कुंभमेळ्याविषयी ‘बीबीसी’चा हिंदुद्वेष !

‘प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ७ कोटी लोकांचे अमृत स्नान करून झाले. जगात सर्वांत मोठा असणार्‍या उत्सवात सहभागी होणार्‍या आणि हिंदूंना वंदनीय असणार्‍या नागा साधूंविषयी ‘बीबीसी’ ने अतिशय गलिच्छ अन् खालच्या दर्जाचे लिखाण केले. त्याविषयी या लेखात पाहूया.

१. राष्ट्ररक्षणामध्ये नागा साधूंचा सहभाग

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे १३.१.२०२५ पासून कुंभमेळ्याला प्रारंभ झाला. या महाकुंभमेळ्यात केवळ ६ दिवसांत ७ कोटी लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केले. मौनी अमावस्या, म्हणजे २९.१.२०२५ या दिवशी एका दिवसात ८ ते १० कोटी लोक स्नानासाठी येतील, अशी शक्यता आहे. आजपर्यंत प्रशासनाने व्यक्त केलेल्या शक्यता खर्‍या ठरल्या आहेत. या ठिकाणी संत, महंत, महामंडलेश्वर, विविध आखाडे यांतील साधू आणि नागा साधू हे संपूर्ण महाकुंभ होईपर्यंत प्रामुख्याने उपस्थित रहातात.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

नागा साधू बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्याकडे भाले, तलवारी, परशु अशी अनेक शस्त्र असतात. इतिहासानुसार अयोध्येतील श्रीराममंदिराच्या मुक्ती संग्रामात या नागा साधूंचा सक्रीय सहभाग होता. बाबरी ढाचा पाडून तेथे श्रीराममंदिराची उभारणी होण्यासाठी ते अनेक लढाया लढले. यासमवेतच त्यांनी भारतात मुसलमान आक्रमणकर्त्यांची सत्ता जाऊन हिंदु राजांची राजवट यावी, यासाठीही अनेक लढाया लढल्या. त्यामुळे ते हिंदूंसाठी वंदनीय आहेत. नागा साधूंचे हे कार्य ‘बीबीसी’सारख्या हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्यांना कळण्यापलीकडचे आहे. ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, त्यातीलच हा प्रकार आहे.

२. कुंभमेळ्याविषयी जगभरात कुतूहल

महाकुंभमेळ्यांवर जगभरात संशोधन चालू आहे. या महाकुंभमेळ्याचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून उद्योजक, व्यावसायिक, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, तसेच अनेक वलयांकित व्यक्ती येत आहेत. हिंदु धर्म स्वीकारणारे अनेक विदेशी नागरिक भारतात होणार्‍या सर्व कुंभमेळ्यांमध्ये आवर्जून उपस्थित रहातात; कारण त्यांची गंगानदी, साधूसंत, महंत, महामंडलेश्वर, आचार्य यांच्याप्रती श्रद्धा असते.

३. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील नागा साधूंवर ‘बीबीसी’ची टीका

प्रयागराज येथील महाकुंभमेळा चालू होण्यापूर्वी काही आठवड्यांपासून आणि कुंभमेळा चालू झाल्यानंतरही देश-विदेशातील अनेक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि सामाजिक माध्यमे कुंभमेळ्याविषयी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. ‘बीबीसी वृत्तसंस्थेने मात्र त्यांचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष नागासाधूंविषयी विद्वेषक लिखाण करून तो प्रकट केला. भारत विश्वगुरु पदावर आरुढ होत असल्याचे सर्व जगाला दिसत असतांना ‘बीबीसी’ने महाकुंभमेळ्याची खिल्ली उडवली. त्यांनी कुंभमेळ्याविषयी ‘स्नानाचा देखावा’, तर नागा साधूंविषयी ‘राखेने माखलेले नग्न तपस्वी’, असे शीर्षक देऊन द्वेष प्रगट केला. ‘बीबीसी’वर जगभरातून टीका झाली. त्यानंतर त्यांनी या शीर्षकातून ‘नग्न’ शब्द वगळला. दुसरीकडे ‘ॲपल’ या जगविख्यात आस्थापनाचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभमेळ्यात उपस्थित होत्या. त्यांनी हिंदु धर्माची दीक्षा घेऊन स्वतःचे नामकरण ‘कमला’ असे केले, तसेच रुद्राक्षाची माळ धारण केली. यासंदर्भात ‘बीबीसी’ने लिहायचे टाळले.

४. विदेशात होणार्‍या नग्न महोत्सवाचे ‘बीबीसी’कडून समर्थन

युरोपमध्ये नुकताच ‘न्यूड फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला होता. त्याला ४०० हून अधिक लोक निर्वस्त्र होऊन उपस्थित होते. त्यासाठी ‘बीबीसी’ने सोयीस्करपणे ‘निसर्गप्रेमी महोत्सव’ असा शब्दप्रयोग केला. विदेशात गेली अनेक दशके युरोप, जपान, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेया, स्पेन, पोलंड इत्यादी देशांमध्ये ‘न्यूड फेस्टिव्हल’ (नग्न महोत्सव) साजरे होतात. यात सहस्रो महिला-पुरुष आणि तरुण-तरुणी सहभागी होतात. असे कार्यक्रम विशेषतः समुद्रकिनारी असतात. त्यातील युरोपमध्ये वर्ष २०२५ च्या फेब्रुवारी मासात असा कार्यक्रम निश्चित होणार आहे, जो युरोपमधील सर्वांत मोठा असेल. ‘कॉर्नव्हेल ब्रिटीश नॅचरिझम् २००७’मधील नग्न महोत्सवात शेकडो लोक सहभागी झाले होते. वर्ष २०१३ मध्ये पोलंड येथे असा महोत्सव झाला होता. वर्ष २०२४ मध्ये सोमर सेट येथे ५०० हून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार्‍यांचे आणि त्यांचे हीन आणि अश्लील कृत्याचे उदात्तीकरण अन् पाठीशी घालण्याचे काम ‘बीबीसी’सारखी वृत्तसंस्था करते. याउलट साधना आणि राष्ट्रकार्य करणार्‍या नागा साधूंवर मात्र टीका करते.

५. ‘बीबीसी’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

वर्ष २०१३ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘बीबीसी’ने हिंदुद्वेषी टीका केली होती. त्या वेळी ब्रिटनचे खासदार लॉर्ड रामी रेंजर यांनी ‘बीबीसी’ वृत्त वाहिनीवर कठोर टीका केली होती. कुंभमेळ्यासारख्या महोत्सवावर केवळ हिंदुद्वेषापायी अयोग्य विधाने करून संभ्रम निर्माण करणार्‍या ‘बीबीसी’वर तात्काळ बंदी घालायला हवी आणि त्यांचे भारतविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त करावे, असे समस्त हिंदूंना वाटते.’ (१९.१.२०२५)

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय