महाकुंभमेळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

६६ कोटींहून अधिक भाविकांच्या स्नानानंतर महाकुंभमेळ्याची सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे दर्शन झाले. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

१. कुंभमेळ्यात कुठेच जातीभेद आढळला नाही !

हिंदु धर्माविषयी अन्य पंथीय, पुरो(अधो)गामी, साम्यवादी यांच्याद्वारे सातत्याने ‘जातीभेद पाळला जातो, खालच्या जातीच्या लोकांना वेगळी वागणूक मिळते, त्यांना दूर ठेवले जाते अथवा विशिष्ट अंतर राखून व्यवहार होतात’, अशी मांडणी केली जाते. आता या जात्यंधांनी दाखवावे की, महाकुंभमेळ्यात कुठे ब्राह्मण, मराठा, दलित अशी जातनिहाय अंघोळीची व्यवस्था होती का ? येथे कुठेच असे नव्हते. लोक कुठेही स्नान करू शकत होते, वेगळी स्नानाची व्यवस्था नव्हती. जातीव्यवस्था हिंदूंमध्ये असली असती, तर ती दिसली असती, येथे कुठेच ती औषधालाही नव्हती. उलट स्वच्छता कर्मचार्‍यांची अधिक चर्चा होती. ते कशा प्रकारे येथे स्वच्छता करत आहेत ? मुख्यमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अन् पोलीस अधिकारी यांनी महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या समवेत बसून जेवण केले. एका प्रथितयश इंग्रजी वृत्तवाहिनीने मात्र ‘स्वच्छता कर्मचारी मैला स्वच्छ करत असल्यामुळे कुंभमेळा चालू आहे’, असे हिंदूंवर टीका करणारे आणि हिंदूंचा अवमान करणारे वृत्त दिले.

श्री. यज्ञेश सावंत

२. ५ लाख लिटर गंगाजलाचा पुरवठा !

उत्तरप्रदेश शासनाने उत्तरप्रदेशातील जे भाविक संगमावर अथवा गंगा घाटांवर स्नानासाठी पोचू शकले नाही, त्यांना घरपोच गंगाजल पोचवण्याची व्यवस्था केली आहे. सरकारकडून एकूण ५ लाख लिटर गंगाजल ७५ जिल्ह्यांच्या मुख्यालयांमध्ये पाठवले जाणार आहे. यासाठी अग्नीशमन विभागाच्या बंबांची व्यवस्था करण्यात आली असून त्या गाड्यांद्वारे हे गंगाजल उत्तरप्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात गरजूपर्यंत पोचवले जाणार आहे.

प्रयागराजची क्षमता २५ ते ३० लाख लोक एका वेळी राहू शकतील, वास्तव्य करू शकतील एवढीच आहे. असे असतांना तिथे महाकुंभाच्या काळात एकाच वेळी ७ ते ८ कोटी लोक वास्तव्याला होते, त्यांचे चलनवलन, खाणे-पिणे झाले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘स्थानिकांच्या सहकार्याविना कोट्यवधी लोकांचा वावर कुंभक्षेत्री शक्य नव्हता’, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

कुंभमेळ्यामुळे सरकारला लाभ किती ?


१. कुंभमेळ्यामुळे एकूण ३ लाख २५ कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे. यामध्ये हॉटेल व्यवसाय, लॉज, होम स्टे (घरगुती रहाण्याची व्यवस्था), चहा-दूध विक्री, अन्नपदार्थ आणि खाण्याचे सामान, प्रवासी वाहतूक इत्यादी व्यवस्थांचा समावेश आहे. या कुंभमेळ्यात ४५ सहस्र कुटुंबांहून अधिक कुटुंबांना काम मिळाले आहे. सरकारला २५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याचे संकेत होते. सरकारने कुंभमेळ्यासाठी ७ सहस्र ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्या तुलनेत सरकारला महसुलाच्या रूपाने अनेक पटींनी लाभ झाला आहे. हे केवळ महाकुंभमेळ्याच्या जागतिक आयोजनात शक्य आहे.

२. जपान येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिकसाठी १५ अब्ज डॉलर्सचा (१ लाख २७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपये) व्यय करण्यात आला होता. त्या तुलनेत उत्पन्न केवळ ५ अब्ज डॉलर्सचे (४२ सहस्र ५०० कोटी रुपये) मिळाले होते. वर्ष २०२० मधील ‘फिफा वर्ल्डकप’साठी २२० अब्ज डॉलर्सचा (१८ लाख ७० सहस्र कोटी रुपये) व्यय करण्यात आला होता, त्यातून केवळ १७ अब्ज डॉलर्सचे (१ लाख ४४ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) उत्पन्न मिळाले. त्या तुलनेत कुंभमेळ्याने केवळ प्रयागराज येथेच उत्पन्न वाढवून दिले नाही, तर प्रयागराज येथे आलेले भाविक नंतर वाराणसी, अयोध्या येथेही प्रचंड संख्येने गेले. त्यामुळे तेथेही कोट्यवधी रुपयांचा व्यापार झाले.

३. कुंभक्षेत्री केवळ १ रुपया या दराने ‘दातून’ (कडुनिंबाच्या झाडाची दात घासण्यासाठीची काडी) विकणार्‍या व्यक्तीने लाखो रुपये कमावले. स्वत:च्या होड्यांद्वारे भाविकांचा प्रवास घडवणार्‍या नावाड्याने २३ लाखांहून अधिक उत्पन्न या २ मासांच्या कालावधीत कमावले. कुंभक्षेत्री २ मासांच्या कालावधीत स्वत:चा नियमितचा कामधंदा सोडून कुणी चहावाले, कुणी वडेवाले, कुणी दुकानदार बनून उत्पन्न कमावले.

