१८ फेब्रुवारी १९४६ या दिवशी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ने बंड केले होते. त्यानिमित्त…
भारतीय स्वातंत्रलढ्याचा इतिहास लिहितांना साधारणपणे सत्याग्रह आणि अहिंसक मार्गाने केले जाणारे आंदोलन याला अधिक महत्त्व दिले जाते. क्रांतीकारकांच्या इतिहासाविषयीही अशाच प्रकारे संक्षिप्तपणे माहिती दिली जाते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ हा विषय तर केवळ एका ओळीतच संपवला जातो. वर्ष १९४६ मध्ये झालेल्या नौदलाच्या बंडाविषयी पुष्कळ अल्प ठिकाणी माहिती मिळते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्त विवरण येथे दिले आहे.
१. वर्ष १९४६ मधील ‘रॉयल इंडियन नेव्ही’
इंग्रजांचा भारताशी होणारा व्यापार हा मुख्यत्वे समुद्रमार्गाने असल्यामुळे वर्ष १६१२ मध्ये इंग्रज भारतात आल्यापासून त्यांच्या नौदलानेही भारतीय किनारपट्टीवर प्रवेश केला. मुंबईमध्ये ब्रिटीश नौदलाचा मुख्य तळ होता. परकीय नौदलापासून स्वराज्याला असलेला धोका ओळखून छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमार उभारले. वर्ष १७५६ मध्ये मराठा आरमाराच्या अस्तानंतर इंग्रजांचा भारतीय किनारपट्टीवर एकछत्री प्रभाव प्रस्थापित झाला. पहिल्या महायुद्धाच्या काळात नौदलाचा उपयोग प्रामुख्याने रसद पुरवठा करण्यासाठी झाला. दुसर्या महायुद्धाच्या काळात भारतीय नाविकांना त्यांचे शौर्य दाखवण्याची चांगली संधी मिळाली आणि तेथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. दुसर्या महायुद्धामध्ये भारतीय नाविक दलाचे १०५ सैनिक लष्करी मोहिमांमध्ये मारले गेले. त्यामध्ये २७ अधिकारी होते.

२. नौदलातील भारतियांची परिस्थिती
भारतीय सैन्याच्या तुलनेने नौदलातील सैनिकांची संख्या न्यून होती. नौदलाचा उपयोग प्रामुख्याने रसद वाहतूक आणि सागरी मार्गाचे संरक्षण यांसाठी केला जात होता. दुसर्या महायुद्धाच्या काळात नौदलाने अनेक सागरी मोहिमांमध्ये भाग घेऊन स्वतःचा पराक्रम दाखवला. दुसर्या महायुद्धाच्या आरंभानंतर ब्रिटिशांना नौदलाची शक्ती वाढवण्याची आवश्यकता भासू लागली. नौदलातील भरतीसाठी विज्ञापने देण्यात आली होती. त्यामध्ये वेतन आणि इतर सवलती यांचे आमीष दाखवण्यात आले. प्रत्यक्षात नाविकांची भरती झाल्यानंतर त्यांना येणारा अनुभव मात्र अपेक्षेपेक्षा पुष्कळ निराळा असे.
३. वांशिक भेदभाव
नाविकांना प्रशिक्षण देणार्या तळांवर बेसुमार गर्दी असून प्रशिक्षण अधिकार्यांची कमतरता आणि अल्प सुविधा असल्यामुळे नाविक मोठ्या प्रमाणावर नोकरी सोडून जात असत. नौदलातील ब्रिटीश अधिकार्यांचे भारतीय नाविकांशी वागणे, हे अरेरावी आणि उद्दामपणाचे असे. सतत शिवीगाळ आणि अपमानास्पद बोलणे, हे नित्याचे असे. भारतीय अधिकारीसुद्धा याविषयी काही करू शकत नसत. भारतीय नाविकांना शौचालय स्वच्छ करणे, भोजनगृहातील भांडी स्वच्छ करणे, अशी कामे दिली जात. नाविकांनी अशा प्रकारच्या वागणुकीविषयी तक्रार केल्यास त्यांच्यावर अनुशासनभंगाची कारवाई करण्यात येई.

