सध्या चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात आज दुसरे ‘अमृत स्नान’ आहे. त्या निमित्ताने…
१. कुंभचा अर्थ काय आहे ?
‘कुंभ’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कुंभ (कलश) हा भारतीय संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतीक आणि शुभ शकुनाचे प्रतीक आहे. शोभा, सौंदर्य आणि पूर्णत्व यांचेसुद्धा प्रतीक आहे. जल भरलेल्या कलशावर ओलसर लाल कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढून कलशात अक्षता, दुर्वा घालतात. कलशात आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवतात, असा हा कलश आदिकाळापासून आजपर्यंत मांगल्याचे प्रतीक म्हणून चालत आला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व शुभ-अशुभ संस्कारांमध्ये कलशाची स्थापना केल्यानंतरच पूजा आरंभ होते. ‘कुंभपर्वा’मध्ये ज्या पौराणिक कुंभाचे स्मरण केले जाते तो अमृत कुंभ, म्हणजे ‘सुधा-कलश’ आहे.
२. कुंभ पर्व कुठे कुठे होतो ?
‘कुंभपर्व’ साजरा करण्याची ४ प्रमुख स्थाने आहेत, हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक. यामध्ये हरिद्वारमध्ये गंगा तीरावर, प्रयागमध्ये गंगा-यमुनेच्या संगमावर, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर आणि नाशिकमध्ये गोदावरी तीरावर कुंभमेळा पार पडतो. ही ४ पौराणिक तीर्थ आणि महत्त्वाची शहरे आहेत. अर्ध कुंभपर्व केवळ हरिद्वार आणि प्रयाग या ठिकाणीच होतो.
३. कुंभपर्वाची कथा
एकदा महर्षि दुर्वास भ्रमण करतांना त्यांना वाटेत देवेंद्र इंद्र भेटले. दोघांनी एकमेकांना अभिवादन केले. महर्षींच्या हातात दिव्य पारिजातक पुष्पांचा हार होता. त्यांनी प्रसन्न होऊन तो हार इंद्राच्या दिशेने फेकला. इंद्राने तो हार पकडला आणि आपल्या माहुताकडे दिला. माहुताने तो हार ऐरावत हत्तीच्या मस्तकावर ठेवला. ऐरावत हत्तीने तो हार सोंडेने घेतला, नाकाने हुंगला आणि आपल्या पायाखाली तुडवला. देवराज इंद्राद्वारे आपण दिलेल्या हाराची अशी उपेक्षा आणि दुर्दशा केलेली पाहून महर्षि फार क्रोधित झाले. त्यांनी त्वरित इंद्राला या क्षणीच ‘श्रीहीन (वैभवहीन) होऊन जाशील’, असा शाप दिला. त्यामुळे इंद्र श्रीहीन झाला. शोभा, समृद्धी, संपत्ती आणि वैभवाची स्वामिनी अधिष्ठात्री देवी ‘श्री’ स्वर्गलोक सोडून निघून गेली. देवगण दीनहीन, श्रीहीन आणि दुःखी होऊन सर्वनाश झाल्याचे पाहून त्राहि त्राहि करू लागले. स्वर्गाची परम शोभा आणि सर्व सुख नष्ट झाले.
