
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनीही भाग घेतला होता. इलॉन मस्क हे सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आहेत आणि ते राबवत असलेल्या धोरणांमुळे त्यांना पुष्कळ विरोध होत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत, जेव्हा ट्रम्प यांनी मस्क यांना त्यांच्या योजनांविषयी माहिती देण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी खुलासा केला की, त्यांना जिवे मारण्याच्या सतत धमक्या मिळत आहेत.
१. इलॉन मस्क म्हणाले की, अनेक सरकारी व्यवस्था खूप जुन्या आहेत, ज्यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत. ‘आमचे मुख्य ध्येय अमेरिकेची वाढती तूट अल्प करणे आहे. जर आपण आताच कारवाई केली नाही, तर देश दिवाळखोरीत जाऊ शकतो. इलॉन मस्क म्हणाले की, देश आणखी २ ट्रिलियन डॉलर्सची (१७४ लाख कोटी रुपयांहून अधिक) तूट सहन करू शकत नाही.
२. इलॉन मस्क यांनी स्वीकृत केले की, सरकारी कार्यक्षमता विभाग चुका करील; परंतु त्या लवकर दुरुस्त केल्या जातील. मस्क पुढे म्हणाले, ‘वर्ष २०२६ पर्यंत सरकारी तूट १ ट्रिलियन डॉलर्सने (८७ लाख कोटी रुपयांहून अधिक) अल्प करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रतिदिन ४ अब्ज डॉलर्सची बचत करावी लागेल.’
३. सरकारी कार्यक्षमता विभागाच्या धोरणांमुळे अनेक सरकारी कर्मचार्यांनी त्यागपत्रे दिली आहेत. सरकारी कर्मचार्यांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज’ने मस्कच्या धोरणांना अवैध आणि धोकादायक म्हटले आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.
४. या मंत्रीमंडळ बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना पाठिंबा दिला. मस्क यांचे कौतुक करतांना ट्रम्प म्हणाले की, ते पुष्कळ मेहनत घेत आहेत. काही लोक त्यांच्याशी असहमत आहेत; पण बहुतेक लोक अतिशय आनंदी आहेत.