वर्ष २०२५ मधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याविषयी श्री. राम होनप यांना देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

‘१३.१.२०२५ ते २६.२.२०२५ या कालावधीत प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे महाकुंभमेळा आहे. १२ पूर्ण कुंभमेळ्यांनंतर १४४ वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. तेथे गंगा आणि यमुना या नद्या आहेत, तसेच पौराणिक कथेनुसार ‘सरस्वती नदीही तेथे येते’, असे मानले जाते. या तीन नद्यांच्या संगमामुळे प्रयागराजला ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. ‘या महाकुंभमेळ्यात सूक्ष्मातून काय घडते ?’, याचे मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. महाकुंभमेळ्यात तीर्थात स्नान केल्याने भाविकांना होणारे लाभ ! 

महाकुंभमेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या उपशक्ती सूक्ष्मातून कार्य करत असतात. गंगा या नदीची उपशक्ती ‘पापहारिणीदेवी’, ही आहे. यमुना या नदीची उपशक्ती ‘मांगल्यरूपिणीदेवी’, ही आहे. सरस्वतीदेवीची उपशक्ती ‘सुररक्षिणीदेवी’, ही आहे. यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.

१ अ. गंगा नदीची उपशक्ती ‘पापहारिणीदेवी’: गंगा नदीची उपशक्ती ‘पापहारिणीदेवी’ आहे. ही देवी प्रयागराज येथील तीर्थात स्नान करणार्‍या भाविकांच्या ‘पाप-शाप-ताप’, यांचे हरण करते. त्यामुळे या देवीला ‘पाप-शाप-ताप हारिणी’, असेही म्हणतात.

श्री. राम होनप

व्यक्तीने अयोग्य कर्म केल्याने तिला ‘पाप’ लागते. व्यक्तीने दुसर्‍याचे वाईट केल्याने त्याचा ‘शाप’ वाईट कर्म करणार्‍या व्यक्तीला लागतो. येथे ‘ताप’ हा शब्द त्या व्यक्तीच्या प्रारब्धाला उद्देशून आहे. अशा प्रकारे ‘पापहारिणीदेवी’ तीर्थात स्नान केलेल्या व्यक्तीचे ‘पाप-शाप-ताप’ दूर करते’, असे म्हटले आहे.

१ अ १. तीर्थात स्नान केल्याने कुणाची शुद्धी होते ? : ज्या व्यक्तीला स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी तीव्र खंत वाटून पश्चात्ताप होतो आणि त्यासाठी ती देवाकडे क्षमायाचना करते, तसेच त्या तीर्थाला साक्षी मानून देवाला ‘या चुका परत होणार नाहीत’, असे वचन देते, त्या व्यक्तीची तीर्थात स्नान केल्याने आंतरिक शुद्धी होते. तसे न केल्यास तिच्या केवळ शरिराची शुद्धी होते.

१ अ २. तीर्थात स्नान केल्याने व्यक्तीची शुद्धी कशी होते ? : व्यक्तीने केलेल्या पापकर्मांमुळे तिच्या चित्तावर अनेक सूक्ष्म रज-तम कण चिकटलेले असतात. तीर्थात स्नान करतांना त्या व्यक्तीने तिच्या पापकर्मांविषयी देवाकडे क्षमायाचना करून खंत व्यक्त करताच तिच्या चित्तावरील पापकर्मांशी संबंधित रज-तम कण त्या तीर्थात द्रवीभूत होऊ लागतात. त्या वेळी हे रज-तम कण तिच्या चित्तापासून विलग होतात आणि ते तीर्थाच्या पाण्यात मिसळतात.

त्या तीर्थात निळा, लाल आणि पांढरा, या रंगांचे सूक्ष्म दैवी कण असतात. हे सर्व सूक्ष्म दैवी कण ईश्वरी तेजाने भारित असतात. त्यामुळे त्या कणांना ‘तेजोकण’, असे म्हणतात. हे तेजोकण तीर्थात स्नान करणार्‍या व्यक्तीच्या पापकर्मांशी संबंधित रज-तम कण नष्ट करतात. अशा प्रकारे काही वेळातच त्या व्यक्तीची आंतरिक शुद्धी होते. ही प्रक्रिया महाकुंभमेळ्यात शीघ्र गतीने आणि परिणामकारक होते. त्यामुळे सनातन धर्मात महाकुंभमेळ्यात स्नान करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे.

१ आ. यमुना नदीची उपशक्ती ‘मांगल्यरूपिणीदेवी’ : यमुना या नदीची उपशक्ती ‘मांगल्यरूपिणीदेवी’ आहे. जे लोक देवाचे स्मरण करत मनोभावे तीर्थात स्नान करतात, त्यांना ‘मांगल्यरूपिणीदेवी’चा आशीर्वाद प्राप्त होतो. ही देवी इतरांचे नेहमी मंगल करते. त्यामुळे तिला ‘मांगल्यरूपिणीदेवी’, असे म्हणतात. या देवीच्या कृपेमुळे व्यक्तीला आरोग्य, आयुष्य आणि सुख यांची प्राप्ती होते.

