केरळ येथील रहिवाशाकडून ११ कोटी ७ लाख रुपयांचे ‘एल्.एस्.डी.’ कह्यात

पोलिसांची ‘एल्.एस्.डी.’ अमली पदार्थाच्या विरोधातील सर्वांत मोठी कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने ११ कोटी ७ लाख रुपये किमतीचे ‘एल्.एस्.डी.’ अमली पदार्थ कह्यात घेतले आहे. ‘एल्.एस्.डी.’ अमली पदार्थाच्या विरोधातील राज्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. ही कारवाई बामणवाडो, शिवोली येथील भाड्याच्या घरात करण्यात आली. या ठिकाणी आरोपी गेल्या ६ मासांपासून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा व्यवसाय चालवत होता, असा पोलिसांचा दावा आहे.

पोलीस अधीक्षक सुनीता सावंत

ही माहिती अमली पदार्थविरोधी विभागाच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘या प्रकरणी केरळचा रहिवासी २९ वर्षीय महंमद समीर याच्याकडून ११०.७ ग्रॅम उच्च मायक्रॉन लिक्विड ‘एल्.एस्.डी.’ सापडले आहे. ‘एल्.एस्.डी.’ हे एक अतिशय प्रभावी अमली पदार्थ असून त्याचा सामान्यतः ट्रान्स पार्ट्यांमध्ये वापर केला जातो. संशयित महंमद गेल्या ५ वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास होता. बागा येथे तो एक गेस्ट हाऊस चालवत होता.’’