‘राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताहा’च्या निमित्ताने २४ एप्रिल या दिवशी पडताळणी शिबिर !

कोल्हापूर, २२ एप्रिल (वार्ता.) – प्रत्येक वर्षी २० ते २६ एप्रिल या कालावधीत ‘राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह’ साजरा केला जातो. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते जगभरात ६ जोडप्यांपैकी २ जोडप्यांना वंध्यत्व निवारणासाठी साहाय्य घ्यावे लागते. राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने कोल्हापूर महापालिका आणि ‘श्री सिद्धगिरी रुग्णालया’च्या जननी ‘आय.व्ही.एफ्. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने वंध्यत्व निवारणासाठी एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने पडताळणी शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. या प्रसंगी ‘सिद्धगिरी जननी’च्या संचालिका डॉ. वर्षा पाटील उपस्थित होत्या.

महापालिका आणि सिद्धगिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गुरुवारी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे विनामूल्य बाह्य पडताळणी चालू करण्यात येणार आहे. तरी शहरातील पात्र जोडप्यांनी याचा लाभ घ्यावा.’’

डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, ‘‘भारत देश १.४५ अब्ज लोकसंख्येचा असूनही भारताचा प्रजननदर घसरत आहे. वर्ष १९५० मध्ये भारताचा प्रजननदर ६.१८ होता, तर वर्ष २०२१ मध्ये तो १.९ पर्यंत खाली आला आहे. देशातील अंदाजे १० ते १५ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. सुमारे २७.५ दशलक्ष जोडप्यांना प्रजनन समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. लोकसंख्या शास्त्रज्ञानांच्या मते अल्प प्रजननदरामुळे वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही समस्या लक्षात घेऊन २० ते २६ एप्रिल या कालावधीत ‘राष्ट्रीय प्रजनन जागरूकता सप्ताह’ साजरा केला जात आहे. या समस्यांवर योग्य वयात विवाह आणि गर्भधारणा, संतुलित आहार, व्यसनमुक्ती आणि ताणतणावाचे व्यवस्थापन आवश्यक आहे.’’