– श्री. यज्ञेश सावंत

३. ‘इलाहाबाद’च्या खुणा अजूनही !

‘इलाहाबाद’चे मूळ नाव प्रयागराज’, असे सरकारने पालटले असले, तरी अजूनही प्रयागराजमध्ये इलाहाबादचे फलक नागरी वस्त्या, वसाहती, सार्वजनिक ठिकाणे येथे दिसले. लोकांची मानसिकताही जाणवली की, ते इलाहाबाद म्हणण्यावर आणि त्याचा उपयोग करण्यावर अधिक भर देतात.

४. कुंभमेळ्यात काही साधूंचे अयोग्य वागणे

अ. अनेक आखाड्यांच्या छावण्या असलेल्या रस्त्यावरील छोटी कुटी करून रहाणार्‍या एका नागा साधूने स्वत:च्या ‘मी जननेंद्रियाला दुचाकी बांधून त्यावर कितीही जणांना बसवा मी ती ओढून दाखवतो, नागा साधूंची शक्ती दाखवतो. सनातन धर्माची शक्ती दाखवतो’, असे आव्हान उपस्थित हिंदूंना दिले. प्रत्यक्षात त्यांनी दुचाकी हाताने ओढल्याचे लक्षात आले. तरीही उपस्थित हिंदूंनी साधूंचा जयजयकार केला; मात्र दबक्या आवाजात ‘साधूंनी फसवणूक केली’, अशी चर्चाही केली. या युवा नागा साधूने हा प्रयोग दाखवण्यापूर्वी मोठा आवेश केला. लोक आणि प्रसारमाध्यमे यांना गोळा होण्यास सांगितले. ढोल वाजवण्यास सांगितले. उपस्थित प्रत्येकाला १० रुपये ठेवण्याची मागणी केली. पुढे ते युवा साधू नंतर किन्नरांसमवेत विक्षिप्त पद्धतीने नाचत होते.

आ. एका पत्रकाराला नागा साधूने ‘वाईट शक्तीला पकडून दाखवतो’, असे सांगून नंतर पैशांची मागणी केली. तेव्हा ते साधू त्या पत्रकाराला ओरडून ‘तू पैसे ठेव, तुला चमत्कार दाखवला आहे, पैसे ठेव नाही तर बघ’, असे म्हणून दरडावू लागले.

५. ‘एरोबिक्स’द्वारे (संगीताच्या तालावर केला जाणारा व्यायाम प्रकार) साधना समजावणारा संप्रदाय !

कुंभमेळ्यात अनेक संप्रदायांचे मंडप लागले होते. त्यातील ‘एका संप्रदायाकडे तरुण वर्गाचा ओढा अधिक असतो’, असे त्यांच्या प्रचारकांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना गेल्यावर आढळले की, संप्रदायातील साधकांनी नामजप करत, एरोबिक्स करणे, नृत्य करणे, धर्मग्रंथांतील वचने काही खेळ खेळून लोकांना सांगणे यांद्वारे तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. येथे नृत्य-गाणे यांमुळे लोक येतात, आकर्षित होतात, हे लक्षात आले. त्यांची साधना समजून घेतली, तर केवळ ‘आज्ञाचक्र’ जागृत करण्यावर संप्रदायाचा भर आहे. आज्ञाचक्र ‘शक्तीपातयोगा’द्वारे जागृत केले की, झाले. पुढे संप्रदायांच्या सत्संगांना येणे आणि सांगतील ते उपक्रम करणे, असे साधनेचे स्वरूप समजले.

६. अघोरी बाबांचे वेगळे विश्‍व !

येथे अघोरी मार्गाने उपासना करणारे साधू हे विशेष करून प्रसारमाध्यमांचे आकर्षण होते. मध्यरात्री उपासना करणारे, मानवी कवट्या यज्ञविधीजवळ ठेवून विधी करणारे, गळ्यात मानवी हाडे धारण करणारे असे काही अघोरी बाबा येथे दृष्टीस पडले. ‘या कवट्या कुठून मिळतात किंवा स्मशानातून घेतल्या जातात का ?’, असा सर्वसामान्यांना प्रश्‍न असतो. या बाबांनी सांगितले, ‘अघोरी मार्गाने उपासना करणार्‍या काही साधकांना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कवटीसह हाडे याच मार्गातील विधींसाठी दान करण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर ती हाडे या अघोरी उपासकांच्या आश्रमांमध्ये जमा करण्यात येतात. नंतर त्यांचा अघोरी हवनाच्या वेळी, अन्य अघोरी विधीच्या वेळी उपयोग करण्यात येतो. तंत्रशास्त्रानुसार हे अघोरी विधी केले जातात.’

गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (५.३.२०२५)

महाकुंभमेळ्यातील काही जागतिक विक्रम !


महाकुंभमेळ्यात काही जागतिक विक्रम प्रस्थापित झाले !

१. एकाच वेळी ३२९ स्वच्छता कर्मचार्‍यांनी अनेक ठिकाणी नदीची स्वच्छता केली.

२. एकाच वेळी १९ सहस्र स्वच्छता कर्मचार्‍यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसराची स्वच्छता केली.

३. एकूण १० सहस्र १०२ लोकांनी ८ घंटे वेळ देऊन ‘हँड प्रिंट’ (हाताचे ठसे) सिद्ध केले.

या विक्रमांना ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्’द्वारे प्रमाणपत्र देण्यात आले. या व्यतिरिक्त सर्वांत मोठा विक्रम जो जागतिक स्तरावर झाला आहे, तो म्हणजे ६६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमासह गंगा नदीत स्नान केले. त्याचप्रमाणे कोट्यवधी लोकांच्या स्नानानंतरही गंगा नदीचे पाणी शुद्धच होते.

– श्री. यज्ञेश सावंत