१ इ. सरस्वती नदीची उपशक्ती ‘सुररक्षिणीदेवी’ : सरस्वती नदीची उपशक्ती ‘सुररक्षिणीदेवी’ आहे. येथे ‘सुर’, हा शब्द तीर्थस्थानी येणार्‍या भाविकांना उद्देशून आहे. वाईट शक्ती तीर्थात स्नान करणारा भाविक आणि तीर्थ या दोघांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. या दोघांचे रक्षण ‘सुररक्षिणीदेवी’ करत असते. तिला ‘तीर्थरक्षिणी’, ‘क्षेत्ररक्षिणी’ किंवा ‘जलरक्षिणी’, असेही म्हणतात.

२. महाकुंभमेळ्यात तीर्थात स्नान करण्यासाठी येणारे सूक्ष्म लोकांतील जीव !

२ अ. अतृप्त आत्मे : वातावरणात असंख्य अतृप्त आत्मे असतात. त्यांपैकी काही अतृप्त आत्म्यांना महाकुंभमेळ्यातील तीर्थस्नानाचा आध्यात्मिक लाभ घेऊन मुक्त व्हायचे असते; परंतु ‘त्यांच्या हातून पूर्वी घडलेली पापकर्मे आिण तीर्थक्षेत्री असलेली सात्त्विकता’, यांमुळे त्यांना तेथे सूक्ष्मातून प्रवेश करता येत नाही. त्यामुळे हे अतृप्त आत्मे तीर्थक्षेत्राचा पुढील टप्प्यांनुसार आध्यात्मिक लाभ घेतात आणि मुक्त होतात.

२ अ १. अतृप्त आत्म्यांनी तीर्थक्षेत्राचा आध्यात्मिक लाभ घेण्यातील टप्पे

२ अ १ अ. अवलोकन : अतृप्त आत्मे तीर्थाच्या परिसराचे प्रथम अवलोकन, म्हणजेच निरीक्षण करतात. ते ‘कोणत्या ठिकाणी थांबून सुरक्षितपणे प्रयागराज येथील पवित्र नद्यांचे दर्शन घेता येईल ?’, याची प्रथम सूक्ष्मातून पहाणी करतात. या प्रक्रियेला ‘अतृप्त आत्म्यांनी तीर्थक्षेत्राचे अवलोकन करणे’, असे म्हणतात.

२ अ १ आ. अनुभव : अवलोकन झाल्यानंतर अतृप्त आत्मे सूक्ष्मातून स्वत:चे एक स्थान निश्चित करतात. त्या ठिकाणी स्थिर राहून ते प्रामुख्याने गंगा आणि भगवान शिव यांचे काही काळ मनोभावे स्मरण करतात अन् स्वतःकडून झालेल्या पापकर्मांविषयी शिवाकडे क्षमायाचना करतात. या प्रक्रियेला ‘अतृप्त आत्म्यांनी तीर्थक्षेत्राचा अनुभव घेणे’, असे म्हटले आहे.

२ अ १ इ. गमन : त्यानंतर काही अतृप्त आत्म्यांची महाकुंभमेळ्यातील काळात ठराविक साधना झाली की, त्यांच्यावर गंगामाता आणि भगवान शिव यांची कृपा होते. त्यामुळे त्या अतृप्त आत्म्यांना पुढील गती प्राप्त होते. त्याला ‘अतृप्त आत्म्यांचे गमन’, असे म्हणतात. उर्वरित अतृप्त आत्म्यांची पापकर्मांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते.

वरील प्रक्रियेनुसार अतृप्त आत्मे ‘अवलोकन-अनुभव-गमन’, या टप्प्यांद्वारे महाकुंभमेळ्यात स्वतःची मुक्ती साध्य करतात.

२ आ. पितर : महाकुंभमेळ्याचा आध्यात्मिक लाभ काही पितरही घेतात. काही पितरांना पितरयोनीतून मुक्त होऊन पुढील गती प्राप्त करण्याची इच्छा असते. त्या पितरांना प्रयागराज येथील तीर्थात स्नान करायचे असते; परंतु त्यांच्या हातून पूर्वी झालेल्या पापकर्मांमुळे त्यांना तीर्थाला स्पर्श करता येत नाही. अशा वेळी ते पितर तीर्थाजवळ जाऊन तीर्थाचा सूक्ष्मातून गंध घेतात. ‘तीर्थाचा गंध घेणे’, हे त्या पितरांचे स्नान मानले आहे. त्याला पितरांचे ‘गंधस्नान’, असे म्हटले आहे.

‘त्या तीर्थाचा दैवी गंध घेणे आणि स्वतःच्या चुकांविषयी झालेला पश्चात्ताप’, यांमुळे त्या पितरांची पितर योनीतून मुक्तता होते अन् त्यांना पुढील गती प्राप्त होते. तीर्थाचा गंध घेत असतांना पितरांना तीर्थावरील सूक्ष्म दैवी कणांचे दर्शन होत असते.

(क्रमश:)

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.