‘मागील काही मासांपासून पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) मेंदूत रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने आजारी आहेत. त्या स्वतःचे काहीच करू शकत नाहीत. त्यांचे अंग पुसणे (त्यांना ‘स्पंजिंग’ करणे), त्यांचे डोळे, जीभ आणि तोंड स्वच्छ करणे, त्यांच्या छातीत साठलेला कफ काढणे, त्यांना डाव्या किंवा उजव्या कुशीवर वळवणे, तसेच दिवसभरात किमान ४ वेळा त्यांचे कपडे पालटणे, अशा सेवांमध्ये सौ. सीमा सामंत, सौ. उमा कापडिया आणि सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे ) या १२.७.२०२४ या दिवसापासून नियमित दायित्व घेऊन साहाय्य करत आहेत. या साधिका पू. आजींची सेवा अत्यंत जिव्हाळ्याने, आपलेपणाने आणि भावपूर्ण करत आहेत.

१. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणार्या सौ. सीमा सामंत !

अ. सौ. सीमाताई हसतमुख आहेत. त्या ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करतात.
आ. त्या सर्वच सेवा पू आजींशी प्रेमाने बोलत करतात. ‘सीमाताई आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत’, असेच मला वाटते.
इ. त्या सेवेच्या वेळा नियमित पाळतात. त्या दिवसातून ३ वेळा पू. आजींची सेवा करण्यासाठी येतात. त्यांना सेवेला येण्यात काही अडचण असल्यास त्या मला त्याची आधीच कल्पना देतात. त्या वेळी त्या ‘अन्य साधिका सेवेसाठी येऊ शकते का ?’, याचेही नियोजन करतात.
ई. त्या पू. आजींची सेवा अत्यंत तळमळीने करतात. एक दिवस पू. आजींकडे सेवेला येण्याआधी त्या पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या डोक्याला थोडे लागले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही आज सेवेला न येता विश्रांती घ्या.’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘मला अधिक लागले नाही. मला आता बरे वाटत आहे.’’ त्या दिवशी त्या सेवेला आल्या. एकदा त्यांना अल्पाहार बनवण्याची सेवा असल्याने त्यांनी मला ‘सेवेला येऊ शकणार नाही’, असे कळवले होते. त्यांची ती सेवा थोडी लवकर पूर्ण झाली. तेव्हा त्यांनी मला ‘सेवेला येते’, असे लगेच कळवले.
उ. पू. आजींच्या सेवेत लागणारे साहित्य संपत आले असल्यास त्या आठवणीने आणि तत्परतेने चिकित्सालयातून ते साहित्य घेऊन येतात. आयत्या वेळी एखादे साहित्य हवे असल्यास त्या कंटाळा न करता चिकित्सालयातून ते साहित्य घेऊन येतात.
२. मनापासून आणि प्रेमाने सेवा करणार्या सौ. उमा कापडिया !

अ. ७.६.२०२४ या दिवशी पू. आजी गंभीर आजारी झाल्या. तेव्हा सौ. उमाताईने अत्यंत तत्परतेने साधकांच्या साहाय्याने पू. आजींसाठी ‘फॉलर बेड’ (fowler bed)(टीप १) ,‘एअर बेड’ (airbed) (टीप २) असे सर्व साहित्य खोलीत आणून दिले. त्यासाठी तिला बरीच धावपळ करावी लागली. ताईने पू. आजींच्या उपचारांसाठी लागणारे साहित्यही लगेच आणून दिले.
टीप १ – ‘फॉलर बेड’ : ज्यामध्ये रुग्णाला अर्धबसलेल्या (४५ ते ६० अंशाच्या) स्थितीत रहाता येते, असा पलंग.
टीप २ – ‘एअर बेड’ : या प्रकारच्या गादीत हवा भरण्याची व्यवस्था असते, ज्यामुळे गादीचा कठोरपणा किंवा मऊपण नियंत्रित करता येतो.
आ. सौ. उमाताई पू. आजींची सेवा पुष्कळ मनापासून आणि प्रेमाने करते.
इ. ताई आश्रमात सेवा करून घरी जाते. तेव्हा ‘पू. आजींची सेवा करायची आहे’, असे समजल्यावर तिची घरून पुन्हा आश्रमात येण्याचीही सिद्धता असते.
३. कृतज्ञताभावात राहून सेवा करणार्या सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे) !

अ. कल्याणीताई प्रतिदिन रात्री पू. आजींचे कपडे पालटण्यासाठी नियमित ठरलेल्या वेळेत येते.
आ. ती कितीही थकलेली असली, तरीही पू. आजींच्या सेवेत कधीच खंड पडू देत नाही .
इ. ताईच्या मनात ‘प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) कशा प्रकारे सेवा केलेली आवडेल ?’, असा विचार सदैव असतो. ती त्याप्रमाणे कृती करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देते.
इ. ती भावपूर्ण प्रार्थना करत आणि कृतज्ञताभावात राहून सेवा करते. ती प्रत्येक कृती सहजतेने करते.

४. कृतज्ञता आणि प्रार्थना
या सर्व साधिकांचा दाते कुटुंबातील आम्हा सर्वांना पुष्कळ आधार वाटतो. त्या साधिकांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. ‘पू. दातेआजी आमच्या पू. आजी आहेत’, या आपलेपणाने त्या साधिका सेवा करत आहेत’, असे आम्हाला जाणवते. या साधिकांकडून ‘निरीक्षणक्षमता, तत्परता, सेवेतील कुशलता, प्रेमभाव आणि सेवाभाव’, असे अनेक गुण आम्हाला शिकायला मिळत आहेत. ‘त्यांच्यामधील हे गुण आम्हालाही आत्मसात् करता येऊ देत’, अशी श्री गुरुमाऊलींच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे [पू. दातेआजींची मोठी सून] ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०२४)