ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘इस्लाम चॅनल’कडून जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन

ब्रिटनकडून चालू करण्यात आली चौकशी !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे प्रसिद्ध ‘इस्लाम चॅनल’ नावाच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर हिंसक इस्लामी चळवळींचे कौतुक करण्याचा, पाश्‍चात्त्य देशांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा आणि जिहादी कारणे सहानुभूतीपूर्वक मांडण्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून ब्रिटनच्या या संदर्भात चौकशी करणार्‍या ‘ऑफकॉम’ संस्थेकडून चौकशी चालू करण्यात आली आहे. ही वाहिनी प्रतिदिन २० लाख लोक पहातात, असा दावा केला जातो.

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ‘इस्लाम चॅनल’ने हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचे कौतुक केले होते. तसेच इस्रायलची तुलना नाझींशी केली होती. यावरून या वाहिनीने आतंकवाद्यांना साहाय्य केले, वार्तांकनात निष्पक्षता राखली नाही आणि महत्त्वाच्या तथ्यांविषयी प्रेक्षकांची दिशाभूल केली, असा आरोप करण्यात आला.

१. ‘ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट फॉर ब्रिटीश इस्लाम’चे संचालक डॉ. ताज हरगाई यांनी ‘ऑफकॉम’कडे या संदर्भात तक्रार केली. डॉ. हरगाई हे ब्रिटीश इस्लाममध्ये उदारमतवादी विचारवंत मानले जातात. त्यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत ‘इस्लाम चॅनल’ने प्रसारण नियमांचे सतत उल्लंघन केले.

२. डॉ. हरगाई यांनी आरोप केला की, ही वाहिनी ‘इस्लामला पश्‍चिमेकडून धोका आहे’, असे चित्रित करते आणि हमास, इराण अन् ‘इस्लामी जिहादी गटांना पाश्‍चात्त्य धर्मनिरपेक्ष लोकशाहींविरुद्ध कायदेशीर प्रतिकार चळवळी’ या रूपात चित्रित करते. गाझाच्या बातम्यांमध्ये ती एकतर्फी भूमिका घेते आणि इस्रायल समर्थक वक्त्यांना जागा देत नाही.

३. डॉ. हरगाई पुढे म्हणाले की, इस्लाम चॅनल ‘वहाबी’ आणि ‘सलाफी’ इस्लामचा प्रचार करते अन् शिया, सूफी, अहमदी आणि धर्मनिरपेक्ष मुसलमान यांच्याकडे दुर्लक्ष करते. ‘इस्लाम चॅनल’ ब्रिटनमधील धोकादायक इस्लामी कट्टरतावादाचे प्रतीक आहे. हे चॅनल ‘ब्रिटीश मुसलमानां’चे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करते; परंतु चॅनलच्या संकुचित वृत्तीतून मुसलमान अतिरेकीपणा आणि धर्मांधता यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘आपण आणि ते’ या विचारसरणीला खतपाणी घालते, ज्यामुळे समाजातील एकता बिघडते. ऑफकॉमने या चॅनलच्या प्रक्षोभक भाषेवर आणि ब्रिटीश मूल्यांवर विश्‍वास न ठेवणार्‍या पक्षपाती असणार्‍यांवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. त्याचीच ही झलक आहे. येत्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये काश्मीरसारखी स्थिती निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! कदाचित् असे घडल्यानंतरच पाश्‍चात्त्य देशांना हिंदूंचे दुःख समजून येईल, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती नाही !