आज १८ फेब्रुवारी १९४६ या दिवशी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ने बंड केले होते. त्यानिमित्त…
भारतीय स्वातंत्रलढ्याचा इतिहास लिहितांना साधारणपणे सत्याग्रह आणि अहिंसक मार्गाने केले जाणारे आंदोलन याला अधिक महत्त्व दिले जाते. क्रांतीकारकांच्या इतिहासाविषयीही अशाच प्रकारे, परंतु संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली जाते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ हा विषय तर केवळ एक ओळीतच संपवला जातो. वर्ष १९४६ मध्ये झालेल्या नौदलाच्या बंडाविषयी पुष्कळ अल्प ठिकाणी माहिती मिळते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्त विवरण येथे देत आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वर्ष १९४६ मधील ‘रॉयल इंडियन नेव्ही’, नौदलातील भारतियांची परिस्थिती, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि नाविक बंडाचा प्रारंभ’, यांविषयी वाचले. आज पुढील भाग पाहू.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/885316.html

६. नाविक बंडाचा प्रारंभ
६ ऊ. १९ फेब्रुवारी १९४६ : ‘एच्.एम्.आय.एस्. तलवार’ (नौदलाचा संदेश वहन करणारा एक तळ) या तळावरील ब्रिटिशांचा ध्वज उतरवण्यात आला आणि त्याच्या जागी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि मुस्लिम लीग यांचे ध्वज उभारण्यात आले. कमान अधिकारी कॅप्टन इऑन जोन्स ‘एच.एम्.आय.एस्. तलवार’ या तळाच्या प्रवेशद्वारापाशी आले; पण दगडफेकीमुळे आत प्रवेश करू शकले नाहीत. मुंबईतील तळांवरील १० सहस्र नाविक बंदराकडे येण्यास निघाले. बंदरावरील ब्रिटिशांचे निशाण काढण्यात आले आणि ब्रिटीश अधिकारी केवळ पहाण्याखेरीज काही करू शकले नाहीत. या मधल्या काळात नाविकांनी त्यांच्या प्रमुख मागण्या अॅडमिरल रॅत्रे यांना कळवल्या. या प्रमुख मागण्या होत्या :
१. नौदलामधील सुविधांचा दर्जा सुधारावा.
२. कमांडर किंगवर कारवाई करण्यात यावी.
३. वेतन आणि निवृत्तीवेतन यांमध्ये वाढ करण्यात यावी.
दुपारपर्यंत १० सहस्र नाविक वाहनाने ‘एच्.एम्.आय.एस्. तलवार’मध्ये उपस्थित झाले. संपूर्ण वातावरण देशप्रेमाने भारलेले होते. संप करणार्या नाविकांनी त्यांची एक समिती स्थापना केली आणि समितीला राजकीय नेते, ब्रिटीश अधिकारी यांच्याशी बोलणी करण्याचे दायित्व दिले. या काळात ब्रिटिशांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘१८ मराठा’ या तुकडीला कारवाईसाठी सज्ज रहाण्याचा हुकूम दिला. नाविकांनी त्यांच्या या संपाची सूचना पत्रकारांना दिली. प्रसारमाध्यमांमध्ये ब्रिटीशधार्जिणे आणि राष्ट्रवादी असे २ तट होते. ब्रिटीशधार्जिण्या वृत्तपत्रांनी संपकरी नाविकांचे ‘बेशिस्त जमाव’, असे वर्णन केले, तर राष्ट्रवादी वृत्तपत्रांनी ‘ब्रिटीश दमनतंत्राला कंटाळलेले देशभक्त सैनिक’, असे वर्णन केले.

