हिंदु जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली मागणी !

मुंबई – राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘छावा’ चित्रपट विद्यार्थी, युवक यांसह सर्व लोकांपर्यंत पोचावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. १९ फेब्रुवारी या दिवशी नरिमन पॉईंट येथील ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहामध्ये शिवसेनेच्या वतीने ‘छावा’ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेच्या या उपक्रमाविषयी प्रशंसा केली. धर्मवीर संभाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही श्री. बळवंत पाठक यांनी या वेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी, चित्रपटाचे निर्माता लक्ष्मण उतेकर, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन्.सी., सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते आणि दिग्दर्शक भरत दाभोळकर, माजी आमदार शिशिर शिंदे, माजी आमदार अतुल शहा, कलाकार मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, विनीत सिंग आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. चित्रपटापूर्वी शिवसेनेचे अनिल त्रिवेदी यांनी प्रस्तावना केली. चित्रपट चालू होण्यापूर्वी प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जयघोष केला. छावासारख्या ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेम जागृत करणार्या चित्रपटाची निर्मिती केल्याविषयी निर्माता लक्ष्मण उतेकर यांचे यांचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.