Siddharth Marries Penelope : महाकुंभक्षेत्रात संतांच्या उपस्थितीत देहलीच्या योगगुरु समवेत विदेशी तरुणीचा हिंदु पद्धतीने विवाह !

विवाहाला साधू-संत वर्‍हाडी म्हणून आले !

प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – कुंभक्षेत्री ग्रीस येथील पेनेलोप नावाची तरुणी आणि देहली येथील योगगुरु सिद्धार्थ शिव खन्ना यांनी हिंदु परंपरेनुसार विवाह केला. या विवाह सोहळ्यात साधू-संत वर्‍हाडी म्हणून आले होते, तर जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्रानंद गिरि यांनी कन्यादान केले. पेनेलोप या ग्रीस येथील एथेंस महाविद्यालयाच्या पर्यटन व्यवस्थापनाच्या पदवीधर आहेत, तर सिद्धार्थ खन्ना हे विविध देशांत जाऊन योगाचे शिक्षण देत आहेत. दोघांची भेट ९ वर्षांपूर्वी थायलंड येथे झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी कुंभक्षेत्री विवाह करण्याचा निर्णय घेतला.

पेनेलोप यांनी भारतात विवाह करण्याचा निर्णय घेतला; कारण त्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अनुभव घ्यायचा होता. याविषयी पेनेलोप म्हणाली, ‘‘मी प्रथम बौद्ध पंथाशी जोडलेली होती. माझ्या आयुष्यात जे काही झाले, त्या दुःखाचे कारण मी शोधत होते. त्यानंतर मी सनातन धर्माशी जोडली आहे. सनातन धर्मच आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. आज मला इतका आनंद झाला आहे की, तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझा विवाह वैदिक शास्त्रांनुसार आध्यात्मिक पद्धतीने झाला आहे. सनातन धर्म हा आनंदी जीवन जगण्याचा आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. माझ्या आयुष्यातील दुःखांचा उपाय मला येथे सापडला आहे. ही विवाह पद्धत पुष्कळ आध्यात्मिक आणि दिव्य होती. यापूर्वी मी कधी भारतीय विवाहात सहभागी झालेली नाही; मात्र माझा पहिला भारतीय विवाहाचा अनुभव आहे. आजकाल विवाह सोहळ्यात मद्य पिण्याची पद्धत चालू झाली आहे; मात्र आमचा विवाह हा वेगळा आध्यात्मिक पद्धतीने झाला आहे. मी कुंभक्षेत्री आली आहे, तर त्रिवेणी संगम येथे अवश्य स्नान करणार आहे.’’

सिद्धार्थ शिव खन्ना म्हणाले, ‘‘प्रयागराज येथे सर्व प्रकारची दिव्यता असून हे तीर्थक्षेत्र आहे. आम्ही स्वामी यतींद्रानंद गिरि यांना भेटल्यानंतर त्यांचे आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाले. प्राचीन परंपरांचे पालन करणे, ही काही चुकीची गोष्ट नाही. तरीही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी आमची एक संस्कृती आहे.’’