देवता श्रीहीन होताच असुरांनी स्वर्गावर चढाई केली आणि सहजतेने स्वर्गावर स्वतःचे नियंत्रण मिळवले. देवगणांना प्राण वाचवणे कठीण झाले. सर्व देवतांनी दुःखी होऊन ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाला स्वतःचे सर्व त्रास सांगितले. त्यानंतर तेथून देवगण ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली श्रीमन्न नारायणाजवळ जाऊन ‘आपले रक्षण करावे’, या उद्देशाने स्तुती करू लागले. भगवान विष्णूने सुमेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाचा दोर बनवून राक्षसांच्या साहाय्याने समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. देवतांनी असुरांनाही समुद्रमंथनातून प्राप्त होणार्या वस्तूंचे अर्धे अर्धे वाटून घेण्याचे प्रलोभन दाखवून समुद्रमंथनासाठी सिद्ध केले. मंथनाच्या वेळी असुर वासुकी नागाच्या मुखाच्या बाजूला उभे राहिले आणि देवगण वासुकीच्या शेपटीच्या बाजूला उभे राहिले. सुमेरू पर्वत भूमीत खाली धसला जाऊ नये, यासाठी भगवान विष्णूने कासव बनून सुमेरू पर्वताला स्वतःच्या पाठीवर ठेवले. अशा प्रकारे समुद्रमंथन आरंभ झाले. मंथनामध्ये समुद्रातून एकानंतर एक अशी १४ रत्ने प्राप्त झाली. ज्यामध्ये एक ‘अमृतकलश’ होता. कलशातून अमृत उसळून खाली सांडू नये; म्हणून चंद्राने झाकणाचे कार्य केले. सूर्याने कुंभ फुटू नये, याची काळजी घेतली आणि गुरु (बृहस्पति)ने मंत्र अन् अन्य साधनांद्वारे असुरांना कुंभापासून दूर ठेवले. या पळापळीत इंद्रपुत्र जयंतने विश्रांतीसाठी अमृतकुंभ पृथ्वीवर जेथे जेथे ठेवला होता, त्याच स्थानी कुंभपर्वाचे आयोजन केले जाते. ज्या तिथी, मिती, मास आणि ग्रह अन् नक्षत्रे यांचा संयोग जयंतद्वारे कुंभ पृथ्वीवर ठेवण्याची वेळ होती, त्याच वेळेस कुंभपर्वाची तिथी, मिती, मास आणि ग्रह अन् नक्षत्रे यांचा संयोगसुद्धा बरोबर होतो.
४. कुंभपर्वाचे महत्त्व
शास्त्रामध्ये मनुष्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या४ पुरुषार्थांची प्राप्ती करण्यास सांगितले आहे. कुंभपर्वाला ‘चारही पुरुषार्थ प्रदान करणारा’, असे म्हटले जाते. यामुळे लौकिक आणि पारलौकिक दोन्हीही श्रेयस प्राप्त होतात. कुंभपर्वामध्ये विधीवत् स्नानदान इत्यादीमुळे थोडेसेच पुण्य लाभत नाही, तर अश्वमेध यज्ञाएवढे पुण्य प्राप्त होण्याचा उल्लेख आहे. यामुळे परलोकातही जाता येते. मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. लौकिक रूपात अशा धार्मिक समारंभात पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा यांसह सहभाग घेतल्यावर सुसंस्कार होऊन मनुष्याची बुद्धी पवित्र होते. या महापर्वावर भारताच्या कानाकोपर्यातून जनसमूह उत्साहाने येतो, ज्यामुळे कुंभपर्वाला आलेल्या यात्रेकरूंना सहजतेने भारत दर्शन होते.
५. स्नानाचे माहात्म्य
कुंभपर्वच्या काळात स्नानालाच सर्वाधिक महत्त्व आहे. ते स्नान ज्या स्थानावर कुंभपर्व होते, तेथील मुख्य नदी आणि मुख्य तीर्थामध्येच केले पाहिजे. त्यामुळे एकाच स्थानावर स्नानार्थींची पुष्कळ गर्दी होते. हरिद्वारमध्ये मुख्य स्थान गंगानदी, प्रयागमध्ये त्रिवेणी संगम, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीचा रामघाट आणि तिच्या जवळच्या तीरावर अन् नाशिकमध्ये गोदावरी नदीचा मुख्य घाट स्नानतीर्थ आहे. स्नानाच्या वेळी तर्पण इत्यादी संकल्प, अर्ध्य आणि दान, दक्षिणा यांचासुद्धा उल्लेख आहे; परंतु व्यावहारिक रूपात सर्वसामान्य जनता कुंभपर्वावर प्रथम स्नान करतात अन् त्यानंतर दान करतात. स्नानानंतर ब्राह्मण भोजन, साधू-संत, गरीब आणि भुकेले यांना अन्न, वस्त्र यांचे दानसुद्धा यथाशक्ती करायला पाहिजे.’
– डॉ. रामकृष्ण उपाध्याय
(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, गुरुपौर्णिमा विशेषांक)