
पुणे – डेक्कन जिमखाना आणि शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग जोडणारा बाबा भिडे पूल २१ एप्रिल ते ६ जून या काळात वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना स्थानकाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही कल्पना न देता १९ एप्रिल या दिवशी हा पूल अचानक बंद केल्याने गोंधळ निर्माण झाला. पूल बंद ठेवणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने महापालिकेला दिली नव्हती. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळ पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा, अशी अनुमती पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे मागितली होती. वाहतूक शाखेने ही अनुमती दिली; मात्र याची महापालिकेला कल्पना न दिल्याने गोंधळ झाला. नागरिकांनी भिडे पूल बंद केल्यानंतर छत्रपती संभाजी पूल (लकडी पूल), विठ्ठल रामजी शिंदे पूल (बालगंधर्व पूल) आणि काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज) या पर्यायी पुलांचा वापर करावा, असे आवाहन मेट्रोने केले आहे.
डेक्कन मेट्रो स्टेशन परिसरात पादचारी पूल उभारण्याचे काम चालू असून यामध्ये वाहतुकीचा अडथळा होऊ नये, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा पूल काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.