महाकुंभ २०२५ : केवळ भारतातच शक्य होणारा आश्चर्यजनक सामाजिक सुसंवाद !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.’’ नुकत्याच प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळ्याला आतापर्यंत ६६ कोटी भाविकांनी भेट दिली आहे. येथील चांगले नियोजन आणि परिसराची स्वच्छता हे खरोखरच पहाण्यासारखे आहे.

१. ‘गिनिज बुक’ने नोंद घेतलेले जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठे संमेलन

वाहतूक वगैरे लक्षात घेता जवळजवळ ६६ कोटी लोकांची व्यवस्था इतर कोणताच देश करू शकणार नाही. १३ जानेवारी २०२५ पासून जेवढ्या संख्येने लोकांनी प्रयागराज येथील महाकुंभला भेट दिली, हे पाहिले, तर चीन आणि भारत हे दोन देश सोडले, इतर कोणताही देश त्या लोकसंख्येच्या आसपासही जाऊ शकत नाही. जगाच्या इतिहासात ‘गिनिज बुक’ने नोंद घेतलेले अधिकृतरित्या आयोजित केलेले असे सर्वांत मोठे संमेलन होते.

मारिया वर्थ

२. कुंभमेळ्याचे आयोजन आणि गंगास्नानाचे महत्त्व

सर्व लोक १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत का आले होते ? ते केवळ आध्यात्मिक कारणासाठी एकत्र आले होते. भारतीय परंपरेनुसार आकाशातील नक्षत्र आणि राशी यांच्या ठराविक रचनेच्या वेळी गंगा, यमुना अन् भूमीत असलेली सरस्वती या नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान केले जाते. ही स्थिती १२ वर्षांनी परत परत येते आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हे स्नान पुष्कळ लाभदायक आहे. हे स्नान मुक्तीसाठी म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी साहाय्य करते. या स्नानामुळे केवळ ऊर्जा मिळते, असे नाही, तर ते प्रत्येकाला आध्यात्मिकतेशी जोडते. हे स्नान व्यक्तीला जगाशी आणि स्वर्गीय गोष्टींशी, तसेच पूर्वीच्या अनेक पिढ्यांना जोडते.

३. भारताचे वैशिष्टय

जरी सगळीकडे एवढी गर्दी असली, तरी प्रत्येक जण चांगला, संयमी आणि दुसर्‍यांना सामावून घेणारा दिसून येतो, हे आश्चर्य आहे. ही अविश्वसनीय गोष्ट आहे. सर्व वातावरण उत्साहवर्धक आहे. वातावरणात भक्ती आणि आनंद आहे. इथे आपण मानवतेशी जोडलेलो आहोत, अशी भावना निर्माण होते. इथे केवळ भारतीय नाही, तर विदेशी लोकही येतात. त्यांची संख्या जवळजवळ १ कोटीपर्यंत पोचली आहे. पूर्व युरोपमधील एक महिला एवढ्या प्रमाणात चांगल्या लोकांमध्ये तिच्या असण्याविषयी सांगत होती, तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते आणि तिचा आवाज कंप पावत होता.

४. भेद न ठेवता सर्वांना सामावून घेणारा कुंभमेळा !

मलाही प्रत्येकामध्ये असलेला चांगुलपणा भावला. इथे श्रीमंत-गरीब, तरुण- वृद्ध, शिक्षित-अशिक्षित अशा पार्श्वभूमीचे लोक होते. प्रत्येकाची आराधना करण्याची पद्धती वेगळी होती. कुणी शिव, विष्णु, देवी, गणेश, श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांचे भक्त असले, तरी काही भेद नव्हता. कुणी अद्वैत सिद्धांत पाळतो, तर कुणी द्वैत सिद्धांत ! काही भेद नव्हता. तुम्ही कोणत्या जातीचे आहात, यातही भेद नव्हता. अत्युच्च सामाजिक सुसंवादाचे हे अतिशय चांगले उदाहरण आहे. गुप्त स्रोतांकडून पैसे घेऊन चुका काढणारे आणि समाजात फूट पाडण्यास प्रोत्साहन देणारे नसतील, तरच ते होऊ शकते.

