राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आणली ‘गोल्ड कार्ड’ योजना !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्यांना बाहेर काढण्याची मोहीम चालू केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे. ५० लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ४३ कोटी रुपये भरून अमेरिकेचे ‘गोल्ड कार्ड’ विकत घेता येणार आहे. आधीच्या ‘ग्रीन कार्ड’ची जागा आता ‘गोल्ड कार्ड’ घेणार आहे. किमान १० लाख लोकांना गोल्ड कार्ड्स दिले जाऊ शकते, अशी शक्यता या निमित्ताने वर्तविली जात आहे.
योजनेविषयीची अधिक माहिती २ आठवड्यात घोषित करणार
ट्रम्प यांनी सांगितले की, गोल्ड कार्ड्स घेणार्यांना अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व दिले जाईल. त्यांना ग्रीन कार्डप्रमाणेच लाभ मिळू शकणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती २ आठवड्यात घोषित करू. श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल. ते अधिक यशस्वी होतील. त्यांना अमेरिकेतील कर भरावे लागतील, स्थानिक लोकांना रोजगार द्यावा लागेल. ही योजना अभूतपूर्व असे यश मिळवेल, यात शंका नाही.
रशियाच्या नागरिकांनाही ‘गोल्ड कार्ड्स’ देणार का ? या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, रशियाच्या श्रीमंतांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियाच्या श्रीमंतांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत.