उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त

धमकी खोटी असल्याचे निष्पन्न

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंठपिठाची पर्वरी येथील इमारत बाँबस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल न्यायालयाला आल्यामुळे २२ एप्रिल या दिवशी न्यायालयात गोंधळ उडाला. यामुळे सुरक्षा यंत्रणांना धावपळ करावी लागली. ही माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्यावर अग्नीशमन दल, बाँबस्फोट निकामी पथक, आतंकवादविरोधी पथक आणि इतर यांना सतर्कतेची सूचना देण्यात आली. संपूर्ण न्यायालय इमारतीची झडती घेण्यात आली; मात्र ही धमकी खोटी असल्याचे समोर आले.

गोव्यात धमकीचे बनावट संदेश पाठवण्याचे सत्र चालूच असून २२ एप्रिल या दिवशी आलेला ई-मेल हा पाचवाई-मेल आहे. यापूर्वी गोवा पोलीस मुख्यालय, म्हापसा अतिरिक्त न्यायालय, काणकोण बसस्थानक आदी ठिकाणे बाँबने उडवून देण्याचे ई-मेल संबंधितांना आले होते; मात्र हे सर्व नंतर अन्वेषणात खोटे असल्याचे लक्षात आले.

बनावट धमकीचे ई-मेल पाठवणार्‍यांचा शोध घेण्यास पोलिसांना अजूनही यश आलेले नाही; मात्र काही ‘आयपी ॲड्रेस’वर (इंटरनेट प्रोटोकॉल वापरणार्‍या संगणक नेटवर्कशी जोडलेल्या प्रत्येक उपकरणाला दिलेले एक अद्वितीय संख्यात्मक लेबल) विदेशातील ठिकाण (लोकेशन) आढळले आहे.