हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; वडेट्टीवार जाहीर क्षमा मागा ! – हिंदु जनजागृती समिती

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण

मुंबई – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ‘ते संतच नाहीत’, असे म्हणणारे काँग्रेसी नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराजांचा जाहीर अवमान केला आहे. हिंदु जनजागृती समिती त्याचा जाहीर निषेध करते. हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळे त्यांच्या मुखातून हिंदु संतांप्रती द्वेषच बाहेर पडणार; मात्र त्यांनी महाराजांचा अवमान करून लाखो हिंदु भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. संतांचा अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची तात्काळ क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

समितीने म्हटले की, काँग्रेसच्या इतिहासातील प्रत्येक निवडणूक ही मुसलमानांचे लांगूलचालन करत लढवली गेली आहे. मुल्ला-मौलवी यांच्या मांडीला मांडी लावून डोक्यावर गोली टोपी घालून इफ्तार पार्ट्या झोडण्यात काँग्रेसी नेते अग्रस्थानी असतात. ‘देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते तथा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते. इतक्या पराकोटीचे लांगूलचालन करूनही याला ‘धार्मिक स्वरूप’ द्यायचे नाही; मात्र ‘हिंदु संतांमुळे निवडणूक जिंकली’, असे कुणी म्हटले की, काँग्रेसी नेत्यांना पोटशूळ उठतो. यातून त्यांच्यामध्ये हिंदु समाज आणि हिंदु संत यांच्याप्रती किती द्वेष भरला आहे, हेच दिसून येते. हिंदु समाजाला काळाची आवश्यकता काय आहे, याची दिशा संतांनी दिली आणि हिंदूंचे एकीकरण झाल्यानेच यंदाची निवडणूक महायुतीने ऐतिहासिक फरकाने जिंकली, हेच सत्य आहे. अजूनही काँग्रेसी नेते हिंदुद्वेषाच्या काविळीतून बाहेर पडणार नसतील, तर हिंदु समाज नक्कीच ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही संकल्पना सत्यात उतरवील.