श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांची मागणी

कोल्हापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले होण्यासाठी ‘श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’ने पत्रकार परिषद, निवेदन, आंदोलन यांद्वारे आवाज उठवला होता. खेदाची गोष्ट म्हणजे अत्यंत पवित्र अशा या कुंडावर शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते. देवीभक्तांच्या उद्रेकातून या शौचालयाचे अनधिकृत बांधकाम जून २०१६ मध्ये पाडण्यात आले. यानंतर वर्ष २०२१ मध्ये हे कुंड खुले करण्याचे काम चालू करण्यात आले. ४ वर्षांनंतरही या कुंडाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तरी पुढील ३ महिन्यांत कुंडाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी केली आहे. कुंडाची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाने पहाणी केली, त्यानंतर ही मागणी करण्यात आली.
‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. ‘करवीर महात्म्या’मध्ये या कुंडाचे वर्णन आले आहे. अगस्ती ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे. पूर्वी या तिर्थातील पवित्र पाणी श्री महालक्ष्मीदेवीच्या अभिषेकासाठी वापरले जात असे. त्यामुळे हे कुंड लवकरात लवकर खुले करून येणार्या भाविकांनी त्याची पूर्ण माहिती होण्यासाठी मनकर्णिका कुंडांवर त्यांचे धार्मिक महत्त्व दर्शवणारे माहितीचे फलक आणि त्यांची छायाचित्रे लावावीत, अशीही मागणी या प्रसंगी करण्यात आली.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थानातील मनकर्णिका कुंडांचे
4 वर्षांनंतरही काम अपूर्ण आहे. तरी कुंडाचे काम पुढील ३ महिन्याच्या कलावधीत पूर्ण करावे अन्यथा हिंदुत्ववादी स्वतः जाऊन भक्तांसाठी खुले करतील अशी चेतवानी हिंदू जनजागृती समितीसह श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार… pic.twitter.com/FUlyZkI3gM— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) February 22, 2025
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे यांसह आदी उपस्थित होते.