६ ए. २० फेब्रुवारी १९४६ : संपाच्या तिसर्या दिवशी संप करणार्या नाविकांची संख्या २० सहस्र पर्यंत पोचली. मुंबई आणि जवळपासच्या नाविक तळांवरील, कुलाबा, माहूल, ठाणे मरोळ येथील नाविक संपामध्ये सामील झाले. संपूर्ण भारतात आणि भारताच्या शेजारी देशातही ही प्रमुख बातमी पसरली. संपकरी नाविक मागील २ दिवसांपासून उपाशी होते. त्यांच्याकडील रसद न्यून होत होती. ‘एच्.एम्.आय.एस्. तलवार’च्या भोवती ब्रिटीश सैन्य आणि पोलीस यांचे कडे असल्यामुळे ते भोजनासाठीही तळाबाहेर जाऊ शकत नव्हते. बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा पोलिसांशी संघर्ष झाला. पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि पोलिसांकडून गोळीबार चालू झाला. त्यामुळे नाविक अत्यंत चिडले आणि पोलिसांवर गोळीबार करू लागले. फोर्ट बराकीमध्ये ‘१८ मराठा’चे सैनिक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैनिकांना त्यांच्या तैनातीचे कारण सांगतांना ‘हिंदु – मुसलमान दंगलीवर नियंत्रण मिळवणे’, असे सांगितले गेले; मात्र संपकरी नाविकांकडून खरे कारण समजल्यावर त्यांच्या वागण्यात फरक पडला. ‘१८ मराठा’च्या सैनिकांचे वागणे संपाविषयी सहानुभूतीपूर्वक होते. संपकरी नाविकांनी २० फेब्रुवारीला सर्व तळांसाठी एक संदेश पाठवला. यामध्ये जोपर्यंत सैन्य माघारी जात नाही, तोपर्यंत संप चालू ठेवण्याचा मनसुबा व्यक्त केला.
६ ऐ. २१ फेब्रुवारी १९४६ : आतापर्यंत संपाचे लोण ७८ जहाजे, २० तळ आणि २० सहस्र नाविक यांच्यापर्यंत पोचले होते. ब्रिटीश वायूदलाच्या काही तुकड्याही या संपाकडे सहानुभूतीपूर्वक बघत होत्या. ब्रिटिशांच्या सैन्यांमध्ये असलेल्या भारतीय सैनिकांवर या सर्व बातम्यांचा परिणाम होत होता. बंगालमधील सैन्याच्या एका तुकडीने संप पुकारला होता. ब्रिटिशांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैनिकी कारवाई करण्यास प्रारंभ केला. मुंबई डॉकयार्ड, कॅसल बराक, फोर्ट बराक इथे सैनिकी कारवाईला प्रारंभ झाला. नाविकांकडूनसुद्धा या कारवाईला समर्पक उत्तर दिले जात होते. ‘१८ मराठा’ने फोर्ट बराकवर प्रारंभी केलेले आक्रमण परतवून लावण्यात आले. ‘१८ मराठा’च्या सैनिकांची संप करणार्यांविषयीची सहानभूतीपूर्वक वागणूक बघून त्यांच्या जागी ब्रिटीश सैनिकांची तुकडी आणण्यात आली. नाविकांकडील अन्नधान्य संपले असल्यामुळे मुंबईच्या स्थानिक जनतेकडून नाविकांसाठी अन्नाची पाकिटे वाटली जात होती. फोर्टमधील अनेक कॅफेमध्ये नाविकांना अन्न विनामूल्य वाटले जात होते. मुंबई बंदरामध्ये एक वेगळेच दृश्य दिसत होते. पुष्कळ मोठा जमाव बंदरावर आला होता. भारतीय नाविक त्यांच्याकडील अन्न जमा करून ते बोटीवर चढवत होते, तर ब्रिटीश सैनिक दूरवरून केवळ पहाण्याखेरीज काही करू शकत नव्हते.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ब्रिटिशांनी परत नव्या दमाने सैनिकी कारवाईला प्रारंभ केला. नाविकांनी त्याला त्यांच्याकडील शस्त्रांनी प्रत्युत्तर दिले. बंदरामधील काही जहाजांतून तोफांचा मारा करण्यात आला. दुपारी २.३० वाजता अॅडमिरल गॉडफ्री यांनी नाविकांना शेवटचा संदेश देऊन शरण येण्यास सांगितले. दिवसभर धुमश्चक्री होत राहिली. संपकरी नाविकांकडून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना संपर्क करून गार्हाणे सांगितले गेले.
६ ओ. २२ फेब्रुवारी १९४६ : संपकर्यांच्या संघर्षातील हा रक्तरंजित दिवस होता. संपकरी नाविक मागे हटण्यास सिद्ध नव्हते. सर्वसामान्य जनतासुद्धा या संघर्षात सामील झाली. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. मुंबईत जागोजागी रस्त्यावर अडथळे उभारले गेले. बस आणि रेल्वे बंद करण्यात आली. मशीनगन घेतलेले ब्रिटीश सैनिक आणि दगडफेक करणारी जनता यांच्यात अनेक ठिकाणी संघर्ष झाला. २२ फेब्रुवारी आणि पुढील २ दिवस मुंबईत अशीच परिस्थिती होती. एका अंदाजानुसार या संघर्षात ७०० जण मृत्यूमुखी पडले, तर १५०० हून अधिक जण गंभीर घायाळ झाले. ब्रिटिशांनी त्यांच्या दमनचक्राचा संपूर्ण वापर करून सामान्य जनतेला वेठीस धरले. देशभरात या अत्याचारामुळे आक्रोश पसरला. अनेक शहरांमध्ये ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध निदर्शने झाली.

