
पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – म्हापसा बसस्थानकात उघडपणे मद्य पिणार्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर अबकारी खात्याने तात्काळ कारवाई करत मद्याच्या अनेक दुकानांवर धाड टाकली. तेव्हा या दुकानांतून मद्याची अवैधरित्या किरकोळ विक्री केली जात असल्याचे आणि मद्यसाठ्याची योग्य नोंदही ठेवली जात नसल्याचे अबकारी खात्याच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आले.
सौजन्य : Prudent Media Goa
सामाजिक माध्यमात प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये मुख्यतः स्थलांतरित कामगार उघडपणे मद्य पीत असल्याचे आणि काही जण पदपथावर मद्यधुंद (नशेत) अवस्थेत झोपल्याचे दिसून येत आहे. या दृश्यांमुळे सामाजिक माध्यमामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अबकारी खात्याने तात्काळ पावले उचलून संबंधित दुकानांच्या विरोधात कायदेशीर कारवाईला आरंभ केला.