वर्ष २०२५ मधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याविषयी श्री. राम होनप यांना देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

‘१३.१.२०२५ ते २६.२.२०२५ या कालावधीत प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे महाकुंभमेळा आहे. १२ पूर्ण कुंभमेळ्यांनंतर १४४ वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. तेथे गंगा आणि यमुना या नद्या आहेत, तसेच पौराणिक कथेनुसार ‘सरस्वती नदीही तेथे येते’, असे मानले जाते. या तीन नद्यांच्या संगमामुळे प्रयागराजला ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. ‘या महाकुंभमेळ्यात सूक्ष्मातून काय घडते ?’, याचे मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे. या लेखाचा काही भाग ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी प्रसिद्ध झाला. आज उर्वरित भाग पाहूया.

आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/883520.html

श्री. राम होनप

२. महाकुंभमेळ्यात तीर्थात स्नान करण्यासाठी येणारे सूक्ष्म लोकांतील जीव !

२ इ. ऋषीलोक : ऋषींचा सूक्ष्म लोक हा स्वर्गलोकाच्याच पातळीला आहे. त्याला ‘ऋषीलोक’, असे म्हणतात. महाकुंभमेळ्यात काही ऋषी ऋषीलोकातून खाली येऊन सूक्ष्मातून प्रयागराज येथील तीर्थात ३ – ४ सेकंद प्रवेश करतात. त्या वेळी ते ऋषी सूक्ष्मातून तीर्थस्नानाचा अनुभव घेतात आणि लगेच ऋषीलोकात परत जातात. तीर्थात स्नान केल्यामुळे त्या ऋषींच्या चित्ताची काही अंशी शुद्धी होते आणि त्यांच्या पुढील साधनेला चालना मिळते.

२ ई. सर्पलोक / नागलोक : शिवलोकाच्या खाली सूक्ष्मातील ‘सर्पलोक’ किंवा ‘नागलोक’ आहे. तेथील सर्पांमध्ये विष असते. सर्पांमधील विष हीच त्या सर्पांची शक्ती मानली जाते.

२ ई १. सर्पांमध्ये सूक्ष्मातून विषाची निर्मिती कशी होते ? : सर्प हे विषाच्या प्राप्तीसाठी भगवान शिवाची साधना करतात. शिवाच्या शुद्ध तमोगुणी लहरींतून विषारी वायू निर्माण होतो. सर्पांच्या साधनेमुळे या विषारी वायूचे रूपांतर विषाच्या थेंबांमध्ये होते. साधना केल्याने सर्पांना भगवान शिवाकडून विषाचे थेंब प्राप्त होतात. त्याला सर्पांचा ‘विषसंचय’, असे म्हणतात.

२ ई २. काही सर्प महाकुंभमेळ्यात स्वतःचे विष अर्पण करून मुक्त होत असणे : सर्पलोकातून काही सर्प महाकुंभमेळ्यात प्रयागराज येथील तीर्थाजवळ सूक्ष्मातून येतात. ते सर्प स्वतःतील विषाचे थेंब, म्हणजेच त्यांची साधना तीर्थात अर्पण करतात आणि स्वतःकडून झालेल्या पापांविषयी गंगामाता अन् भगवान शिव यांच्याकडे क्षमायाचना करतात. त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अन् त्याच क्षणी असे सर्प त्या योनीतून मुक्त होतात. शिवाच्या कृपेमुळे त्या सर्पांना अल्पावधीतच मनुष्यजन्म प्राप्त होतो. या जन्मात त्यांना ब्राह्मण वर्ण प्राप्त होतो.

२ ई ३. सर्पांनी तीर्थात विष अर्पण केल्यावर त्याचा तीर्थावरील विपरीत परिणाम कसा दूर होतो ? : काही सूक्ष्म सर्प विषाचे सूक्ष्म थेंब तीर्थात अर्पण करतात. त्याच क्षणी सरस्वती नदीची उपशक्ती ‘सुररक्षिणीदेवी’ त्या तीर्थातील विषारी थेंब नष्ट करते. त्यामुळे त्या सूक्ष्म विषाचा विपरीत परिणाम तेथे स्नान करणार्‍या भाविकांवर होत नाही.

२ उ. शिवलोक : शिवलोकातील सूक्ष्म शिवगण हे शिवाच्या आज्ञेने महाकुंभमेळ्यात प्रयागराज येथील तीर्थात स्नान करतात. शिवगणांचे हे स्नान महाकुंभमेळ्यातील मधल्या काळात (टीप) होते. त्या वेळी शिवगण शिवलोकातून सूर्याेदयाच्या वेळी वाजत-गाजत खाली येतात आणि काही क्षणांत तीर्थस्नान करून परत शिवलोकात परत जातात.

टीप – या वर्षीचा महाकुंभमेळा ४५ दिवसांचा आहे. या ४५ दिवसांपैकी पहिले १५ दिवस आणि शेवटचे १५ दिवस सोडून मधल्या १५ दिवसांच्या कालावधीत

३. सूक्ष्म लोकातील जिवांना पृथ्वीवरील महाकुंभमेळ्याचे ज्ञान कसे होते ?

३ अ. वातावरणातील सात्त्विकतेत वाढ होणे : महाकुंभमेळ्यात प्रयागराज येथील तीर्थामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या देवींच्या प्रगट शक्तीत वाढ होते. त्यामुळे वातावरणातील सात्त्विकतेत अनेक पटींनी वाढ होते. वातावरणातील हा पालट सूक्ष्म लोकांतील जिवांना समजतो.

महाकुंभमेळ्याच्या काळात सूक्ष्म लोकांतील जिवांना पृथ्वीवरून मंगल शक्ती, पवित्र शक्ती किंवा प्रगट शक्ती वर येतांना जाणवते. त्यावरून त्यांना पृथ्वीवरील महाकुंभमेळ्याचे ज्ञान होते.

३ आ. पृथ्वीवर दैवी कणांचे आच्छादन सिद्ध होणे : महाकुंभमेळ्यात प्रयागराज येथील तीर्थाद्वारे देवीच्या शक्तीचे प्रगटीकरण वाढू लागले की, पृथ्वीवर सूक्ष्मातून लाल, निळा, तांबूस, हिरवा, सोनेरी आणि चंदेरी या रंगांच्या दैवी कणांचे आच्छादन निर्माण होऊ लागते. हे पाहून सूक्ष्म लोकातील काही जिवांना प्रश्न पडतो, ‘पृथ्वीवर असे काय विशेष घडत आहे ?’ तेव्हा त्यांना ज्ञान होते, ‘पृथ्वीवर महाकुंभमेळा चालू असून त्याचा हा परिणाम आहे.’

या वेळी सूक्ष्म लोकांतील जिवांना पृथ्वीकडे पहातांना काळे-पांढरे ढग न दिसता विविध दैवी कणांचे ढग दिसतात. त्यामुळे ते जीव या परिवर्तनाचा उल्लेख ‘मेघवर्ण-परिवर्तन’, असा करतात.

महाकुंभमेळा संपल्यानंतर हे दैवी कणांचे आच्छादन नाहीसे होते.

३ इ. अंतर्ज्ञानाद्वारे समजणे : सूक्ष्म लोकांतील काही जिवांना अंतर्ज्ञान असते. त्यामुळे त्यांना पृथ्वीवरील महाकुंभमेळ्याचे ज्ञान होते.’

(समाप्त)

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.