतुक वाटणे, तेव्हा प.पू. आजींनी तिला ‘परात्पर गुरु डॉक्टरांना केवळ भाव हवा असल्याचे सांगून असाच भाव ठेवल्यास ते तुझ्याशीही बोलतील’, असे सांगणे 

सौ. मनीषा गाडगीळ

‘वर्ष १९९३ ते २००२ या कालावधीत प.पू. फडकेआजींना एखादी वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास किंवा साधनेविषयी काही शंका असल्यास त्या काही वेळा परात्पर गुरु डॉक्टरांना दूरभाष करून सांगायच्या, तसेच त्यांना काही अडचण आल्यासही त्या काही वेळा परात्पर गुरु डॉक्टरांना विचारायच्या. ते पाहून एक दिवस मी प.पू. आजींना म्हणाले, ‘‘तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात. तुम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांशी लगेच दूरभाषवर बोलता येते.’’ त्या वेळी त्या मला म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना केवळ भाव हवा असतो. बाकी काही नको. तूही असाच भाव ठेव, म्हणजे ते तुझ्याशीही बोलतील.’’ त्यानंतर मला काही प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टरांशी दूरभाषवर बोलण्याची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. आजींच्या बोलण्याची मला प्रचीती आली.’ – सौ. मनीषा गाडगीळ (मुलगी), सनातन संकुल, देवद, पनवेल. (२०.४.२०२०)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक