राजकोट (मालवण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवीन पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

महाराष्ट्र दिनी पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

मालवण – शहरातील मेढा येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. २५ एप्रिलपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून १ मे या महाराष्ट्र दिनी या नवीन पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मालवणमध्ये ४ डिसेंबर २०२३ या दिवशी झालेल्या नौदलदिनाच्या निमित्ताने राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे अनावरण झाले होते; मात्र अवघ्या ८ महिन्यांतच म्हणजे २६ ऑगस्ट २०२४ या दिवशी पुतळा कोसळला. यामुळे महाराष्ट्रासह देशात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्या वेळी राज्याने तातडीने नवीन पुतळा उभारण्याचा निर्णय घेऊन त्यादृष्टीने कार्यवाही चालू केली होती.

शिल्पकार राम सुतार

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या ‘राम सुतार आर्ट्स क्रिएशन’ या आस्थापनाला  देण्यात आले. १९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पुतळा उभारण्याच्या कामाची पायाभरणी करण्यात आली, तर ३ मार्चला प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.