Waqf Amendment Bill : संयुक्त संसदीय समितीने वक्फ सुधारणा विधेयक केले संमत !

संयुक्त संसदीय समिती

नवी देहली – वक्फ सुधाणा विधेयकाच्या संदर्भात संसदेने स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने या विधेयकाला २९ जानेवारी या दिवशी संमती दिली. समितीच्या १६ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर ११ सदस्यांनी विरोधात मतदान केले. या समितीचे अध्यक्ष असणारे खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, आता हा अहवाल ३० जानेवारी या दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर सादर केला जाईल. ते पुढील कारवाई करतील.

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ! – ए. राजा

द्रविड मुन्नेत्र कळघम खासदार ए. राजा

१. द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार ए. राजा म्हणाले की, भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी त्यांच्या इच्छेनुसार समितीचे कामकाज चालवले. या प्रक्रियेची त्यांनी खिल्ली उडवली. मला वाटते की, समितीचा अहवालही आधीच सिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावित कायदा घटनाविरोधी असेल आणि आमचा पक्ष त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाईल. समितीमध्ये केलेले युक्तीवाद आणि सादर केलेली कागदपत्रे या कायद्याला आव्हान देण्यासाठी साहाय्य करतील.

२. ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमचे, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आम्हाला काल रात्री ६५५ पानांचे प्रारूप मिळाले. ६५५ पानांचे प्रारूप एका रात्रीत वाचणे अशक्य आहे. मी माझे असहमती व्यक्त केली आहे आणि संसदेतही या विधेयकाला विरोध करणार आहे.

३. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि नदीमुल हक, आपचे खासदार  नेते संजय सिंह आणि शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी औपचारिकपणे त्यांचे मतभेद नोंदवले आहेत.