प्रयागराज – येथे १३ जानेवारीपासून जगातील सर्वांत मोठा सोहळा असलेल्या महाकुंभपर्वात १४ फेब्रवारीपर्यंत देश-विदेशातून ५० कोटी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. ही संख्या यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यापेक्षाच नव्हे, तर जगातील कुठल्याही सोहळ्यापेक्षा अधिक असल्याने इतिहास नोंदवला गेला आहे. ही संख्या भारत आणि चीन यांच्यापेक्षा जगातील तिसरी सर्वांत मोठी लोकसंख्या ठरली आहे. प्रयागराजमध्ये वर्ष २०१३ मध्ये झालेल्या कुंभपर्वात १९ कोटी भाविकांनी स्नान केले होते. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या अर्धकुंभमेळ्यात २४ कोटी भाविकांनी स्नान केले होते. आता ही संख्या ५० कोटींहून अधिक झाली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी, म्हणजे २६ फेब्रुवारीला महाकुंभपर्वातील अंतिम स्नान असणार आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढणार आहे.