१६ वर्षांखालील मुलांना इंटरनेट वापरण्यापासून दूर ठेवणारे विधेयक नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या सभागृहात मांडण्यात आले. संसदेतील ११५ सदस्यांपैकी १०२ सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे लवकरच ते कायद्याच्या स्वरूपात जनतेसमोर येईल. कायदा करतांना त्यामध्ये सामाजिक माध्यमांवरही मर्यादा घालण्यात येणार आहेत. ‘टिकटॉक’, ‘फेसबुक’, ‘स्नॅपचॅट’, ‘रेडिट’, ‘एक्स’, ‘इंस्टाग्राम’ अशा कोणत्याही सामाजिक माध्यमांवर १६ वर्षांखालील मुलांना खाते बनवता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणार्या सामाजिक माध्यमांना सुमारे अडीच अब्ज रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. काही मोजकी मंडळी सोडली, तर देशभरातून या विधेयकाचे स्वागत करण्यात आले. लहान मुलांकडून इंटरनेट आणि सामाजिक माध्यमे यांचा केला जाणारा अतीवापर ही देशासमोर एक मोठी समस्या बनली होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे.
भारतातही लहान मुलांकडून सामाजिक माध्यमांचा आणि इंटरनेटचा बेसुमार वापर केला जात आहे. ज्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. हट्ट करणार्या मुलाला शांत ठेवण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी सध्या पालक सर्रास पाल्याच्या हाती भ्रमणभाष देतात. काही जण तर आपल्या मुलांना स्वतंत्र भ्रमणभाष देतात. मुले व्हिडिओ गेम खेळण्यात किंवा ‘रिल्स’(छोट्या ध्वनीचित्रफीत) पहाण्यात घंटोन्घंटे रमतात. रिल्सना वयाचे बंधन नसल्याने हिंस्र, अश्लील, शिव्यांचा वापर असलेले रिल्स मुलांच्या पहाण्यात येतात. मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. मुलांच्या तोंडी शिव्या आल्याने भांडणे वाढतात. दळणवळण बंदीच्या काळात मुले भ्रमणभाष वापरण्यात पारंगत झाली. शिक्षणाव्यतिरिक्त मनोरंजनाचे प्रचंड मोठे दालन या हातात मावणार्या भ्रमणभाषमध्ये सामावले असल्याचे लहान वयातच ज्ञात झाल्याने मुले मनोरंजनाच्या आणि खेळाच्या अन्य साधनांपेक्षा ‘स्मार्ट फोन’मध्ये अधिक रमू लागली आहेत. भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे किंवा तो न दिल्यास चिडचिड करणे, राग येणे, सूड भावनेने वागणे, तुलना करणे, मनोराज्यात रमणे यांसारखे दोष वाढले आहेत. इतरांच्या तुलनेत ‘स्मार्ट फोन’ वापरणार्या मुलांमध्ये अपमानाचे आणि आत्महत्येचे विचार अधिक येतात. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ‘कार्टून’ अधिक प्रमाणात बघून मुले त्यातील पात्रांप्रमाणेच वागू लागतात. मुलांच्या मानसिक आरोग्यावर भ्रमणभाष पहाण्याचा विपरीत परिणाम होतो. त्यांची शारिरिक आणि बौद्धिक वाढही खुंटते. भ्रमणभाष पाहून पौगंडावस्थेतील मुले व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्याचेही निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. मुली भावनाशील असल्याने लहान मुलींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा लवकर परिणाम होतो. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतानेही तशी बंधने आणणे आवश्यक आहे.