४. नाविकांचे रहाणीमान
भारतीय नाविकांचे रहाणीमान, त्यांना मिळणार्या सोयीसुविधा यांवर पुष्कळ अल्प लक्ष देण्यात येई. नाविकांना देण्यात येणार्या सुविधा, रहाण्याच्या जागा इत्यादी निकृष्ट दर्जाच्या असून रहाण्याच्या खोल्यांच्या कमाल क्षमतेपेक्षा अधिक जणांना एकत्र ठेवण्यात येत असे. खानावळीमध्ये मिळणारे जेवण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असे. या परिस्थितीविषयी तक्रार केल्यास काही सुधारणा न होता दुर्लक्ष केले जात असे. प्रसंगी अनुशासन भंगाची कारवाई करण्यात येई. अशा कठीण परिस्थितीमुळे नाविकांचा ब्रिटीश सैन्याधिकार्यांविषयी भ्रमनिरास झाला.
५. तत्कालीन राजकीय परिस्थिती
वर्ष १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलन चालू झाले होते. दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर देहलीतील लाल किल्ल्यामध्ये ब्रिटिशांनी ‘आझाद हिंद फौजे’मधील अधिकार्यांवर सैनिकी कारवाई (कोर्ट मार्शल) चालू केली. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय देश बांधवांकडून होणारे प्रयत्न हे नाविकांनासुद्धा समजत होते आणि त्यांची याविषयी पूर्ण सहानुभूती होती.
वर्ष १९४५ मध्ये आजाद हिंद फौजेमधील अधिकार्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे संपूर्ण भारत आणि विशेषतः ब्रिटीश भारतीय सैन्यात प्रचंड रोष उत्पन्न झाला.

६. नाविक बंडाचा प्रारंभ
मुंबईमधील ‘एच्.एम्.आय.एस्.तलवार’ हा नौदलाचा संदेश वहन करणारा एक तळ होता. १ डिसेंबर १९४५ या दिवशी नौदलदिनानिमित्त होणार्या संचलनाची (परेडची) सिद्धता चालू होती. सकाळी संचलनाच्या ठिकाणी सर्व पाहुण्यांचे आगमन झाले, तेव्हा तेथे त्यांना ब्रिटिशविरोधी घोषणा लिहिलेल्या आढळल्या, तसेच संपूर्ण मैदानात इंग्रजांचा ध्वज ‘युनियन जॅक’चे आणि नौदलाच्या झेंड्याचे तुकडे पसरलेले होते. ही घटना त्या वेळच्या वर्तमानपत्रात एक चर्चेचा विषय ठरली होती. ब्रिटीश अधिकारी या घटनेने क्षुब्ध झाले होते. या घटनेची चौकशी चालू झाली. नाविक बी.सी. दत्त यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. ब्रिटीश अधिकारी कमांडर कोल यांचे स्थानांतर करून त्यांच्या जागी शिवीगाळ करण्यासाठी कुख्यात असलेला अधिकारी कमांडर आर्थर फ्रेडरिक किंग याची नेमणूक करण्यात आली (जानेवारी १९४६).
‘एच्.एम्.आय.एस्. तलवार’ची सूत्रे हाती येताच कमांडर किंग यांच्या शिस्तीचा आणि भारतीय नाविकांच्या प्रती अपमानास्पद वागणुकीचा बडगा फिरू लागला. ब्रिटीश नौदलातील अमानवीय परिस्थितीमुळे भारतीय नाविकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला.
६ अ. ८ फेब्रुवारी १९४६ : कमांडर किंग यांच्या मोटारीवर ‘चले जाओ’ असे लिहिण्यात आले, तसेच त्यांच्या वाहनाच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. सैन्यातील शिस्तीच्या दृष्टीकोनातून ही घटना ब्रिटिशांच्या सैन्यावरील ढासळत चाललेल्या नियंत्रणाचे द्योतक होते. सकाळी ९.१५ वाजता होणार्या संचलनाला कुणीही उपस्थित राहिले नाही. कमांडर किंगने जेव्हा ‘एच्.एम्.आय.एस्. तलवार’ या तळावर आकस्मिक भेट दिली, तेव्हा त्याच्या आगमनाकडे नाविकांनी दुर्लक्ष केले. सर्व नाविकांकडून त्यांच्याच कमांड अधिकार्याविरुद्ध लिखित तक्रार करण्यात आली. नौदलात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडत होती.
६ आ. १० फेब्रुवारी १९४६ : लेफ्टनंट कमांडर शॉ या भारतीय अधिकार्याने कमांडर किंग याला नाविकांशी बोलण्याची विनंती केली; पण कमांडर किंगने या विनंतीला नकार देऊन १६ फेब्रुवारी ही नाविकांना शिक्षा सुनावण्याचा दिनांक ठरवला. यामुळे नाविकांमध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला.
६ इ. १६ फेब्रुवारी १९४६ : कमांडर किंगने नाविकांवर क्षमा मागण्यासाठी दबाव आणला. नाविकांना तक्रार मांडण्याची संधी न देता शिक्षेची भीती दाखवली गेली.
६ ई. १७ फेब्रुवारी १९४६ : दिवसाचा प्रारंभ होताच नाविकांनी खानावळीमधील अन्नग्रहण करण्यास नकार दिला; कारण अन्नाची गुणवत्ता पुष्कळच खराब होती. ब्रिटीश अधिकार्यांनी याची नोंद न घेता उलट नाविकांनाच आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करण्याचा उद्धट सल्ला दिला. परिणामी कुणीही संपूर्ण दिवसभर अन्न ग्रहण केले नाही.
६ उ. १८ फेब्रुवारी १९४६ : १७ फेब्रुवारी नकार दिलेले अन्न नाविकांना पुन्हा वाढण्यात आले. त्यामुळे नाविकांकडून ‘नो फूड नो वर्क’ (अन्न नाही, काम नाही), अशी घोषणा देण्यात आली आणि नाविकांच्या संपाचा प्रारंभ झाला. ब्रिटीश सरकार आणि कमांडर किंग यांच्याविरुद्ध घोषणाबाजी होऊ लागली. चिघळणारी परिस्थिती बघून कमांडर किंगने सर्व अधिकार्यांची बैठक बोलावली आणि ‘एच्.एम्.आय.एस्. तलवार’मधील शस्त्रे अन् दारूगोळा बाहेर स्थलांतरित करण्याचा आदेश दिला. ब्रिटीश नौदलाच्या पश्चिम विभागाचे अधिकारी अॅडमिरल रॅत्रे यांनी दुपारी ‘एच्.एम्.आय.एस्. तलवार’ या तळावर येऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. संध्याकाळी ५ वाजता अॅडमिरल रॅत्रे यांनी शेवटचा कडक संदेश प्रसारित केला. यामध्ये नाविकांना विनाशर्त कामावर परत येण्यास सांगितले, तसेच नाविकांच्या समस्येवर सुनावणी करण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजताची वेळ दिली. नाविकांनी या संदेशाकडे दुर्लक्ष केले; कारण त्यांचा ब्रिटीश शासनावर विश्वास राहिला नव्हता. संध्याकाळी ६ वाजता नाविकांनी बंडाची सूचना आजूबाजूला असणार्या नौदलाच्या तळांवर प्रसारित केली. थोड्याच वेळात हे वृत्त नौदलाच्या सर्व तळांवर आणि ४५ जहाजांवर पसरले.
(क्रमशः)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/885641.html
– श्री. हृषिकेश कुलकर्णी, पुणे. (७.१.२०२५)
(साभार : ‘1946 Royal Indian Navy Mutiny : Last War of Independence’ Author : Pramod Kapoor.)