IAS Niaz Khan Statement : इस्लाम अरबस्तानातून आल्याने भारतातील प्रत्येकजण हिंदू असून  मुसलमानांनी हिंदूंना भाऊ मानावे !

मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांची ‘एक्स’वर पोस्ट

भोपाळ (मध्यप्रदेश) : इस्लाम हा अरबस्तानचा धर्म आहे. येथे सगळे हिंदू होते. हिंदूंमधील लोकांचे मुसलमानांमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे धर्म वेगवेगळे असले, तरी रक्त एकच आहे. सर्व एकाच संस्कृतीचा भाग राहिले आहेत. जर मुसलमान अरबांना आदर्श मानत असतील, तर त्यांनी पुनर्विचार करावा. सर्वप्रथम हिंदूंना भाऊ मानावे आणि नंतर अरबांना, अशी पोस्ट मध्यप्रदेशातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (इंडियन अ‍ॅडमिनिस्टे्रटिव्ह सर्व्हिस – आय.ए.एस्.चे अधिकारी) नियाझ खान यांनी ‘एक्स’वर केली आहे.

सर्व भारतीय एकाच ठिकाणाहून आले आहेत !

खान यांनी अनुवंशशास्त्राचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतियांमध्ये समान जनुके (जीन्स) आहेत. इस्लाम १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी आला; पण जनुके पालटली नाहीत. सर्व भारतीय एकाच ठिकाणाहून आले आहेत. कालांतराने लोकांनी वेगवेगळे धर्म स्वीकारले; पण सर्व भारतीय भाऊ आणि बहिणी आहेत. हिंदु आणि मुसलमान या दोन शाखा आहेत; पण मूळ एकच आहे.

अरबांना नाही, तर भारताला प्राधान्य दिले पाहिजे !

खान पुढे म्हणाले की, काही लोक अरब मुसलमानांना अधिक महत्त्व देतात; पण आपण भारताला प्राधान्य दिले पाहिजे; कारण आपण इथे एकत्र रहातो. आपण अरब मुसलमानांशीही चांगले संबंध ठेवले पाहिजेत. मानवता सर्वांत महत्त्वाची आहे, धर्म नाही. भारतीय विद्वान आपले आदर्श असले पाहिजेत, अरब विद्वान नाही. धर्म वेगळा असला, तरी हिंदू आपले भाऊ आहेत.

वाचा → आय.ए.एस्.अधिकारी नियाझ खान यांच्याशी संबंधित अन्य बातम्या !

IAS Niyaz Khan : मुसलमानांच्या वाढती लोकसंख्यामुळे जगात निर्माण झाली आहे समस्या !

हिंदूंच्या धर्मांतराला ‘बॉलीवूड’ उत्तरदायी ! – मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान

ब्राह्मणांनी त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करणे आवश्यक !

संपादकीय भूमिका

भारतातील किती मुसलमान हे मान्य करतात आणि उघडपणे बोलतात ? आणि किती प्रत्यक्ष असे वागतात ?