प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सामाजिक माध्यमांतून महाकुंभाविषयी खोट्या पोस्ट करणार्यांवर उत्तरप्रदेश पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांवरील ७ खात्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार पोलीस महानिदेशक प्रशांत कुमार यांनी सामाजिक माध्यमांवरील अशा खात्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई चालू केली आहे.
वर्ष २०२१ मध्ये गाझीपूर येथील एका नदीकिनारी आढळलेल्या मृतदेहांच्या जुन्या व्हिडिओला महाकुंभामध्ये चेंगराचेंगरीतील मृतदेह असल्याचे सांगून या खात्यांवरून खोटा प्रचार करण्यात आला. या खात्यांवर राज्य सरकार आणि पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा, तसेच समाजात तणाव निर्माण करण्याचा आरोप आहे. प्रयागराजमधील कुंभमेळा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे नोंद करण्यात आले असून कायदेशीर कारवाई चालू आहे. कुंभमेळा पोलिसांनी त्यांच्या अधिकृत खात्यांवरून या व्हिडिओचे खंडण करणारी पोस्ट प्रसारित केली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही भ्रामक माहितीकडे लक्ष न देण्याचे आणि संशयास्पद पोस्टची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.
गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेली ही आहेत ७ खाती !
१. Yadavking००००११ (@Yadavking००००११) – इन्स्टाग्राम
२. Komal Yadav (@komalyadav_lalubadi९४) – इन्स्टाग्राम
३. Amar Nath Yadav (amar_ydvkvp_५३५४_) – मेटा थ्रेड
४. Banwari Lal – Bairwa (@B_L__VERMA) – एक्स
५. Kavita Kumari (@KavitaK२२६२८) – एक्स
६. Sonu Chaudhary (SonyChaudhary७०) – एक्स
७. Putul Kumar Kumar (@Puatulkumar९७९५) – यूट्यूब