सांडपाणी स्वच्छतेसाठी येणारा ९५ कोटी रुपयांचा खर्च टप्प्याटप्प्याने देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय !

पुणे महानगरपालिका

पुणे – शहरातील सांडपाणी वाहिन्या स्वच्छतेसाठी १३ गाड्या खरेदी करण्यासाठी ९५ कोटी रुपये महापालिकेला राज्यशासनाला द्यावे लागणार होते; मात्र हे पैसे गाड्या आल्यानंतर टप्प्याटप्प्याने जसे काम पूर्ण होईल, तसे दिले जातील, असे पत्र महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नगर परिषद प्रशासन संचालनालयाला पाठवले आहे. १८.५ टन उच्च क्षमतेच्या ८ गाड्या आणि ७ ते ८ टन क्षमता असलेल्या ५ गाड्या अशा १३ गाड्यांची नोंदणी महापालिकेने केली आहे. नगर परिषद संचालनालयाने महापालिकेला पत्र पाठवून निविदा प्रक्रिया न करता थेट गाड्या घेण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या वतीने पहिल्या २ गाड्या महापालिकेला हस्तांतरित केल्या आहेत. या गाड्या विनामूल्य दिल्या असल्याचे महापालिकेला प्रशासनाने स्पष्ट केले आहे; मात्र यापुढे गाड्या घेतांना आगाऊ पैसे दिले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. गाड्यांसाठी लागणारा निधी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून टप्प्याटप्प्याने दिला जाईल. १३ गाड्या आल्यानंतर अतिरिक्त यंत्रांची देयके स्वीकृत निविदेच्या अटी आणि शर्ती यांअन्वये महापालिकेने स्वतः ठेकेदारास द्यावी. निविदेतील दरानुसार महापालिकेला परस्पर देयक देण्याची अनुमती द्यावी, असेही पत्रात नमूद केले आहे. सांडपाणी वाहिनी स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक वाहनाला ८ घंट्यांसाठी २६ सहस्र रुपये इतके भाडे आहे. एक गाडी दोन पाळ्यांमध्ये काम करणार असून एका दिवसासाठी ५२ सहस्र रुपये भाडे असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.