अनधिकृत मांस पकडल्याचे सांगून मागितली लाच
पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – मडगाव येथील कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गुडलर आणि मुख्य हवालदार महंमद हुसेन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ एप्रिलच्या रात्री लाच घेतांना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ एप्रिल या दिवशी मांसविक्री करणार्या बेळगाव येथील एका व्यापार्याने या दोन्ही पोलीस अधिकार्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. मुख्य हवालदार महंमद हुसेन याने मांस विक्रेत्याशी संपर्क साधून त्याचे अनधिकृत मांस मडगाव येथे पकडले गेल्याचे त्याला सांगितले; मात्र ‘पकडलेल्या साठ्याशी आपला काहीच संबंध नाही’, असे सांगूनही तक्रारदाराला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची धमकी देण्यात आली. ‘या प्रकरणातून सुटायचे असेल, तर २ लाख रुपये आणि प्रतिमास २५ सहस्र रुपये द्यावे लागतील’, असे मांस विक्रेत्याला सांगण्यात आले. तक्रारदाराने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ एप्रिलच्या रात्री सापळा रचला. व्यापार्याने २५ सहस्र रुपये रोख रक्कम पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्याकडे दिली आणि ती त्याने त्याच्या टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली. याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोकण रेल्वे पोलीस ठाण्यावर धाड टाकली. या वेळी तेथे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर, मुख्य हवालदार महंमद हुसेन आणि तक्रारदार व्यापारी उपस्थित होते. पथकाने लाच स्वरूपात दिलेले २५ सहस्र रुपये कह्यात घेतले. पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क म्हणाले, ‘‘पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या घराची झडती घेतली जाणार आहे आणि बेहिशेबी मालमत्तेसंबंधी अन्वेषण केले जाणार आहे. या दोन्ही अधिकार्यांना सेवेतून निलंबित करण्याची शिफारस पोलीस प्रशासनाकडे करणार आहे.’’