७. संपाचा शेवट
नाविकांच्या संपाला मुंबईतील जनतेने पाठिंबा दिला; पण त्या वेळच्या राजकीय पक्षांची यासंदर्भातील भूमिका ब्रिटीशधार्जिणी राहिली. काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी नाविकांना संप मागे घेऊन विनाशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले. त्या मोबदल्यात ‘नाविकांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येणार नाही’, असे सांगितले. तोपर्यंत सैनिकी दबाव पुष्कळ वाढला होता, तसेच रसद दारूगोळाही संपत आला होता. त्यामुळे नाविकांचे मनोबल खचले. काँग्रेसच्या ब्रिटीशधार्जिण्या वृत्तीमुळे संपकरी दिशाहीन झाले. २४ फेब्रुवारीला संपकरी नाविकांनी शरणागती पत्करून संप मागे घेतला.
८. संपानंतरची परिस्थिती
नाविकांनी शरणागती पत्करल्यानंतर ब्रिटीश सैनिकांनी त्यांची जागा घेतली. पुढील २ दिवसांत ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर अटकसत्र करून संपात सहभागी असणार्या सर्व नाविकांना मुंबईजवळील मुलुंड छावणीमध्ये ठेवले. तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. संप मिटवण्यापूर्वी सांगितलेल्या वचनांचा ब्रिटिशांना विसर पडला आणि त्यांनी नाविकांशी अमानवीय व्यवहार चालूच ठेवला. या परिस्थितीला कंटाळून १२ मार्च १९४६ या दिवशी नाविकांनी मुलुंड छावणीमध्ये उपोषण चालू केले. ब्रिटिशांनी बळाच्या जोरावर परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी संपकरी नाविकांच्या नेत्यांना कल्याणमधील छावणीमध्ये स्थानांतरित करून नाविकांचे मनोबल न्यून केले. अमानवीय अत्याचार, भूक आणि सर्व बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती यांमुळे नाविकांनी उपोषण
१६ मार्च या दिवशी मागे घेतले.
त्यानंतर एप्रिल १९४६ मध्ये ब्रिटिशांनी संपकरी भारतीय नाविकांची नौदलामधून हकालपट्टी केली. सेवेतून बडतर्फ करतांना त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या नाहीत आणि हे वीर इतिहासामधूनही लुप्त झाले. या प्रसंगात काँग्रेसची ब्रिटीशधार्जिणी वृत्ती हा संप करणार्या नाविकांसाठी विश्वासघात होता. काँग्रेसने पाठिंबा दिला असता, तर इतिहास वेगळा झाला असता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा या नाविकांची उपेक्षा केली गेली. इतिहासातील या महत्त्वाच्या घटनेविषयीचा वृत्तांत अभ्यासक्रमातसुद्धा समाविष्ट करण्यात आला नाही. नाविकांचे बंड हे बळाच्या जोरावर चिरडण्यात ब्रिटिशांना यश आले, असे जरी वाटत असले, तरी त्यामुळे ब्रिटिशांमध्ये भारतीय सैन्याच्या निष्ठेविषयी संशयाची भावना सिद्ध झाली. ब्रिटिशांच्या भारतावर राज्य करण्याच्या यंत्रणेमध्ये भारतीय सैन्याचा सहभाग हा एक मुख्य घटक होता. ‘भारतीय सैन्याच्या ब्रिटिशांवरील निष्ठेवर जेव्हा शंका उत्पन्न झाली, तेव्हा यापुढे भारतावर राज्य करणे शक्य नाही’, याची ब्रिटिशांना जाणीव झाली आणि हेच या लढ्याचे यश होते.
– श्री. हृषिकेश कुलकर्णी, पुणे. (७.१.२०२५) (समाप्त)
(साभार : ‘1946 Royal Indian Navy Mutiny : Last War of Independence’ Author : Pramod Kapoor.)