५. काही छुप्या शक्तींचे कारस्थान

काही शक्तींना हे कुंभमेळ्याचे प्रदर्शन आणि सामाजिक एकोपा का आवडत नाही ?, हे समजणे कठीण आहे. ते फूट पडलेल्या समाजाला प्राधान्य देतात. जर हिंदू आणि ज्यांनी या महाकुंभाचे आयोजन केले, ते नाथ परंपरेतील महंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर संकट येऊन ते अडचणीत आले, तर या शक्तींना त्याविषयी काहीही वाटणार नाही. अलीकडेच ‘यू.एस.ए.आय.डी.’ (‘युनायटेट स्टेट एजन्सी फॉर इंटरनल डेव्हलपमेंट’ – अंतर्गत विकासासाठी अमेरिकेतील एजन्सी) मध्ये झालेला घोटाळा दर्शवतो की, या छुप्या शक्ती केवळ माध्यमांमध्ये कार्यरत नाहीत, तर शिक्षण आणि अशासकीय संस्थांमध्येही कार्यरत आहेत. हिंदू नावे असलेल्या काही राजकारण्यांनीसुद्धा अहिंदू मतपेढीशी मिंधे होऊन कुंभमेळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.

६. चेंगराचेंगरी आणि आयोजक कलंकित !

दुर्दैवाचे म्हणजे २९ जानेवारी २०२५ या दिवशी चेंगराचेंगरी होऊन ३० यात्रेकरू मृत्यू पावले आणि ६० यात्रेकरू घायाळ झाले. त्यासंबंधी अन्वेषण चालू आहे. ही घटना घडली, त्या वेळी या गर्दीत असलेल्यांपैकी एकाने फेसबुकवर सांगितले, ‘३० ते ४० जणांच्या तरुण मुलांच्या गटाने अडथळ्यांवरून उड्या मारल्या आणि इतरांना तसे करण्यास प्रोत्साहन देऊन चेंगराचेंगरी करण्यास प्रवृत्त केले.’

७. गंगेच्या पाण्यात पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा !

‘प्रयागराज येथील गंगेच्या पाण्याचा दर्जा अंघोळ करण्यासाठी योग्य नाही’, असे सांगून महाकुंभची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न झाला. या दाव्याचा प्रसार अनेक प्रसारमाध्यमांनी केला. मूलतः स्वतःचे शुद्धीकरण करण्याची क्षमता गंगेच्या पाण्यात आहे, हे ज्ञान भारतामध्ये आहे. उत्तरप्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाकुंभच्या वेळी डॉ. सोनकर यांनी केलेल्या संशोधनातून गंगेच्या पाण्यात १ सहस्र १०० प्रकारचे ‘बॅक्टीरिओफेज’ हे पाण्यातील हानीकारक बॅक्टेरिया नष्ट करणारे जीवाणू आहेत, ही माहिती समजली. गंगेची यंत्रणा सिद्ध करते की, जरी ६६ कोटी भाविकांनी गंगेत स्नान केले, तरी तिचे पाणी दूषित होत नाही.

८. महिलांच्या अवमानाची खोटी वृत्ते प्रसारित

महिला जरी ओल्या कपड्यांनिशी नदीतून बाहेर येत होत्या, तरी त्यांच्यासाठी वातावरण एकदम सुरक्षित होते. हार विकणारी एक तरुण मुलगी तिचे सौंदर्य आणि शांतपणा यांमुळे सामाजिक माध्यमांसाठी संवेदनशील वृत्त निर्माण करणारी ठरली. तिची प्रशंसा करण्यात आली; परंतु मादकता निर्माण करणार्‍या मुली या क्षेत्रापासून दूर होत्या. दोन सामाजिक माध्यमांच्या खात्यावर कुंभमेळ्यात स्नान करणार्‍या महिलांच्या चित्रफिती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी या घटनेला प्रसिद्धी दिली. गुन्हे नोंदवून अशी खाती चालवणार्‍यांचा उत्तरप्रदेश पोलीस शोध घेत आहेत.

९. टीका करणार्‍यांनो, साधूंचे जीवन अभ्यासा !

