ब्राह्मणांनी त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करणे आवश्यक !

आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांचे वक्तव्य !

‘ब्राह्मण द ग्रेट’ पुस्तकाचे लेखक नियाझ खान

भोपाळ (मध्यप्रदेश) – हिंदु धर्मासह विविध विषयांवर ८ पुस्तके लिहिणारे आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी ब्राह्मणांना त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथील अविकसित देश त्यांची संस्कृती, प्राचीन मूल्ये अन् संस्कार यांना सोडून गतीने विकासाच्या मागे पळत आहेत. असे वाटते की, ते या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जातील. या सगळ्यात निसर्ग कुणाच्या स्मरणात राहिलेला नाही. धार्मिक गुरूंनाच विनाशाच्या या शर्यतीला रोखावे लागेल.

नियाझ खान यांनी यासंदर्भात व्हिडिओ संदेशही प्रसारित केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की,

१. विकासाच्या नावाखाली सहस्त्रावधी वृक्षांचे बलीदान दिले जाते. धरणीमातेचे हृदय कापावे लागते. आपण पर्यावरणाला हानी पोचवत आहोत.

२. आपण वेद वाचले, तर आपल्या लक्षात येईल की, आपल्या देवता प्रकृतीच्या रक्षक आहेत. त्यांचे दायित्व हे पृथ्वीचे रक्षण करणे आहे.

३. ब्राह्मणांसमोर एक नवीन आव्हान आहे. सर्व वेद आणि ब्राह्मण मानतात की, प्रकृतीचे संरक्षण झाले, तरच धरणीमातेचे रक्षण होईल. जेव्हा ब्राह्मण जागृत होतील, तेव्हा सर्वजण जागृत होतील. ब्राह्मणांनी त्यांचा दृष्टीकोन पालटून विकास निसर्गानुकूल होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रत्येक ब्राह्मण मार्गदर्शक राहिला आहे.