
कोल्हापूर, २२ एप्रिल (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख हा नेहमी आदरार्थीच असला पाहिजे. असे असतांना ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या नावात आणि पक्षात हा उल्लेख सातत्याने ऐकरी केला जातो. तरी ‘संभाजी बिग्रेड’ने त्यांच्या नावात पालट करून ते ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’, असे करावे, अन्यथा त्यांची संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी, या मागणीसाठी ‘शिवधर्म फाऊंडेशन’ संघटनेच्या वतीने दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या अंती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. दीपकअण्णा काटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, ‘हिंदु एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री संताजीबाबा घोरपडे, संग्राम निकम, सौरभ निकम यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.