सत्यासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य वाहिले आणि जे हिमालयातील गुहांमध्ये रहातात किंवा भिक्षा मागत भटकंती करतात, असे साधू कुंभमेळ्यामध्ये होते. स्नानाखेरीज लोकांना इतरही काही आकर्षणे होती. हे साधू किंवा साधक वेगवेळ्या आखाड्यात होते, त्यांच्या परंपरा वेगवेगळ्या होत्या; परंतु या भेदाविषयी कुणाला काही वाटत नव्हते. त्या सर्वांना जीवनाला अर्थ येण्यासाठी आध्यात्मिक स्तराला पोषण पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रचंड शक्तीमुळे वातावरणाचा स्तर वाढला होता. त्यांची मोठी संख्या भारताच्या प्राचीन संस्कृतीची शक्ती आणि चेतना दर्शवत होती. हे साधू दिसायला जरी विचित्र दिसले, तरी आपण त्यांच्या साधनेला न्यून लेखू शकत नाही. त्यांच्याकडे गूढ शक्ती असू शकतात.

१०. हिंदु धर्माचे आचरण सर्वांनी करणे आवश्यक !

स्वतंत्र विचार असलेले जर अब्जावधी लोक एका लहान प्रदेशात शांततेने एकत्र येऊ शकतात, तर या पृथ्वीवर ८०० कोटी लोक शांततेने का राहू शकत नाहीत का ? गेल्या दशकापासून ‘आम्हाला जगातील लोकसंख्या पुष्कळ प्रमाणात न्यून केली पाहिजे’, असे म्हणणार्‍या अनेकांचे बिल गेट्स प्रतिनिधी असू शकतात. याउलट इलॉन मस्क या मताच्या विरुद्ध असून ते म्हणतात, ‘आम्हाला अजून लोकांची आवश्यकता आहे.’ भारतात लोकसंख्या अधिक असल्याने येथील लोक कदाचित् बिल गेट्स यांच्याशी सहमत होतील; परंतु पृथ्वी लोकसंख्येचे प्रमाण अधिक होण्यापासून पुष्कळ लांब आहे.

कल्पना करा, पृथ्वीवरील सर्व लोकांचे आफ्रिकेत स्थलांतर झाले, तर काय होईल ? याचा अर्थ असा की, जर आफ्रिकेमध्ये १४ अब्ज लोक असले, तर तो देश भारताप्रमाणे दाट लोकवस्ती असलेला होईल. उत्तरप्रदेश आणि बिहार यांचे क्षेत्रफळ जर्मनीएवढे आहे. जर्मनीमध्ये ८३ दशलक्ष लोकसंख्या आहे, तर भारतातील या दोन राज्यांतील मिळून एकूण लोकसंख्या ३४५ दशलक्ष आहे.

भारताच्या पातळीला यायला जर्मनीला त्याच्या सीमारेषेवरील फ्रान्स, इटली, स्पेन, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील लोकांना सामावून घ्यावे लागेल. हे कल्पनातीत आहे. मी ऋषिकेशमध्ये (उत्तराखंड) एका स्पेनमधील मुलीला हे सांगितले. ‘लोक एकमेकांचे गळे धरतील’, अशी तिची प्रतिक्रिया होती, तसेच वन्यजीवन काही रहाणार नाही.  ‘आपल्याप्रमाणे इतर लोकांना (ज्यामध्ये प्राण्यांचाही समावेश आहे) पृथ्वीवर रहाण्याचा अधिकार आहे’, असे हिंदू सहज स्वीकारतात. इथल्या हवेमध्ये आध्यात्मिकता आहे. देवाविषयीची भक्ती नैसर्गिकपणे व्यक्त केली जाते. जगातील सामाजिक एकोप्याचे ते सर्वांत उच्च आदर्श आहेत. त्याचा पुरावा म्हणजे प्रयागराज येथील महाकुंभ आहे. हिंदूंना ठाऊक आहे, ‘आम्ही त्या एका महान ईश्वराची किंवा ब्रह्माची आपण सर्व मुले आहोत आणि आपल्या प्रत्येकामध्ये तो एक ईश्वर आहे.’ जर जगभरात सर्व लोकांची हिंदूंप्रमाणे अशी उदार आणि हुशार मनोवृत्ती असेल, तर किती चांगले झाले असते !

– मारिया वर्थ, हिंदु धर्म अभ्यासिका, हरिद्वार, उत्तराखंड.